आता जोहराचं काय होणार? - Welcome to Swayam Talks
×

आता जोहराचं काय होणार?

सोनाली गोखले

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा धगधगत्या प्रदेशातही संगीताच्या माध्यमातून आशेचा किरण जागविणारी ANIM सारखी संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. ते आत्मभान जपले जावे अशी प्रार्थना आपण करुया, सांगतेय सोनाली गोखले.
 

Published : 23 August, 2021

आता जोहराचं काय होणार?

काही वेळा लहानपणी वाचलेल्या काही गोष्टी आपण खूप मोठे झालो तरी आठवत राहतात. मला आवडलेली अशीच एक गोष्ट मी माझ्या मुलाला त्याच्या लहानपणी सांगत असे. एक चित्रकार स्वर्गात पोहोचतो. त्याला कल्पना नसते की स्वर्गातील सुखासीन आयुष्य इतके बेचव आणि नीरस असेल. इथे सगळी लांब चेहऱ्यांची, सुखासीनतेचे अजीर्ण झालेली माणसे पांढऱ्या शुभ्र कपड्यात! कोणी हसत नाही, गात नाही. झाडे, प्राणी, फुले सगळे काही अगदी कंटाळवाणे कळाहीन पांढऱ्या रंगाचे. थोडक्यात आयुष्यात कुठला रंगच नाही. मग आपला हा चित्रकार हळूहळू त्यांच्या रंगहीन आयुष्यात रंग भरत जातो. रंग, कला, संगीत यांनी त्यांचे जीवन बदलून टाकतो. ही गोष्ट मी मुलाला खूप रंगवून रंगवून सांगत असे. एकदा मुलाने मला विचारले की आई, स्वर्गात ठीक आहे, पण ज्याला धड खायला प्यायला मिळत नसेल त्याला रंग, संगीत, कला याची आठवण तरी होईल का? माझ्या मुलाचा हा प्रश्न मला निरुत्तर करून गेला.

दशकांमागून दशके युद्धाच्या ज्वाळांत बेचिराख झालेल्या अफगाणिस्तानात अशी एक संस्था आहे जी होरपळणाऱ्या जीवांच्या जखमांवर फुंकर घालायचा प्रयत्न करत आहे. त्या संस्थेचं नाव आहे ANIM : Afganistan National Institue of Music. या संस्थेचे सर्वेसर्वा असणारे डॉ अहमद सरमस्त. वडिलांनी अफगाणिस्तानमध्ये संगीतक्षेत्रात केलेली असामान्य कामगिरी त्यांच्या डोळ्यापुढे होती. परंतु रशिया आणि तालिबान यांच्या तावडीत सापडलेली मायभूमी सोडून परदेशात बनचुक्यासारखं सुरक्षित जीवन जगायचं त्यांनी नाकारलं. स्वदेशातील अकाली प्रौढ होऊन पोटार्थी, बालपण करपलेली लहान लहान चिमुरडी मुलं, बंदुकीच्या दहशतीच्या धाकाखाली मूक होऊन गेलेली कोवळी आयुष्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. एकेकाळी समृद्ध असलेला, कलासक्त पण आता जीवनसंघर्षात पिचलेला अफगाणी मनुष्य त्यांना अस्वस्थ करत होता. काबूलच्या शिक्षणखात्याच्या बोलावण्यावरून अफगाणी संगीताचे पुनरुज्जीवन व्हावे, संगीताच्या रूपाने दुःखी जीवांना विसावा मिळावा या उच्च हेतूने डॉ. सरमस्त अफगाणिस्तानात दाखल झाले. सरकारी लाल फितीचा कारभार, नेत्यांची अनास्था आणि पैशाची कमतरता अशा अडचणी साहजिकच आल्या. लोकांना खायला प्यायला मिळत नसताना गाणे आणि संगीताची चैन हवी कशाला हाच भलामोठा आक्षेप स्थानिक नेतृत्वाकडून समोर आला. जिवंत असणे म्हणजे शरीर जगवणे नव्हे तर पराकोटीच्या विपरीत परिस्थितीत उमेद आणि आशा जगवण्यासाठी संगीतासारख्या कला आवश्यक आहेत हा इतका व्यापक विचार कोणालाच करायचा नव्हता.

अथक प्रयत्नाने संगीत शाळा उभी करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करायची तयारी जागतिक बँकेने दाखवली. पुढचा अडथळा होता तो मुलांना आणि त्यांच्या पालकांना शाळेपर्यंत आणणे, त्याची उपयोगिता पटवून देणे हा. त्यापुढे जरी संगीताला भाषा नसते हे जरी खरं असलं तरीही संगीत या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, समजण्यासाठी भाषेच्या माध्यमाची गरज हातवारे आणि चित्रांची भाषा याने पूर्ण झाली. संगीत शिकता शिकता अनेक जाचक जुलमी स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या निर्बंधांना झुगारून देण्याचे बळ या मुलामुलींना मिळायला हवं हे ANIM चं स्वप्न होतं.

