सोमवार सकाळ. नवीन आठवड्याचा पहिला ‘कामाचा’ दिवस. विकेंडला डोक्यातून गुप्त झालेली, तुमच्या डोक्यातली कामांची यादी आता मेंदूतल्या स्क्रीनवर हळूहळू उमटत आहे. ब्रश करताना, दाढी करताना, पोळ्या लाटताना, आंघोळ करताना तुमच्या डोक्यात एक्सेल फाईल्स, ईमेल्स, PPTs, झूम कॉल्सची शेड्यूल्स हे सगळे फेर धरून नाचत आहेत. बॉसच्या अमुक प्रश्नावर काय उत्तरं द्यायचं? तमक्याला आज कसं पेचात पकडायचं? अशी सगळी समीकरणं डोक्यात तयार होत आहेत. कामाची सुरुवात एका नव्या उत्साहाने करण्याच्या बेतात तुम्ही आहात आणि एका दृश्याने तुमचं टाळकं सटकतं. भरपूर अभ्यास करून, चांगले मार्क-बिर्क मिळवून ज्याने आता स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं असा तुमचा तरणाबांड पोरगा भर सोमवारी सकाळी दहा वाजता भिंतीला तंगड्या लावून छताकडे नुसता बघत बसलाय! आणि पुढचे दोन तास या अवस्थेत काही बदल होणार नाही अशी चिन्हं आहेत!
सध्या तुमच्यात सळसळत असलेलं आणि समोर निपचित पडून असलेलं चैतन्य यातली तफावत पाहता तुमच्या तोंडात किमानपक्षी एक तरी शिवी येईल याची खात्री आहे. पण स्वतःवर संयम ठेवा आणि गुपचूप तुमच्या कामाला लागा. कारण तुमच्या घरातला तो ‘आशेचा दिवा’ कदाचित ‘Tang Ping’ चळवळीचा सक्रिय सदस्य असू शकतो!
तुमच्या कामांतून सवड मिळेल तेव्हा जगात काय चाललंय ते नीट समजून घ्या. चीनमधल्या युवकांनी सध्या ‘Tang Ping’ नावाची एक अनोखी चळवळ सुरु केली आहे. इंटरनेटमुळे ती चीनमध्ये प्रचंड ‘व्हायरल’ झाली आहे. इतकी की, चीनमधील राजवट या चळवळीची दखल घेत ही चळवळ मोडून काढण्याच्या प्रयत्नात आहे.
काय आहे ही चळवळ?
Tang Ping म्हणजे Lying Flat. चक्क झोपून राहणे! काम न करणे! चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेविरुद्ध त्या देशातील तरुणाईचा हा एक प्रकारचा अहिंसक लढा आहे! ‘९-९-६’ म्हणजेच सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यातले ६ दिवस - अशी चीनमधील सध्याची (वादग्रस्त) कार्यसंस्कृती आहे. महासत्ता होण्याच्या या शर्यतीत चीनने संपूर्ण देशाला कामाला जुंपलंय. त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितपणे आपल्या समोर आहेत. पण त्याची एक डार्क बाजू आहे. या कार्यसंस्कृतीमध्ये देशाची आणि नागरिकांची भौतिक प्रगती होत असली तरी या प्रगतीने माणसाचा आनंद हिरावून घेतलाय. त्यामुळे आता इथली तरुण पिढी आनंदाचा शोध घेण्याच्या मार्गावर निघाली आहे. ‘चार पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आम्हाला आता स्वतःचा आनंद शोधायचा आहे’ असा यांचा पवित्रा आहे. यांना लग्न नको आहे. कुटुंबाची जबाबदारी नको आहे. यांना आता जगण्यातला ‘सुकून’ हवाय. यासाठी ते त्यांच्या आवडीचं वाचत बसतात. प्रवास करतात. संगीत ऐकतात. काही नाही तर चक्क झोपून राहतात! चिनी राजवट मात्र यामुळे नाराज आहे. त्यांच्या मते युवकांनी भरपूर काम करून या देशाची निर्मितीक्षमता वाढवणे अपेक्षित आहे. म्हणूनच सरकारच्या मते युवकांचे हे वागणे केवळ निषेधार्थ नसून लाजिरवाणे आहे.
