सुख म्हणजे नक्की काय असतं? - Welcome to Swayam Talks
×

सुख म्हणजे नक्की काय असतं?

मोहिनी मोडक

प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत असतानाही आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत राहणं ही एक दुर्मीळ कला आहे. The Pursuit of Happyness या गाजलेल्या सिनेमाच्या मांडणीतून चिरंतन आनंदाच्या शोधाची ही गोष्ट सांगतेय, मोहिनी मोडक.
 

Published : 14 June, 2021

सुख म्हणजे नक्की काय असतं?

धावतपळत आल्याने घामेजलेला चेहरा, घरगुती कपडे, त्यावर कसंबसं अडकवलेलं जॅकेट, त्यावर रंगाचे शिंतोडे, अशा काहीशा विचित्र अवतारातला एक तरुण. मुलाखतीसाठी त्याला केबिनमध्ये बोलावलं जातं. मनातली अस्वस्थता लपवत तो हसतमुखाने सर्वांना अभिवादन करतो. त्याच्याकडे पाहून कुणी काही विचारायच्या आत तो स्वत:च स्पष्ट सांगतो. "माझ्या या अवतारामागचं कारण तुम्हाला पटावं अशी कोणती कथा रचून सांगावी याचा मी बाहेर बसून विचार करत होतो पण त्यापेक्षा खरं तेच सांगतो. पार्किंगच्या चुकीचा दंड भरला नाही म्हणून मी रात्रभर तुरुंगात होतो. तिथून सुटका होताच धावत मी थेट इथे आलो आहे." अधिकारी क्षणभर अवाक् होतात. नंतर ते त्याची शैक्षणिक प्रगती, कामातली हुशारी, जिद्द याबद्दल प्रश्न विचारतात. अखेर प्रश्नांच्या फैरीला थांबवत तो म्हणतो, "एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर वेळ मारुन नेण्यापेक्षा ’मला माहीत नाही’ असं मी मोकळेपणे सांगेन पण त्याचवेळी ते उत्तर कसं, कुठे सापडू शकेल याचा विचार माझ्या डोक्यात सुरु झालेला असतो आणि मग मी ते शोधल्याशिवाय राहत नाही." एव्हाना पॅनेल त्याच्या बोलण्याने प्रभावित झालेलं असतं. एक अधिकारी आता शेवटचा प्रश्न विचारतात," अंगावर धड शर्टही न घालता मुलाखतीला आलेल्या माणसाची मी नेमणूक केली तर त्यावर तू काय म्हणशील?" हा तरुण उत्तरतो, "त्याची पँट नक्कीच झकास असेल." इतक्या चमत्कारिक परिस्थितीतही त्याने दिलेल्या या खेळकर आणि मार्मिक उत्तरावर सगळे अधिकारी खळखळून हसतात. प्रचंड धडपडीनंतर अखेर इंटर्न म्हणून नामांकित ब्रोकर फर्ममध्ये त्याचा प्रवेश झालेला असतो.

हे यश फार भव्यदिव्य आहे का? नसेलही, पण ते आपसूक ओंजळीत पडलेलं नाही. त्याच्या निरलस परिश्रमाचं ते सार्थक आहे, त्यामुळे त्याचं मोल होऊ शकत नाही. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या The Pusuit of Happyness या चित्रपटातले असे अनेक प्रसंग अभिनेता विल स्मिथने अक्षरश: जिवंत केले आहेत. प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला हा नितांतसुंदर चित्रपट. या कष्टाळू, हरहुन्नरी, प्रांजळ माणसाचं यशाच्या अथक पाठलागातही तग धरुन राहिलेलं पारदर्शी, उमदं व्यक्तिमत्व अक्षरश: काळजाला भिडतं. चित्रपटाच्या नावाचा संबंध, ’सुखाकांक्षेच्या पूर्तीचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, त्याने तो वापरावा’ हे सांगणार्‍या अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याशी आहे. ख्रिसच्या मुलाच्या पाळणाघराबाहेर चितारलेल्या म्युरलमधल्या स्पेलिंगमधली गडबड तशीच ठेवून चित्रपटाच्या नावात Happiness (स्थिती) ऐवजी Happyness चा (वृत्ती या अर्थाने) जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे.