हा प्रवास अजिबात सोपा नाही याची जाणीव होतीच. यातून डॉ सरमस्त यांच्यावर बहिरेपणा लादणारा आत्मघातकी बॉम्बहल्ला सुद्धा झाला. या सारख्या कितीतरी भयानक, जीवघेण्या, विपरीत परिस्थितीवर मात करत महत्वाकांक्षा आणि आत्मभानाची बीज पेरत कारवाँ पुढे चालत होता. यातूनच ‘जोहरा’चा जन्म झाला. संगीताच्या पर्शियन देवीचे नाव जोहरा. तालिबानी अत्याचार आणि स्त्रीपण नाकारून मानसिक गुलामगिरीत जगत असलेल्या स्त्रियांच्या या समाजातील ANIM मध्ये ट्रम्पेट शिकणाऱ्या, मीना या धीट मुलीने मुलांचा जसा वाद्यवृंद असतो तसा फक्त मुलींचा वाद्यवृंद करूया का? असा विचार मांडला. अफगाणिस्तान बदलतो आहे जे जगाला दाखवून देण्यासाठी जणू या जोहराचा जन्म झाला. पुढचे वर्षभर शाळेतील प्रत्येक मुलगी या ध्येयाने झपाटून गेली. २०१७ साली World Economic Forum च्या सामर्थ्यवान नेत्यांच्या समोर जागतिक व्यासपीठावर जोहराने अतिशय सुंदर पण आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले. बेचिराख झालेल्या देशात मनात अजूनही आशेचे हिरवे अंकुर उमलत आहेत. जुलमी पायांखाली कुणाचे विचार, संस्कृती आणि आचार दडपले जात नाहीत. हाच जणू संदेश जोहराने दिला. अन्यायी निर्बंधातून मुक्त होऊन माणसाला माणसासारखे आत्मविश्वासाने जगता येते हे आत्मभान जोहराने जागवले.

हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्यासाठी कुणाचे तरी हात अजूनही राबताहेत, अजूनही कुणी अर्धपोटी राहतो आहे, दहशतीखाली वावरतो आहे याचा या मुलींना विसर पडलेला नाही. त्याबद्दल त्या कृतज्ञच आहेत. नेगिन खापवाक ही विशीतील Orchestra Conductor म्हणते की प्रत्येक सादरीकरण हे उत्कृष्टच व्हायला हवे. या मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य बघून माझ्या सगळ्या चिंता, काळज्या विरून जातात. झरिफा आदिबा ही दुसरी Orchestra Conductor म्हणते की मी एक अफगाणी मुसलमान आहे परंतु त्या आधी मी एक माणूस आहे. सुरुवातीला तिला विरोध करणारे तिचे काका जोहराच्या जगभरातील कार्यक्रमांनंतर संपूर्णपणे बदलले. चांगल्या बदलाची सुरुवात तिच्या कुटुंबात झाली याचा झरीफाला अतिशय अभिमान आहे. पारंपरिक आणि पाश्चिमात्य संगीत वाजवणाऱ्या या साऱ्या मुली त्यांच्या पारंपरिक वेषातच आपली लालित्यपूर्ण कला सादर करतात. पारंपरिक रबाब, घी चॅक च्या जोडीने सतार, व्हायोलिन, चेलो अशा देशविदेशातील वाद्यांच्या वाद्यवृंदात समावेश असतो.

अफगाणिस्तानात तीन प्रांतात अनिमच्या शाखा सुरु करायच्या हे डॉ सरमस्त यांच्या अनेक स्वप्नांपैकी एक आहे. संगीताच्या माध्यमातून तरुण जखमी अफगाणी पिढीच्या जखमा बुजतील. ही तरुण पिढी जात, वंश, प्रांत इत्यादी सगळे भेदाभेद विसरून एकत्र येतील आणि राष्ट्रउभारणी चे काम करतील अशी अभंग आशा डॉ सरमस्त बाळगून आहेत. डॉ सरमस्त आणि ANIM शी जोडल्या गेलेल्या सगळ्यांच्या जिद्दीला सलाम. परंतु अफगाणिस्तानातील परिस्थिती परत झपाट्याने बदलत आहे. तालिबानने आपली राजवट तिथे प्रस्थापित केलीय. दुष्ट काळ्या छायेचे ढग पुन्हा गोळा होऊ लागले आहेत. अतिशय अस्थिरतेचे वातावरण तयार झालेले आहे. देश परत त्याच दुःखाच्या खाईत लोटला जाताना दिसतो आहे. मग जोहराचे काय होणार? ही चिंता भेडसावते आहे. आशेचा लसलसता कोंभ उरी बाळगून तग धरून असलेल्या ANIM चे भविष्य उजळ असो अशीच एक मनापासून प्रार्थना आपण करू शकतो. नव्हे, इतकं तर आपण करायलाच हवं!- -

-सोनाली गोखले

स्वयंच्या पाहुण्या लेखिका या विविध माध्यमांतून वैचारिक आणि ललित लिखाण करतात

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

ऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...