पाणी - जीवन की एक अभिशाप - Welcome to Swayam Talks
×

पाणी – जीवन की एक अभिशाप

अमरेंद्र करंदीकर

पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत हरवत चालले आहेत. नकळतपणे आपला प्रवास पाणीविहीन जगाकडे होतोय. नजिकच्या भविष्यात येऊ घातलेल्या या समस्येकडे लक्ष वेधताहेत, अमरेंद्र करंदीकर.
 

Published : 28 June, 2021

पाणी – जीवन की एक अभिशाप

घन बरसत बरसत आले, बादल उमड घुमड बढ आये, पावसाच्या धारा येती झरझरा, पं कुमार गंधर्वांची गीतवर्षा .. पावसापाण्याशी संबंधित अशी अनेक अवीट गोडीची गाणी आपल्या ओठांवर असतात. शाळेच्या भूगोलात जलचक्र, ऋतूचक्र, पाण्याचे स्त्रोत व साठवण तर नागरिकशास्त्रात पाणी बचाव, जलसंधारण इ.इ. अशा अगणित गोष्टी शिकत आपण मोठे होतो.

पण आजची परिस्थिती खूपच भयानक आहे. पाण्याचे मूळ स्त्रोत नदी, नाले, ओढे, तळी दूषित झालेले, विहिरी कोरड्या ठणठणीत, बेसुमार वाढलेली लोकसंख्या, पाण्याच्या वापरातला निष्काळजीपणा व नदीच्या पाण्यावरून होणारे राजकारण … हे सगळंच उबग आणणारं. ही परिस्थिती सुधारली नाही तर जे संकट येऊ घातले आहे, ते म्हणजे 'पाण्यासाठी तिसरे महायुध्द'. जागतिक जलसंपदा संस्थेच्या जल आपत्ती नकाशानुसार, आज जगभरातले सतरा देश पाणी संकटाच्या उंबरठयावर आहेत. इस्राएलसारख्या प्रगतीपथावर अग्रेसर असलेल्या देशाचा नंबर चक्क दुसरा आहे, तर भारत तेराव्या क्रमांकावर आहे.

काही ठळक बाबींकडे लक्ष वेधायचे झालेच तर ... भारताची सद्य लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १८% आहे, पण जलसाठे जगाच्या एकूण साठ्यांपैकी फक्त ४% आहेत. आपल्या भारतात ज्या पाण्याची दरडोई उपलब्धता १९४७ साली सहा हजार घनमीटर होती, ती घटत घटत २०११ साली पंधराशेवर आली. भविष्यातल्या अंदाजानुसार म्हणजे सन २०२५ - २०५० च्या दरम्यान ती अकराशे घनमीटर इतकी होईल.राष्ट्रीय जलनीती काय आहे? 'पाणी हे अत्यावश्यक नैसर्गिक संसाधन, मानवाची मूळ गरज आणि राष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे'. पाण्याच्या नियोजन व व्यवस्थापनासाठी, जलसंपदा विभागाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.

नैसर्गिकरित्या मिळणारे पाणी व ते साठवण्यासाठी, सरकारी व निमसरकारी पातळीवर खालील उपाय योजले जातात.

अ) पावसाचे पाणी थेट वापरणे

ब) वाया जाणारे पाणी शेततळी, जलशिवार, विविध बंधारे याद्वारे अडवून ठेवणे

क) आटलेल्या व गाळयुक्त नद्यांचे पुनरुज्जीवन

ड) खाऱ्या पाण्याचे निक्षारीकरण

इ) सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी

फ) पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखणे

मला स्वतःला पाण्याचे बाष्पीभवन रोखणे (Water Evaporation Retardation) या संकल्पनेवर काम करण्याचे भाग्य लाभले. पाउस पडून गेल्यानंतर, पुढचा पावसाळा येईपर्यंत साठवलेले पाणी टिकवून ठेवणे हे अत्यंत जिकीरीचे असते. आमच्या अंकलेश्वरस्थित वनस्पती तेलजन्य उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीने, ती सुरुवात गुजरात राज्यापासूनच केली. गुजरातमध्ये नर्मदेचे पाणी कालव्यांद्वारे खेळवायच्या आधी, काही धरणाच्या जलाशयांवर आम्ही हा प्रयोग केला होता. वनस्पती तेलापासूनच बनवलेल्या स्निग्ध अल्कोहोलचा (Fatty Alcohol) सूक्ष्म थर पाण्यावर सोडायचा, जेणेकरून अतिउष्णतेमुळे पाण्याची होणारी वाफ कमीतकमी प्रमाणात व्हावी व सर्व जलसृष्टीही अबाधित राहावी. सुरुवातीच्या छोट्या प्रयोगाद्वारे आम्ही हे सिद्ध केले होते की यामुळे होणारे पाण्याचे सुमारे २५-३०% बाष्पीभवन रोखता येते. पहिल्या प्रयत्नातच सर्व आवश्यक चाचण्या तसेच योग्य संस्थांकडून (उदा. हाफकिन संस्था, मुंबई व भारतीय औषध अनुसंधान संस्था, पुणे) प्रमाणपत्र व सरकारी प्रक्रिया पूर्ण करून, जवळपास सातशे टन हे प्राॅडक्ट आम्ही विकले होते.