सेल्समन म्हणून काम करताना सातत्याने आलेलं अपयश, परिस्थितीशी झगडताना कंटाळून बायकोने हात सोडलेला, त्यातच चिमुकल्या मुलाची स्वेच्छेने घेतलेली जबाबदारी. पण हताश न होता मुलाच्या निष्पाप, बोलक्या डोळ्यात लुकलुकणार्‍या चांदण्यांच्या प्रकाशात जिद्दीने पुढे जात राहणार्‍या प्रयत्नवादी आणि स्वाभिमानी तरुणाची ही कहाणी. ख्रिस गार्डनर यांच्या पुढील यशस्वी व्यावसायिक जीवनात याहून अधिक रोमहर्षक घटना नक्कीच घडल्या असतील तरीही ह्याच भागाची निवड चित्रपटासाठी करावी असं गॅब्रिएल म्युकिनो ह्या इटालीयन दिग्दर्शकाला का वाटलं असावं? ‘माझ्या आजच्या स्थानावरुन माझी योग्यता ठरवू नका, मी इथवर कसा आणि कुठून पोचलो यावरुन ठरवा’ हेच कदाचित दिग्दर्शकाला ख्रिसच्या वतीने सांगायचं असावं. कथानक पुढे सरकत जातं तसा हा चित्रपट आपल्या डोक्यात एका वैश्विक प्रश्नाचा भुंगा सोडून देतो, ’माणूस जगतो कशासाठी?’ आणि तो संपतो तेव्हा आपल्याला जे उत्तर सापडतं ते म्हणजे- ’आनंदाचा शोध घेण्यासाठी.’

अर्थात यातला ख्रिस स्वप्नाळूपणे सुखी होण्याकडे डोळे लावून बसत नाही तर आपल्या बछड्याला कवटाळून विजिगिषु मानसिकतेने आयुष्याशी दोन हात करत राहतो. पडतो. पुन्हा उभा राहतो. आपणही केव्हाच त्या बेघर बापलेकांच्या मायेच्या धाग्याने गुंफलेल्या भावविश्वाचा भाग होऊन गेलेलो असतो. मिळेल त्या निवार्‍यात त्यांनी वेचलेले आनंदाचे इवले, गोड क्षण बघताना आपल्या मनातल्या आनंदाच्या व्याख्या आपण नकळत तपासून पाहतो. आनंद म्हणजे स्थैर्य, समृद्धी, प्रतिष्ठा, साफल्य!! की आनंद म्हणजे स्वप्नपूर्ती, सन्मानपूर्वक जगणं, जीवलगांच्या सान्निध्यात असणं की आनंद म्हणजे काही वेगळंच!! सुजाण ख्रिस आणि त्याच्या अजाण मुलाच्या आनंदाच्या व्याख्या काही जगावेगळ्या नाहीत किंबहुना त्या अमेरिकन धाटणीच्याच आहेत पण ते दोघं मात्र जगावेगळे आहेत. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा बाप ठाम उभा असतो. बापमाणूस हा शब्द आपण जितक्या अर्थच्छटांनी वापरतो त्या सगळ्य़ा लागू व्हाव्यात असा यातला बाप ’विल स्मिथ’ जगला आहे. 'The wound is the place where the light enters you' हे रुमीचं वाक्य त्याला बघताना आठवत राहतं. हट्ट करण्याच्या वयातलं त्याचं समजूतदार लेकरु आपले कोवळे हात बापाच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी या जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहतं. विल स्मिथचा Real मुलगा जेडन हाच Reel मध्ये आहे, कदाचित त्यामुळे त्यांच्यातला बंध अजूनच अस्सल वाटतो. त्या दोघांमधले हलकेफुलके पण डोळे पाणावणारे संवाद हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. ममता हा शब्दच नव्हे, कृतीही ’स्त्री’शी जोडली गेलेली आहे. या चित्रपटात दिसणारी स्त्री पात्रं मात्र कोरडी, व्यवहारी आहेत. ती तशी का आहेत याची कारणमीमांसा कथेत आली आहे. इथे ममतेचं दुसरं नाव ख्रिस आहे.

चित्रपट २००६ सालचा आहे. माणसाचा आनंदाचा शोध संपलेला नाही. कधी संपणारही नाही त्यामुळे हा चित्रपट कालातीत आहे. आनंद कुठेतरी पोचण्यात नसतो, तो त्या शोधाच्या प्रवासातच दडलेला असतो हे सांगणारा हा चित्रपट म्हणजे एक समृद्ध अनुभव आहे. त्यात उमेदीच्या प्रत्येक क्षणाला पियानोचे विशिष्ट सूर ऐकू येतात. आनंदाला स्वर असता तर तो असाच असता असं वाटणारे सूर. बापाचं बोट धरुन रोज नव्या उत्साहाने, आशेने त्याच्याबरोबर बागडत, चिवचिवत जाणारा निरागस लेक चित्रपटातल्या अनेक दृश्यांमध्ये दिसतो. ते खरं तर माणसाने धरून ठेवलेलं, मधूनच सुटून जाणारं, पुन्हा मुठीत येणारं आनंदाचं बोट असावं.

- मोहिनी मोडक

‘स्वयं’च्या पाहुण्या लेखिका या विविध प्रिंट आणि डिजिटल माध्यमांवर वैचारिक लिखाण करतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...