बदलाची रिंगटोन - Welcome to Swayam Talks
×

बदलाची रिंगटोन

पराग खोत

आपण सगळेच बदलांनी वेढले गेलो आहोत. ते बदल केवळ तंत्रज्ञानातले नाहीत तर ते मानवी स्वभावातले आहेत आणि परस्परसंबंधातले देखील. मोबाईल रिंगटोनच्या छोट्याशा उदाहरणाने ते विशद करतोय, पराग खोत.
 

Published : 22 February, 2021

बदलाची रिंगटोन

पूर्वीच्या काळी घरात असलेल्या फोनची खणखणीत आवाजातली बेल जाऊन तिची जागा मंजुळ स्वरावली असलेल्या एखाद्या नाजूक लकेरीने किंवा मनमोहक वाद्यमेळाचा एखाद्या सांगितिक स्वरांशाने घेतल्याला आता दोन दशकांहून अधिकचा काळ लोटला असेल. मुळात घरातला Landline नामक तो भरभक्कम ठोकळा आताशा दिसेनासा होऊन त्याच्या जागी सुंदर आणि रंगीबेरंगी instruments येऊन ती कालबाह्य देखील झाली. मध्यंतरी घरातला फोन बाहेर जाताना उचलून स्वत:सोबत घेऊन जाण्याची टूम आली होती. ती सुद्धा अल्पजीवी ठरली. आता मोबाईलचं युग आहे. Landline नामक घरकोंबडे फोन आता नामशेष झाले आहेत. साहजिकच फोनची बेल जाऊन तिथे आता स्थानापन्न झालीय ती मोबाईलची ‘रिंगटोन’ 

बदल हा अपरिहार्य असतो वगैरे वाक्यं मनाशी घोळवून त्याचं सार अंगी भिनायच्या आतच पुढचा बदल घडतोय. बदलांच्या या अफाट वेगापुढे दिग्मूढ होऊन बघत राहणं आणि ते बदल अपरिहार्यपणे स्वीकारणं एवढंच आता आपल्या हातात आहे. हे सगळं इतकं भन्नाट आहे की आता एखादा बदल कालांतराने स्वत:च स्वत:मध्ये बदल घडवेल की काय अशी शंका यावी. या सगळ्यांवर भक्कम मांड ठोकून त्यावर स्वार होणारी आपली नवी पिढी हे सगळं अनुभवायला तयार झाली आहे. आज चाळीशी पंचेचाळिशीच्या पुढे असलेल्या पिढीने जर बदलांची मोठ्ठी range अनुभवली असेल तर आता दहापंधरा वर्षांची असलेली पिढी ही या बदलांचा अभूतपूर्व असा speed अनुभवते आहे, इतक्या झपाट्याने ते घडत चालले आहेत. 

रिंगटोन या एकाच संज्ञेविषयी विचार केला तरी त्यातले तांत्रिक आणि मानवी पैलू चकित करुन टाकतात. मोबाईल फोन उत्क्रांत होत गेला आणि त्याच्या रिंगटोन्स वाढत गेल्या. काही वर्षांपूर्वीं पर्यंत जवळपास प्रत्येक फोनची रिंगटोन ही वेगळी असे. त्या विशिष्ट रिंगटोन वरुन कोणाचा फोन वाजतोय ते कळावं. एखाद्या स्त्रीने नवा दागिना घेऊन तो चारचौघात मिरवावा तद्वत त्या रिंगटोन्स वापरात होत्या. सुंदर सुरावटींसोबतच कधीतरी दरडावलेल्या आवाजात ‘फोन उचल’ वगैरे वेडेवाकडे रिंगटोन स्वभाववैचित्र्याचा नमुना म्हणून अस्तित्वात होते. आपण हट्टाने सर्वांपेक्षा वेगळी रिंगटोन शोधून ती आपल्या फोनवर ठेवत असू. मोबाईल फोन कंपन्या आपल्या नव्या फोनसोबत अधिकाधिक रिंगटोन्स देत होत्या आणि … पुन्हा चक्रे फिरली. 

Facebook, Twitter आणि WhatsApp ही नवी समाजमाध्यमे आली आणि एक नवीच गोष्ट अभ्यासकांच्या लक्षात आली. या नव्या माध्यमांमुळे आता माणसे एकमेकांना फोन करेनाशी झाली आहेत. एकाच वेळी अनेक जणांशी आणि ते ही चित्ररुपात संपर्कात राहण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे संवाद कमी झाला. त्यामुळे मोफत असला तरी आता फोन केला जात नाहीये. अर्थातच जर फोन केलाच जात नसेल तर तो वाजला हे दर्शविणारी रिंगटोन सुद्धा काय कामाची? त्यामुळे तुमच्या लक्षात आले असेल तर आता मोबाईल फोनच्या प्रत्येक नव्या model मध्ये केवळ वीस रिंगटोन्स असतात. त्यातही i phone ची किंवा Samsung ची स्वत:ची एक ठराविक रिंगटोन आहे. आता गर्दीत अनेक फोन्सची एकच रिंगटोन वाजते आणि आपल्याला त्याचे काहीही न वाटता आपण आपला वाजलेला फोन उचलतो. 

या साध्याशा वाटणाऱ्या सूक्ष्म बदलाने एक नवी शिकवण दिली आहे. ‘बोलणे’ ही मनुष्यप्राण्याची मानसिक गरज देखील मागे टाकणारी नवी माध्यमे जर इतक्या वेगाने आपल्यावर येऊन आदळत असतील तर या पुढील काळात आपल्यासमोर काय वाढून ठेवले असेल ते जोखून घ्यायला हवे. आपली नैसर्गिक जडणघडण बदलून टाकण्याचे हिंस्त्र सामर्थ्य या तंत्रज्ञानात आहे हे जाणून घ्यायला हवे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गरजा बदलून त्या जागी नव्याच priorities येतील  आणि त्याची तयारी आपण सगळ्यांनीच करुन ठेवायला हवी. उत्क्रांतीच्या या अफलातून वेगाची ही रिंगटोन आपल्याला ऐकू यायला हवी असेल तर आपल्या बु्द्धीचे कान तीक्ष्ण करावे लागतील आणि तंत्रज्ञानाच्या या अबलख वारुवर कृतीची मांड घट्ट ठोकून बसवावी लागेल. मोबाईलची दुर्लक्षित रिंगटोन ही या नव्या जगातील बदलांची एक छोटीशी चुणूक आहे. 

-पराग खोत

लेखक हे स्वयं च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...