Luo Huazhong या युवकाने तीन महिन्यांपूर्वी ‘Lying Flat is Justice’ या शीर्षकाखाली एक ब्लॉग पोस्ट केला. हा ब्लॉग चीनमध्ये वणव्यासारखा पसरला. जणू काही चीनमधील तरुणाईचं मन कुणीतरी वाचलं होतं. Lying Flat ही चळवळ इतकी लोकप्रिय होऊ लागली की सरकारने हा ब्लॉग इंटरनेटवरून हटवण्याचे तात्काळ आदेश दिले. अर्थातच चीनमधील तरुणाईत सरकारच्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले. जगभरातील समाजशास्त्रज्ञांनी या चळवळीची दखल घेतली. काहींनी तर या चळवळीला महात्मा गांधींच्या अहिंसक क्रांतीची उपमा दिली. जन्माला या. भरपूर काम करा. लग्न करा. पैसे कमवा. गाडी घ्या. घर घ्या. मुलांना जन्म द्या. ही आजवरच्या सर्वसामान्य चिनी जनतेची मानसिकता होती आणि आहे. चीनमधील तरुण मात्र, आपल्या आधीच्या पिढीहून अधिक प्रगती करू इच्छित नाहीत, असं वाटतंय. चिनी तरुणांची ही मानसिकता आपल्या देशाच्या प्रगतीच्या आड येईल असं वाटून सरकार चिंतेत आहे.
वरवर हे सगळंच खूप मजेशीर वाटलं तरी हे धक्कादायक नक्कीच नाही. हा एक प्रकारचा Pendulum Effect आहे. घड्याळाचा लंबक जितका एका बाजूला जाईल तितकाच तो दुसऱ्या बाजूला जाणार हे उघड आहे. ‘आनंद’ हा माणसाचा मूळ स्थायीभाव आहे. सुख देऊन तुम्ही एखाद्याचा आनंद विकत घ्यायला गेलात तर त्याचा व्हायचा तोच परिणाम होईल. केवळ चीनमध्येच नव्हे तर जगात सगळीकडे याचा प्रत्यय येतोय. सुखाचा कडेलोट झालेल्या घरांमधील माणसे सुखाचा त्याग करून आनंद शोधायला बाहेर पडली आहेत. एक माणूस झाडाच्या सावलीत मस्त पहुडला होता. एका आलिशान गाडीतून जाणारा एकजण तिथे उतरला आणि त्याला भरपूर काम करण्यासाठी प्रवृत्त करू लागला.
‘काम केल्यावर तुझ्याकडे भरपूर पैसे येतील.’
‘मग काय होईल?’ त्या खेडूत माणसाने विचारले.
‘मग तू आरामात राहशील.’
‘तसं असेल तर आत्ताही मी आनंदातच आहे की !’ आपली कूस बदलत खेडूत म्हणाला.
Lying Flat वगैरे नावं आत्ताची. ही फिलॉसॉफी आपल्या देशातल्या खेडूत लोकांना आधीपासून ठाऊक होती तर!
Lin Yutan नावाच्या एका महान लेखकाने १९३७ साली एक अप्रतिम पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं नाव आहे ‘The Importance of Living’. १९३७ साली - पुन्हा सांगतो - १९३७ साली - अमेरिकेत राहणाऱ्या या चिनी लेखकाला वाटलं की माणसं करियर, पैसा, भौतिक सुखांच्या मागे धावताना ‘जगणं’ विसरून गेली आहेत. धावण्याच्या या शर्यतीत एक पॉज घेऊन लोकांनी आयुष्याचा हळूहळू मझा घ्यावा. म्हणूनच या पुस्तकात चहा कसा प्यावा, काहीही न करता झोपून राहण्यातला आनंद कसा घ्यावा अशी खूप इंटरेस्टिंग प्रकरणे आहेत. चीनमधील तरुणांना ‘Joy of doing nothing’चा जो काही साक्षात्कार झालाय, त्यात या पौर्वात्य तत्वज्ञानाचा या लेखकाने भरपूर पुरस्कार केलाय आणि हीच खरी शाश्वत जीवनशैली आहे असं ठासून सांगितलंय. एका चिनी लेखकाने मांडलेली हजारो वर्षांपासून चालत आलेली जीवनपद्धती, त्याच चीनमध्ये आज Lying Flat च्या निमित्ताने येऊन एक वर्तुळ पूर्ण होत आहे.
तेव्हा यापुढे कामाचा कंटाळा येऊन एखादी डुलकी काढावीशी वाटली तर खुशाल आडवे व्हा. मनात जराही अपराधीपणाची भावना आणू नका. कारण तुम्ही आता फक्त झोपत नाही आहात, तर Lying Flat या चळवळीचे सक्रिय सदस्य झाले आहात!
- नविन काळे
लेखक हे ‘स्वयं’चे सह-संस्थापक आहेत