भाषणांच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक ? - Welcome to Swayam Talks
×

भाषणांच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक ?

नविन काळे

स्वयं'च्या आजवरच्या प्रवासातील पार्श्वसंगीताच्या योगदानाबद्दल सांगतोय नविन काळे.
 

Published : 5 October, 2020

भाषणांच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक ?

स्वयं'च्या आजवरच्या प्रवासातील पार्श्वसंगीताच्या योगदानाबद्दल सांगतोय नविन काळे.

'स्वयं'ची संकल्पना मनात रुजल्यापासून एक गोष्ट पक्की केली होती की हा कार्यक्रम वरकरणी 'भाषणांचा' असला तरी त्याचं सादरीकरण हे पूर्णपणे वेगळ्या धाटणीचं असावं. हा कार्यक्रम 'वैचारिक' असला तरी तो प्रेक्षकांना 'जड' वाटू नये यासाठी त्यात मन-रंजनाचा एक हलका इसेन्स असावा. प्रेक्षक सभागृहातून बाहेर पडताना त्यांच्यात कुठेतरी खोलवर आत खेचणारी एक अस्वस्थता असावी असं वाटत होतं.

या दृष्टीने विचार करताना मनात आलं की 'स्वयं'मध्ये आपण संगीताचा वापर केला तर ?
कार्यक्रम संपल्यावर त्यातलं 'म्युझिक' आवडलं असं कोणी सांगणं अपेक्षित नाही, पण संगीताच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे प्रेक्षकांचा अनुभव नक्कीच उंचावू शकेल असं वाटलं.

'वक्त्याची ओळख' ही अशी एक जागा होती जिथे वेगळा प्रयोग करायला वाव होता. अशी एक दोन-तीन मिनिटांची  व्हिडियो क्लिप करायची ज्यात वक्त्याच्या कामाचं सार असेल. या Audio-Video क्लिप ला आम्ही AV म्हणतो. या AV मध्ये आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग करतो. मुख्य म्हणजे, त्या सर्व AVs साठीचे पार्श्वसंगीत आम्ही खास तयार करून घेतो. पार्श्वसंगीतकार म्हणून पहिलं नाव समोर आलं ते माझा मित्र आणि सुप्रसिद्ध संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे याचं. संगीतकार अनिल मोहिले यांचा शिष्य असलेला आनंद हा एक उत्तम लेखक, कवी, निवेदक, वाचक आणि चांगला माणूस आहे. त्याच्यातील या सगळ्या गुणांचा 'निचोड' तुम्हाला 'स्वयं'च्या विविध AVs मध्ये दिसतो.  

आम्ही तयार केलेल्या अनेक AVs पैकी आज मी तुमच्यासमोर निवडक तीन AVs सादर करणार आहे. (त्याची लिंक या लेखासोबत दिली आहे.) त्या AVs पाहायच्या आधी  तुम्हाला त्यामागची thought process कळली तर तुम्हाला त्या AVs अधिक भावतील.

पहिली AV आहे गीतांजली रोहोकले यांची. गीतांजली रोहोकले या 'foster mother' होऊन  बाळांची काळजी घेतात. स्वयं मुंबई २०१९ च्या कार्यक्रमात त्या बोलल्या होत्या. या कार्यक्रमातील AVs चे लिखाण करताना आपलाच एक 'स्वयं'चा प्रेक्षक या वक्त्यांची ओळख करून देत आहे अशी कल्पना केली होती. आनंदने गीतांजली ताईंमधील ते न आटणारे 'मातृत्व' आपल्या संगीतात असं काही टिपलंय की ऐकताना आपले डोळे नकळतपणे पाणावतात. यातला आवाज सुप्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर यांचा आहे. आपल्याशी संवाद साधणाऱ्या त्या प्रेक्षकाच्या मनातील 'guilt आणि आदरभाव यांचा संगम अविनाश सरांनी आपल्या आवाजातून इतका अफलातून पकडलाय की क्या बात !

