दर्शन एका युद्धभूमीचे - Welcome to Swayam Talks
×

दर्शन एका युद्धभूमीचे

सांबप्रसाद पिंगे

सध्या संपूर्ण जग एका संक्रमणावस्थेतून जात आहे. भीतीच्या सावटाखाली एका कर्मभूमीवर घडलेले त्याग आणि माणुसकीचे दर्शन एक नवी उमेद जागवते, सांगतोय सांबप्रसाद पिंगे.
 

Published : 3 May, 2021

दर्शन एका युद्धभूमीचे

सध्याच्या करोना संक्रमण काळात भोवताली विषण्ण अस्वस्थता पसरलीय. दुर्दैवाने हा भयानक आजार आपल्याला होऊ नये आणि झालाच तरीही रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ नये अशीच सर्वत्र प्रार्थना असते. मात्र अनपेक्षितरित्या हे सर्व अगदी जवळून पाहण्याची - अनुभवण्याची वेळ माझ्यावर आली.

माझ्या मेहुण्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि उपचारांसाठी त्याला बीकेसी कोविड सेन्टरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. पहिल्या दिवशी दाखल करण्यासाठी आणि त्यानंतर दोन एक दिवसांनी डबा आणि इतर काही जरुरीपुरत्या गोष्टी देण्यासाठी माझे तिथे जाणे झाले. सोबत नेलेल्या गोष्टी बाहेर गेटवरच द्याव्या लागल्या पण पहिल्या दिवशी मात्र अगदी आत Triage आणि Observation Ward पर्यंत जाऊन येण्याची संधी मिळाली.

हे कोविड सेन्टर मला तरी दुरून एखाद्या युद्ध छावणीसारखे भासले. आजूबाजूला छोटे छोटे तंबू आणि मध्यभागी मोठे शामियाने. रात्रीच्या त्या भयानक स्मशान अंधारात ती जागा अधिकच भेसूर भासत होती. ती गूढ शांतता भेदून मधूनच कर्णकर्कश्य सायरन वाजवत जोरात आलेली एखादी रुग्णवाहिका. बाहेर रेंगाळत असलेली माणसांची तुरळक गर्दी. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भीषण सुन्नपणा आणि आपल्या मनातील विचारांमुळे असेल कदाचित, पण सर्वत्र पसरलेली ती अंगावर येणारी अस्वस्थ शांतता.

तेथे रात्री कोणी अडवत नाही. त्यात बरोबर Patient असला तर नाहीच नाही. तिथे लागणाऱ्या गोष्टी म्हणजे त्या रुग्णाचं आधार कार्ड आणि RT-PCR Test Reports. बस्स … बाकी काहीही नाही. एक रुपया पण कुठे काढावा लागत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे तेथे काम करणाऱ्या कोणत्याही माणसाच्या चेहऱ्यावर मला तसली अपेक्षासुध्दा दिसली नाही . प्रत्येकजण माना खाली घालून समोर येईल ते काम करत होता. कोठेही कंटाळा किंवा उपकाराचे भाव नाहीत. एकजात सर्वजण तरुण होते आणि PPE Kit घालून असल्यामुळे त्यातला डॉक्टर कोण आणि वॉर्डबॉय / नर्स कोण तेही कळत नव्हतं. खरं तर त्यात नक्कीच काही आपल्या मुलांच्या वयाची तरुण मंडळीही असणार, त्यांच्यासमोर त्यांचं उभं आयुष्य पडलेलं… रंगीत स्वप्ने, नव्या आकांक्षा फार काय हेवेदावेसुद्धा असणार. पण इथे त्या सर्व गोष्टी छावणीच्या बाहेर सोडून मुकाटपणे समोर आलेलं काम करत होती. त्यात घरच्या लोकांची त्यांना बाहेर जाऊ देताना किती घालमेल होत असेल? पण तरीही ही मोठी, नव्या दमाची फौज ते सर्व मागे सारून त्या गंभीर वातावरणात धीराने काम करत होती आणि त्यांच्यात इथे मला एक नवीन भारत दिसत होता.

आतल्या मोठ्या तंबूमध्ये रुग्णाला दाखल करायला घेऊन जाताना एक भली मोठी रांग होती. कोविड रुग्ण आणि त्याच्याबरोबर त्याचा एखादा नातेवाईक. काहीजण तर एकटेच होते. सोबत आलेल्या नातेवाईकांचं प्रेम दिसत होतं. ते चक्क आपले हात त्या रुग्णाच्या पाठीवर मायेने फिरवून त्यांना आधार देत होते. एकदा का तुम्ही आत आलात की करोना आणि त्यातलं Safe Distance वगैरे पूर्ण नाहीसं होऊन सर्वत्र बेफिकिर प्रेम दिसत होतं.

