Get Better Each Week #10 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #10

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 18 August, 2023

Get Better Each Week #10

From Teacher to Billionaire - ‘फिजिक्सवाला’ ! 

‘Fail Fast & Try Again’, ‘Never have Plan B’, ‘तुरंत के पहले’ अशी पोस्टर्स लावलेल्या ६७,००० स्क्वेअर फुटाच्या नॉईडामधील एका आलिशान ऑफिसमध्ये एक शिक्षक बसतो. प्रयागराजमध्ये  (पूर्वीचं अलाहाबाद) गरिबीत लहानपण गेलेल्या या शिक्षकानं काही वर्षांपूर्वी कुटुंब चालावं म्हणून आजूबाजूच्या मुलांना भौतिकशास्त्र शिकवायला सुरुवात केली होती. २०१६ साली या शिक्षकानं आपले क्लासेस यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला! हा शिक्षक यूट्यूबवर इतका लोकप्रिय होऊ लागला की भौतिकशास्त्राचे विद्यार्थी देशभरातून या शिक्षकाच्या ऑनलाईन ‘मोफत’ वर्गात बसू लागले. मोफत शिकणं हा एक भाग. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, किचकट भौतिकशास्त्र मुलांना त्यांच्या मातृभाषेत (हिंदी) आणि तेही हसत खेळत पद्धतीने शिकवणारा एक उत्तम शिक्षक मिळाला होता. इतक्या वर्षांतल्या शिकवणीच्या पुंजीतून जेमतेम दहा लाख साठवलेल्या या शिक्षकाला पहिल्या महिन्यात यूट्यूबकडून जाहिरातीच्या उत्पन्नामधून चक्क ८००० रुपये मिळाले ! Not Bad ! त्या शिक्षकाने विचार केला. २०१६ ते २०२३ या पुढच्या सात वर्षांत या शिक्षकाने इतिहास घडवला. एकेकाळी तीन हजार रुपये घरभाडं देऊन राहणारा हा शिक्षक आता अब्जोधीश झालाय आणि संपूर्ण देशात ‘फिजिक्सवाला’ या नावाने प्रसिद्ध झालाय. या शिक्षकाचं नाव आहे अलख पांडे ! 

Alakh Pandey

अजून वयाची पस्तिशी देखील न गाठलेल्या अलख पांडेची लोकप्रियता आणि व्यवसायाच्या आकड्यांवर नुसती नजर टाकली तरी कुणाचेही डोळे फिरतील. मागच्या वर्षीची मिळकत आहे ७५१ कोटी रुपये. निव्वळ नफा आहे १०८ कोटी रुपये. आज त्याच्यासहित सुमारे २७४९ शिक्षक त्याच्या क्लासमध्ये शिकवतात. सुमारे सोळा लाख साठ हजार मुले फी भरून त्याच्याकडे शिकतात. एका यूट्यूब चॅनल पासून सुरुवात करून आज अलखच्या कंपनीचे स्वतःचे ६१ यूट्यूब चॅनल्स आहेत. त्यावर सुमारे तीन कोटीहून अधिक subscribers आहेत. या सर्व चॅनल्सवर ७४,४६० हुन अधिक व्हिडीओज आहेत. अलखने आता ‘विद्यापीठ’ या नावाने ३८ शहरांमध्ये स्वतःची ६७ सेंटर्स सुरु केली आहेत. मागच्या वर्षी एकूण ६५,६०० विद्यार्थ्यांनी या ‘विद्यापीठात’ प्रवेश घेतला आहे. फक्त एका वर्षात या ‘विद्यापीठाने’ मुलांच्या फीमधून सुमारे ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यवसायाच्या भाषेत ज्याला ‘acquisition’ म्हणतात, अशा मागच्या दीड वर्षात अलख पांडेच्या कंपनीने देशातील नऊ शैक्षणिक संस्थांना चक्क विकत घेतले आहे. इतकी वर्षे स्वतःच्याच कमाईतून व्यवसाय मोठा करणाऱ्या अलखच्या ‘फिजिक्सवाला’ कंपनीने मागच्या वर्षात १०० मिलियन डॉलर्स (सुमारे ८३२ कोटी) इतके फंडिंग घेऊन आता ‘युनिकॉर्न क्लब’मध्ये (१ बिलियन डॉलर्सचे valuation) प्रवेश घेतला आहे. इतक्या कमी कालावधीत इतके प्रचंड यश आणि त्या यशाचं प्रतिबिंब दाखवणारे आकडे पाहून कुणाचेही डोळे फिरतील. म्हणूनच त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन ‘फिजिक्सवाला’च्या केस स्टडीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.   