पुढची AV नदी अभ्यासक परिणिता दांडेकर यांची आहे. या कार्यक्रमात प्रत्येक वक्ता स्वतःच आपली ओळख करून देतोय आणि आपल्याला हे काम का करावंसं वाटतंय ते सांगतोय अशी एक कल्पना होती. आनंदला brief देताना फक्त इतकंच सांगितलं होतं की नदी ही सनातन काळापासून अस्तित्वात असलेली एक सर्वव्यापी गोष्ट आहे, तेव्हा 'देस' रागातील असं काही अपेक्षित आहे. आनंदने देस रागात केवळ अप्रतिम रचनाच बांधली नाही तर ते ऐकताना आपण एका होडीतून प्रवास करतोय असा एक फील आल्याशिवाय राहत नाही. सुप्रसिद्ध गायिका अर्चना गोरेच्या अतिशय परिपक्व आवाजात उलगडत गेलेली नदीबद्दलची आत्मीयता आणि त्या प्रवासात हळूहळू येत गेलेलं शहाणपण हा change over आनंदच्या संगीतातुन अप्रतिमरित्या प्रकट झालाय.

तिसरी AV आहे काश्मीरमध्ये काम करणाऱ्या अधिक कदम बद्दल. या AV मध्ये 'सब कुछ' आनंद आहे ! लेखन, आवाज आणि संगीत by आनंद सहस्त्रबुद्धे ! काश्मीरचा विषय असल्याने आनंदने narration साठी उर्दूमिश्रित हिंदी निवडली. काश्मीरचा फील यावा म्हणून आनंदने यात संतूर, रबाब अशी वाद्ये वापरली आहेत. काश्मीरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अधिक कदमचे काश्मीर मधले आगमन एखाद्या थंडगार झुळकेप्रमाणे होतं हे सांगताना बंदुकीच्या आवाजानंतर जी संतुरची एक सुरावट येते ते ऐकताना अंगावर रोमांच उभं राहतं !

कार्यक्रमाच्या आधी काही तास जेव्हा सर्व वक्ते खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या त्या AVs मोठ्या पडद्यावर पाहतात, तेव्हा अनेकदा निःशब्द होतात. काहीजण भावुक होतात. 'या AV मुळे मीच मला नव्याने उमगलो' अशी भावपूर्ण प्रतिक्रिया स्वयं वक्ता प्रसाद निक्ते यांनी दिली होती.

एक जरा वैयक्तिक अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाहीये. स्वयं मुंबई २०१७ कार्यक्रमाच्या Avs च्या संगीताचं काम सुरू असण्याच्या काळात आनंदच्या बाबांचं दुःखद निधन झालं. कार्यक्रम काही दिवसांवर होता आणि आनंदवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. फक्त दोन दिवसांचा ब्रेक घेऊन आनंदने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आणि एकाहून एक सरस अशा पार्श्वसंगीताची निर्मिती केली. एखादं कार्य उभं राहावं म्हणून अशी जीव ओतून काम करणारी माणसं मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही. फक्त AVच्या बाबतीत बोलायचं तर आनंद सारखा संगीतकार काय, अविनाश नारकर,अर्चना आणि विनीत गोरे, मंदार आपटे, अनिरुद्ध जोशी यासारखे आपले voice over कलाकार काय, अजय आणि वीणा गोखले सारखे आमचे एडिटर आणि व्हिडीओग्राफर्स काय..हे सगळे स्वयंकडे असलेले अनमोल रत्नजडित दागिने आहेत !

या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळेच खूप काही शिकतो. माणूस म्हणून समृद्ध होत राहतो.संगीत निर्मितीची ही सगळी प्रोसेस आमची टीम आणि हे सगळे कलाकार मिळून भरपूर एन्जॉय करतो. घड्याळाचे काटे विसरून काम, खाना और गाना, गप्पा, हास्याची कारंजी….! भाषणाच्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक ? या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्यापुरतं शोधलंय…आणि ते उत्तर त्या संगीताइतकंच 'म्युझिकल' आहे ! :)

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...