‘एक छान बॅग विकत घेऊया’ नावाचं एक मशरूम परवा मेंदूच्या भिंतीवर उगवलं. आहे ती बॅग हरवली, जुनी झाली, असं अजिबात नाही.
नवीन बॅग ही want आहे, need नाही हे देखील कळत होतं. पण बस्स … वाटलं! मग काय, लगेच अमेझॉनवर चेक केलं. फ्लिपकार्ट, मिंत्रा वगैरे पाहून झालं. न संपणाऱ्या त्या अगणित रंगीबेरंगी वस्तूंच्या अद्भुत जंगलात हरवून गेलो. स्वस्त-महाग, चांगलं-वाईट अशा अनेक मिश्र भावनांच्या दलदलीत फसून पुन्हा बाहेर पडून झालं होतं. खूप विंडो शॉपिंग झाल्यावर फेसबुक, इन्स्टाग्रामवर गेलो तर त्या सगळ्या वस्तू तिथेही पिशाच्चासारख्या समोर येऊन नाचत राहिल्या. कंटाळून मोबाईल बंद केला आणि शांतपणे झोपी गेलो.
आज सकाळी बाहेर जाताना माझ्या कपाटात खालच्या खणात काही जुन्या बॅग्ज दिसल्या. मी पूर्वी वापरायचो त्या. त्यात माझी दहा वर्षांपूर्वीची एक आवडती बॅग मिळाली. टाकवत नाही अशा काही गोष्टी असतात, त्यातली एक. दिसायला जुनी होती आणि चेनचे पण वांधे झाले होते. म्हटलं या बॅगवर थोडा खर्च करून काही होतंय का पाहूया. बाहेर पडलोच होतो. ती जुनी बॅग घेऊन एका बॅग रिपेअर करणाऱ्याकडे गेलो. त्याच्या हातात ती बॅग ठेवली आणि म्हटलं, “कुछ हो सकता है क्या इस बॅग का?”
ती बॅग आपादमस्तक न्याहाळत त्याने आपल्या ज्युनिअरला काही सूचना दिल्या. पाच मिनिटांत त्याने ती बॅग माझ्या हातात ठेवली. तुटलेली एक चेन बदलून त्याने नवी चेन लावली. पैसे देण्यासाठी मी त्याच्याकडचा QR कोड शोधू लागलो.
“क्या चाहिये सर?” तो
“QR code. Paytm Google Pay है क्या?” मी
“सर, दस रुपया कॅश नहीं है क्या?” तो
(दहा रुपये? बस्स?) मनातल्या मनात स्वतःवरच हसत मी खिशातले दहा रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले.
खरी मजा पुढे आहे.
बॅग दिसायला जुनी दिसत होती. म्हटलं, लेदर बॅगला जरा पॉलिश करून घेऊया. पूर्वीसारखी चकचकीत दिसेल जरा. आमच्याच जवळच्या चर्मकार भाऊंकडे गेलो. त्यांच्या समोर बॅग ठेवून म्हटलं, “जरा पॉलिश करून द्या ना!”
पाणी पितापिता त्यांनी चक्क नकार दिला.
तोंडातलं पाणी पूर्ण पोटात गेल्यावर म्हणाले, “नका करू पॉलिश. घरी जा. थोडं नवरत्न तेल घ्या आणि साध्या फडक्याने ती बॅग पुसा. पहिल्यासारखी चकचकीत होते की नाही बघा!”
सकाळी सकाळी दुकानात चालत आलेला धंदा नाकारून या माणसाने मला एक उपयुक्त सल्ला दिला होता. तेही त्या सल्ल्यासाठी एकही रुपया न आकारता.
एका फडक्यावर नवरत्न तेल घेऊन ती बॅग पुसली. दहा वर्षांच्या काही खुणा सोडल्यास बॅग खरंच छान दिसतेय. नवी बॅग हजाराच्या खाली नव्हती.या बॅगसाठी पैशाचं म्हणाल तर दहा रुपयांत काम झालं. थोडा संयम, दोन तीन ठिकाणी चौकशी आणि जुन्या वस्तूबरोबर थोडी जुळवणूक केली तर बऱ्यापैकी पैसे वाचतात तर! त्याहीपेक्षा जगातला कचरा एका वस्तूने कमी झाला हेही महत्वाचं नाही का? वस्तूंची डिमांड एका वस्तूने कमी झाली हे महत्त्वाचं नाही का? हे असं वेगळंच realisation होऊन मी त्यावर लिहितोय वगैरे, पण आपले पूर्वज कसलाही बाऊ न करता हेच सगळं रोजच्या आयुष्यात अगदी सहज जगत नव्हते का? त्यातली बेताची आर्थिक परिस्थिती, वस्तूंची कमतरता वगैरे भाग नक्कीच आहे. पण त्यात अंगभूत साधेपणा, कमी दिखावा आणि निसर्गाचा विचारही नक्कीच होता.
पण काळ कधी स्थिर राहत नसतो आणि तीच त्याची ब्यूटी असते. नवनवे पेच निर्माण करत काळ तुमच्याशी खेळत राहतो. जुने संस्कार पुसतपुसत आयुष्यात नव्या गोष्टी येत राहतात. आपण बदलतोय असा फक्त भास होत राहतो. आपल्या आयुष्यात आलेली माणसं पुढे कधीतरी मरून जातात. पण त्यांच्या सवयी, त्यांच्या वागण्याचे पॅटर्न, त्यांच्या विचारांच्या पद्धती वगैरे नदीसारखं पुढच्या पिढ्यांमध्ये वाहत राहतं आणि आपल्या आत कुठेतरी चिकटून राहतं. अधूनमधून ॲसिडीटीसारखं उफाळून येत राहतं.
मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे, जो छोट्याछोट्या दुरुस्तीच्या फंदात न पडता सतत नवनव्या वस्तू विकत घेऊन वापरत राहतो. जो instant gratificationच्या गुहेतल्या वटवाघूळांशी दररोज सामना करतो. Pinch हा माझ्या आधीच्या पिढीचा आवडता शब्द होता. त्या पिढीच्या चिमटीतुन कशीबशी सोडवणूक करून माझी पिढी Click या शब्दाला हळूहळू सरावते आहे. पैसे वाचवण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन वस्तू घेणाऱ्या माझ्या पिढीला अमेझॉन जास्त आवडतंय आणि पैसे सुद्धा जास्त वाचतायत. मग आज नक्की काय झालं?
आज माझ्या आत लपून बसलेल्या एक पूर्वजानं माझं बोट धरून मला बाजारात नेलं. उन्हात फिरवत चार चौकशा करवून माझ्या देहाला थोडे श्रम दिले. या देहाने हजार रुपयांचा सौदा दहा रुपयांत केल्यामुळे माझ्या या आतल्या पूर्वजाला कोण समाधान वाटलं असेल? त्यांची शिकवण न विसरलेल्या या नवीन पिढीबद्दल त्याला केवढा गर्व वाटला असेल? आज तो पूर्वज केवढा आनंदात असेल?
असो.
मला हवी तशी बॅग मिळाली.
पितृपक्षात पितरांना खुश केल्याचं पुण्य मला मिळालं, हा बोनस!
- नविन काळे
लेखक हे ‘स्वयं’चे सह-संस्थापक आहेत.