चंद्रपूरच्या औष्णिक वीज संयंत्राने या प्रयोगासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक चाचण्या व सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्या आणि निविदा व इतर सोपस्कार पार पडून ही ऑर्डर आमच्या कंपनीला मिळणार हे जवळपास निश्चित झाले. पण अघटित घडायचे असेल, तर ते थांबवता येत नाही. एका स्थानिक नेत्याने, या सर्व प्रक्रियेलाच हरकत घेतली व स्वतःचे नसलेले असे तंत्रज्ञान आणि केमिकल द्यायचा हट्ट धरला. हा मातब्बर सद्गृहस्थ सत्ताधारी पक्षाचा असल्याने, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे त्याच्यापुढे काहीही चालले नाही. त्या नेत्याने धमकीच दिली की त्याचे प्राॅडक्ट घेणार नसाल तर मग हे प्रोजेक्टच रद्द करा. दुर्दैवाने वीज मंडळाने त्यातून माघार घेतली. त्यानंतर त्या संयंत्राची सहाही जनित्रे (Generators) बंद पडली व पर्यायाने वीज निर्मिती देखील. अत्यंत चांगल्या हेतूने केलेला हा अभिनव प्रयोग एका हिडीस राजकारणाचा बळी ठरला. त्यानंतर आमच्या कंपनीने निर्णय घेतला की परत अशा प्रयोगांमध्ये आपले हात पोळून घ्यायचे नाहीत. नाही म्हणायला आम्ही काही खाजगी जलाशयांवर आमच्या या प्राॅडक्ट्सचे यशस्वी प्रयोग केले.

पाणी वाचवायचे दुसरे मार्गही मी अवलंबण्याचे ठरवले. माणसाला पिण्याव्यतिरिक्त पाणी लागते कुठे? तर स्नान, कपडे, भांडी व लादी स्वच्छ करण्यासाठी. नुकतीच भारतातल्या सात प्रमुख शहरातली पाणी वापराची सरासरी काढण्यात आली. त्यानुसार दरडोई १५० लिटर पाणी लागते. ज्यात स्नानासाठी २८%, कपडे भांडी शौचालय इ, स्वच्छतेसाठी ६६% व पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी फक्त ६% लागते असा निष्कर्ष काढण्यात आला. याचा अर्थ आपण जास्त पाणी एकूण स्वच्छतेसाठीच वापरतो. मग अशा उत्पादनांवर आपल लक्ष केंद्रित का करू नये, ज्यामुळे स्वच्छतेसाठी किमान ५०% पाणी कमी खर्च होईल? एवीतेवी हे पाणी सांडपाणी म्हणून वायाच जाते. जगातल्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशी प्रसाधन उत्पादन निर्मिती सुरु केली आहे, ज्यात पाणी अर्धेच लागून, त्याचा अपव्यय टाळता येतो. दक्षिण आफ्रिका, मलेशिया सारख्या देशात, काही वसाहतीत महिला मेळावे घेऊन त्यांना अशी उत्पादने वापरून पाण्याचे महत्व पटवून देण्याची सामाजिक जबाबदारीही पार पाडण्यात आली. आपल्या भारतातही पाणी वाया घालविण्याच्या मानसिकतेत बदल घडून येताना दिसतोय, ही आनंदाची बाब आहे.

भारत सरकारही नमामि गंगे, चेन्नईमध्ये खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर, गुजरातमध्ये कच्छ विभागात नर्मदेवर 'कल्पसार' असे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. गच्चीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जलसंधारण, Water Cup सारख्या स्पर्धा व उपलब्ध पाण्यानुसार शेती करण्याकडेही कल जातोय ही समाधानाची बाब आहे. सर्वांनीच जर 'पाणी बचाव' या संकल्पनेसाठी एक पाउल पुढे टाकले, तर पाणी ही आत्यंतिक जिव्हाळ्याची बाब ठेवत, हे जीवन वाचवून आपण पुढच्या पिढ्यांना उपकृत करणार आहोत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे …. ही उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ होईल.

-अमरेंद्र करंदीकर

‘स्वयं’चे पाहुणे लेखक हे विविध माध्यमांत वैचारिक आणि ललित लिखाण करतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...