एका स्ट्रेचरवर एक म्हातारी बाई दिसली. तिच्याबरोबर कोणीही नव्हतं. तिला तिथले वॉर्डबॉय बहुतेक दुसरीकडे हलवत होते. ती आडवी आणि तिची दोन बोचकी तिच्या पायामधे होती. त्या अवस्थेतही तिने ती बोचकी घट्ट धरलेली होती. मनात आलं, की शेवटी आपलं सामान इतकंच असतं बाकी सर्व असतो तो फाफटपसारा.

आजपर्यँत मला कधी वाटलंच नव्हतं की मला आयुष्यात अशा पद्धतीची दृश्य बघायला मिळतील. म्हणजे या जगात कुठंतरी दररोज अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आपण टीव्हीवर पहात असतो पण, हे सर्व आपल्या इतक्या जवळ येईल असं वाटलं नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर एके काळी पुस्तकांतून वाचलेले महाभारताच्या युद्धातील ते दिवस आणि ती शिबिरं आणि ते शूरवीर आले. दुसऱ्या महायुद्धावर बेतलेले सिनेमे आठवले. कदाचित पानिपतच्या लढाईनंतर पसरलेली भीषणता, त्यातली दाहकता, त्यातलं वास्तव हे सर्व आज मी एकाच वेळेला अनुभवत होतो. मनात आलं की सर्व युद्ध मोठ्या लोकांमधील राजकारणामुळे सुरु होतात पण सर्वात शेवटी ह्यामध्ये तरुण वर्ग हकनाक भरडला जातो. दुर्दैवाने आजसुद्धा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाहीये ना?

त्या काळात आणि आताही लोकांना असंच वाटत असेल की आज माझे जवळचे इथे आले आहेत उद्या मी पण इथे येऊ शकेन. अर्जुनाला म्हणे कृष्णाच्या विराट रूपात सर्व आप्त मरणासन्न अवस्थेत दिसत असतात त्यावेळी कृष्ण म्हणतो, "तू कोणाला मारणार नाहीस. हे सर्व ठरल्याप्रमाणे घडणार आहे. तू फक्त तुझं कर्म कर, हातात शस्त्र घे आणि लढ.”

आज प्रथमच ह्यातली घडणारी कोणतीही घटना मी तटस्थपणे पाहू शकलो नाही. सुरवातीला आत जाताना एका कोपऱ्यात बोचक्यांचा अगदी दहा ते पंधरा फुटांचा ढिगारा अस्ताव्यस्त पडलेला पाहिला. मनात आलं की कोणी निष्काळजीपणे अशी कपड्यांची गाठोडी फेकली आहेत? कितीही सोयी करा पण जराही शिस्त कशी नाही ह्या लोकांना? आमचं काम झाल्यावर बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या ढिगाऱ्यांवर एकवार नजर गेली आणि मनात आलेल्या विचाराने छातीत एकदम धस्स झालं. बहुतेक ती सगळी गाठोडी, करोनामुळे मृत्यू पावलेल्या माणसांची असणार. त्या बिचाऱ्या मृत व्यक्तींना शेवटच्या घटकांमध्ये बघायला पण कोणी आलेले नसणार तिथे त्यांच्या सामानाची काय कथा? ते कोण घेऊन जाणार? खरंच….काय असेल त्या गाठोड्यांमध्ये .त्या ढिगाऱ्यात त्या दुर्दैवी जीवांनी शेवटपर्यंत जपून ठेवलेली त्यांची इस्टेट अशीच बेवारस पडलेली आहे आणि आपल्याला सांगते आहे की शेवटी आपण प्रेमाच्या आठवणीच बरोबर घेऊन जातो, बाकी काही नाही. त्यामुळे प्रेमाचे अनुभव जितके मिळतील, जसे मिळतील, तेवढे गोळा करा. तेच आपल्याला इथल्या आणि कदाचित नंतरच्या प्रवासातही कामी येतील.

बाकी सर्व निरर्थक आणि बकवास!

- सांबप्रसाद पिंगे
लेखक हे ‘स्वयं’च्या Speaker’s Preparation Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...