अलख पांडेच्या यशाचे अनेक पदर आहेत. कठीण विज्ञान मुलांना रोजच्या हिंदीत, सोप्या पद्धतीने आणि आणि ‘मुलांच्या  भाषेत’ शिकवण्याच्या कलेचे कौतुक तर आहेच, पण त्याचबरोबर जुन्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत किती रटाळ आणि कालबाह्य झाली आहे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. शिक्षण क्षेत्रात असलेली सध्याची जीवघेणी स्पर्धा, कॉलेज नामक संस्थेचे कमी होत जाणारे महत्त्व, अमुक एका ट्युशन क्लासमध्येच ऍडमिशन घेण्यासाठी चालणारी पालकांची चढाओढ, ट्युशन क्लासेसची आपापली स्पर्धा, त्या स्पर्धेत जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची मानसिकता, ‘कोटा फॅक्टरी’ या वेबसिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे मागच्या काही वर्षांत भारताच्या छोट्या शहरांमध्ये ट्युशन क्लासेसचं वाढलेलं साम्राज्य अशा अनेक सामाजिक-आर्थिक गोष्टींचा परिपाक म्हणजे ‘फिजिक्सवाला’ चं हे थोडं out of proportion यश आहे! यात अलख पांडे आणि त्याच्या टीमची मेहनत, त्यांनी आणलेलं इन्होवेशन, त्यांचा अत्यंत चतुराईने आणि विचारपूर्वक केलेला PR या सगळ्याला अजिबात कमी लेखायची इच्छा नाही हे मुद्दाम नमूद करू इच्छितो. परंतु ऑनलाईन शिक्षणात सुरुवातीला ‘पोस्टर बॉय’ ठरलेल्या ‘बायजुज, अनअकॅडेमी आणि वेदांतू या कंपन्यांची सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. दरवर्षी तोटा वाढतो आहे. इथे काम करणाऱ्या अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. 

या सर्व पार्श्वभूमीवर ‘फिजिक्सवाला’चे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. याच टप्प्यावर ‘फिजिक्सवाला’ने यापुढचा प्रवास अधिक सावधपणे करणे अपेक्षित आहे. इतकं घवघवीत यश, इतका प्रचंड पैसा, कुठल्याही साध्या माणसाचं डोकं फिरवेल इतकी प्रसिद्धी.. या सगळ्या पसाऱ्यात आपण या सगळ्याची सुरुवात ‘का’ केली होती, तो WHY कुठे हरवला जाणार नाही याची काळजी अलख पांडे आणि त्याचा सह-संस्थापक प्रतीक माहेश्वरी यांना घ्यावी लागणार आहे. शाळेची महती तिच्या भव्य आणि ‘पॉश’ इमारतीवरून ठरत नसते, तर त्या शाळेत शिकवणारे शिक्षक कसे शिकवतात यावरून ठरत असते. मी स्वतः ज्या मराठी शाळेत शिकलो त्या शाळेतील शिक्षकांनी ‘फिजिक्सवाला’ला सध्या मिळणाऱ्या पैशाचे आकडे स्वप्नात देखील पाहिले नसतील. पण आज आम्हा सर्वांच्या जडणघडणीत त्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांनी आम्हाला रोजच्या अभ्यासाच्या पलीकडचं जग दाखवलं. खरं शिक्षण हे उत्तर पत्रिका, मार्क, प्रगती पुस्तक, टक्के याच्या पलीकडे असतं हे त्यांनी नकळत शिकवलं. म्हणूनच आज इतक्या वर्षांनी त्यांची आठवण आली तरी मन भरून येतं.        

एका छोट्या गावातून येत फक्त बुद्धीच्या जोरावर इतकं मोठं यश मिळवणाऱ्या ‘फिजिक्सवाला’चं आपण सर्वांनीच कौतुक केलं पाहिजे. ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा उत्तम संगम झाला तर काय घडू शकतं याचं दर्शन घडवणारी ही एक अफलातून गोष्ट आहे. पण या लाखो मुलांमधून देशाला पुढे नेणारे किमान दहा भौतिकशास्त्रज्ञ निर्माण झाले तर ‘फिजिक्सवाला’चं ते खरं यश असेल. ‘आम्हाला विज्ञानाची गोडी लावली ती ‘फिजिक्सवाला’मुळे’ असं बाकीच्यांनी म्हटलं तरी पुरे आहे. Every Action has an equal and opposite reaction हा भौतिकशास्त्रातील न्यूटनचा तिसरा नियम सांगतो. वर व्यक्त केलेल्या ‘reaction’ घडून येण्यासाठी जी action लागणार आहे त्याची काळजी अलख घेईल अशी मी आशा करतो. 

(या लेखातील काही माहिती 'फोर्ब्स इंडिया’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखातून घेतली आहे.)    

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...