फर्स्ट डे फर्स्ट शो - Welcome to Swayam Talks
×

फर्स्ट डे फर्स्ट शो

पराग खोत

वैद्यकीय सेवांवर पडलेल्या ताणाचं प्रत्यक्ष दर्शन घडल्यावर येणारी अंतर्मुखता आपली वैचारिक बैठक बदलू शकते. हे सामाजिक भान आपण जपायला हवं, सांगतोय पराग खोत
 

Published : 5 April, 2021

फर्स्ट डे फर्स्ट शो

फर्स्ट डे फर्स्ट शो ची खुमारी काय असते ते एखाद्या फिल्लमबाजालाच विचारावं. नव्या कोऱ्या सिनेमाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्यातलं समाधान काही औरच. यातही तो सिनेमा पाहण्यापेक्षा आपण तो इतरांच्या आधी पाहिलाय हे सुख तोळाभर अधिक असतं. यामुळेच की काय कुठलीही नवी गोष्ट सर्वप्रथम करण्याला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ असं म्हटलं जातं. नव्याची नवलाई अनुभवावी ती फर्स्ट शो लाच. असाच काहीसा प्रकार Corona Vaccination च्या बाबतीत घडला.

वरिष्ठ नागरिकांचे लशीकरण सुरु होऊन महिना उलटून गेला होता आणि आता पंचेचाळिशीच्या
पुढील मंडळींची वर्णी १ एप्रिल पासून लागणार होती. आमच्यातला फिल्लमबाज जागा झाला आणि करायचं तर आहेच मग फर्स्ट शो का नाही? म्हणून आम्ही काही १ एप्रिलला सकाळी ८.३० वाजताच हजर झालो. एखाद्या सिनेमाला जावं तसा आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप Vaccination ला निघाला होता. अर्थात तत्पूर्वी त्याचे Online Registration केले होतेच. तिथे पोहोचल्यावर आलेले अनुभव ‘सुखद’ या सदराखाली मोडणारे होते हे निश्चित पण त्या ही पुढे जाऊन ते अंतर्मुख करायला लावणारे होते.

कुठल्याही गोष्टीत चुका शोधून तिला नावं ठेवण्याची आपली भारतीय प्रवृत्ती आपण सदैव आपल्यासोबत बाळगतो. तद्वत गेल्या वर्षभरात कोरोना आणि आता त्याचे लशीकरण या विषयी असंख्य विनोद, मीम्स आणि तेच ते दळण घालून झाल्यावर शेवटी सरकारी अकार्यक्षमतेवर ठेवले जाणारे बोट कुठेतरी झर्रकन मिटले गेले. तिथली नियोजनबद्ध व्यवस्था आणि जीव तोडून काम करणारी माणसं पाहिली आणि समाजमाध्यमांवर टिंगल करणाऱ्या आमच्यातल्या टवाळ वृत्तीची कुठेतरी लाज वाटली. आपण भारतीय १३५ कोटी आहोत याची दचकवणारी जाणीव तिथे झाली.

आदल्या गुरुवार पर्यंत जुना सिनेमा सुरु असताना ओस पडलेले थिएटर जसे शुक्रवारी नव्या सिनेमासाठी तुडुंब भरते तसे कालपर्यंत रिकामे वाटणारे ते रुग्णालय आज गर्दीने ओसंडून वाहत होते. पण व्यवस्था चोख होती. Social distancing च्या सर्व नियमांचे पालन करुन कुठेही विलंब होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले होते. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, आरडाओरड नाही. आपण सर्वांनी मिळून या संकटांवर मात करायची आहे आणि एकमेकांना जमेल तितकी मदत करायची आहे असेच वातावरण सर्वत्र होते. शिस्त होती पण बडेजाव नव्हता की तुम्हाला लस टोचून तुमच्यावर उपकार केल्याचा आव ही नव्हता. सगळी process एखाद्या Corporate Drive ला लाजवेल इतकी सूत्रबद्ध आणि ती सुद्धा सरकारी मोफत रुग्णालयात.

इथे आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटून गेला आणि Frontline Warriors बद्दल मनात कृतज्ञता दाटून आली. केवळ लस टोचून घ्यायला आलेल्या आम्हा धडधाकट माणसांची जर इतकी काळजी घेतली जात असेल तर आजारी माणसांसाठी ह्या मंडळींनी जी काही मेहनत घेतली असेल किंवा घेत असतील त्याला तोड नाही. मुंबईसारख्या शहरात हे करणं तसं सोप्पं म्हणता येईल पण ही मोहीम देशातल्या खेड्यापाड्यात जाऊन राबवणं हे किती जिकीरीचं काम असेल याची लख्ख जाणीव झाली. रात्रीचा दिवस करुन आणि जिवाची पर्वा न करता हे सगळे गेले वर्षभर झुंजताहेत आणि आम्ही System वर बोट दाखवून पाचकळ विनोद करण्यात गुंतलोय. जसं देशाच्या प्रत्येक नागरिकाला वर्ष-दोन वर्षे सैनिकी प्रशिक्षण द्यायला हवं तसंच किमान वर्षभर तरी प्रत्येकालाच ही अशी सेवाभावी कामं करण्याचं बंधन असावं. म्हणजे मग आपल्या अहं भोवतीचं ते शेफारलेपण कमी होईल आणि आपण अधिक संवेदनशील होऊ.

त्या एका घटनेने मला, नव्हे आम्हा सगळ्यांनाच एक नवी दृष्टी दिली. त्याचा अर्थ आम्ही आपापल्या कुवतीप्रमाणे वेगवेगळा लावू कदाचित पण आजूबाजूच्या घटनांकडे अधिक डोळसपणे पाहण्याची शिकवण सगळ्यांना मिळाली हे नक्की. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींनी मन भरुन येतं आणि अंतर्मुख व्हायला होतं. इथं तर कृतज्ञतेचा महापूर आला होता मनात. प्रत्येक गोष्टीत व्यवस्थेला नावं ठेवणाऱ्या आपण या पुढे याचा विचार करायला हवा. लोकसंख्येने अतिप्रचंड असलेल्या आपल्या देशात कुठलीही सुविधा पोहोचविण्यासाठी व्यवस्थेवर किती प्रचंड ताण येत असेल याची जाणीव करुन घ्यावी मनाशीच आणि नंतर त्या व्यवस्थेवर बोट उचलण्याची हिंमत करावी. उडदामाजि काळं गोरं सगळीकडेच असणार आहे. पण अनाठायी टिका करुन आपण त्या कोट्यवधी प्रामाणिक लोकांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह तर उभे करत नाही ना? याचा विचार नेहमी करायला हवा. आमचा हा फर्स्ट डे फर्स्ट शो ला पाहिलेला सिनेमा सुपरहिट होणार आहे कारण सामाजिक मानसिकतेला बदलण्याचं सामर्थ्य त्यात आम्हाला दिसलं. त्या सिनेमातील सर्वच अनाम नायकांना आमचा हा मनोमनी ठोकलेला कडक सॅल्यूट. जय हिंद.

-पराग खोत

लेखक हे ‘स्वयं’च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...