कोनाडा, ज्याचा त्याचा... - Welcome to Swayam Talks
×

कोनाडा, ज्याचा त्याचा…

सोनाली गोखले

नेहमीच्या गजबजाटातून बाहेर पडावं आणि आपल्यातील ती ऊर्जा पुन: भरुन घ्यावी असं तुम्हाला कधी वाटतं का? त्यासाठी काय करावं, सांगतेय सोनाली गोखले.
 

Published : 31 May, 2021

कोनाडा, ज्याचा त्याचा…

जुन्या काळी घरांच्या भिंतींमध्ये कोनाडा केलेला असे. हातासरशी वस्तू पटकन ठेवायला आणि मिळत नसलेली वस्तू तिथेच शोधायला. आपल्या मनातही असाच एक कोनाडा आपण तयार करायला हवा. आपला विरंगुळा, आपली आवड, आपला विसावा जपायला.

दिवाळीला आठ दहा दर्जेदार दिवाळी अंक विकत घ्यायचे, जे आवडतील ते ठेवून द्यायचे. कधीही ते वाचावेसे वाटले की सेन्टर टेबल खालून काढायचे आणि पुनर्वाचनाचा मनमुराद आनंद घ्यायचा. ही प्रथा गेली पाचसहा वर्षे आमच्याकडे सुरु आहे. आज चाळलेल्या ‘अंतर्नाद दिवाळी २०१८’ च्या अंकातील मधुकर धर्मापुरीकर यांचा, हिंदी लेखक कुमार अंबुज यांच्या ‘माँ रसोइमे रहती है’ ह्या कथेचा मराठी अनुवाद पुन्हा वाचला आणि तो उमजला आणि तितकाच आवडलाही.

एका किशोरवयीन मुलाला आपल्या आईचं सतत स्वैपाकघरात वावरणं, निवडणं-टिपणं, पत्र लिहिणं, मैत्रिणींची उठबस … थोडक्यात नेहमी तिथेच रमणं याचं फार कुतूहल. दिवसाचा कुठलाही प्रहर असो. भली पहाट, दिवस, दुपार, रात्र-अपरात्र, कधीही आई घरात दुसरीकडे कुठेच दिसत नाही. ती तिथेच खुश असते, गाणं गुणगुणते, खिडकीबाहेर दूर कुठेतरी बघत राहते, आभाळ-चंद्र-तारे निरखत राहते. याचं गहन कोडं या मुलाला पडलेलं आहे. तो नेहमी आईला सुचवतो की आजूबाजूच्या इतर चार बायकांप्रमाणे इथून बाहेर पड, जरा फिरून ये. आई नकार देते आणि म्हणते मला इथेच आवडतं आणि तुम्ही नसता तेव्हा मी येते की दूरवर फिरून. एका रात्री मुलाला जाग येते. तिकडूनच तो बघतो तर खिडकीतून स्वयंपाकघरात पसरलेल्या दुधाळ उजेडात आई खिडकीशीच दूरवर पाहत उभी असते. कदाचित चंद्र, कदाचित झाडी किंवा कदाचित काहीच नाही. आदल्या रात्री तिच्या मुरगळलेल्या पायाची जाणीवसुद्धा तिच्या चेहेऱ्यावर दिसत नसते. मग ती सावकाश वळते आणि स्टुलावर बसते. भिंतीला टेकून ती शांतपणे डोळे मिटून घेते.

मला ही गोष्ट भावली कारण गोष्टीतल्या आईने तिचा कोनाडा शोधला आहे. कधीतरी जाम म्हणजे जाम कंटाळा येतो, रुटीन थकवतं. कधीतरी निराशेची काजळी पसरलेली असते. केव्हातरी काहीच करावंसं वाटत नाही. बातम्यांची चॅनेल्स बघून डोकं उठतं. यासारखं कुठलंही कारण असेल. खरंतर आपल्याच कोनाड्यात शिरून यायला कारण तरी कशाला हवं? कोणाचा कोनाडा पुस्तकांचा, कुणाचा गप्पांचा, कुणाचा शॉपिंगचा तर कुणाचा कपाट आवरण्याचा सुद्धा. कोणी समानधर्मी असेल दुधात साखरच. कोनाड्यात कितीही वेळा तुमचा विरंगुळा, तुमचा विसावा शोधा, त्याला काही बंधन नाही.

या कोनाड्यात शिरण्याचा एक अलिखित नियम आहे बरं का! कोनाड्यात शिरण्याची अवस्था एकांताची असायला हवी, एकाकीपणाची नव्हे. एकांत आणि एकटेपणा यातली सीमारेषा फार धूसर आहे. सगळा कोलाहल बाजूला असताना माणूस निवांत एकांतात असू शकतो आणि माणसांच्या गराड्यात असूनही माणूस एकटा असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोनाड्यात किती वेळ रमावं, तर सुरवंटाचं फुलपाखरू होईपर्यंत. जोपर्यंत आपल्या मनातील कलाकृती प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत गायक, वादक, चित्रकार अशी कलावंत मंडळी आपापल्या कोनाड्यात रमलेली तर आपण नेहमी पाहतो की!

काही काळापुरतं आपापल्या कोनाड्यात जाऊन आलं ना की कसं फ्रेश वाटतं. मन एकदम उत्साहाने भरुन जातं. सगळ्या गोष्टीत रस वाटायला लागतो. आजूबाजूची माणसं परत प्रेमाची वाटायला लागतात. नेहमीच्या कामातून वेगळेपण, नवेपण जाणवू लागतं. तेच घर, तेच ऑफिस, तोच बॉस आणि त्याच गप्पाही चमचमीत वाटायला लागतात. सगळं कसं छान छान वाटायला लागतं. कुंचल्याच्या एका फटकाऱ्यासरशी सगळं चित्र रंगीबेरंगी होऊन जातं. कानात व्हायोलिन्स वाजू लागतात, आवडीच्या गाण्याची लकेर ओठावर येते. कर्कश्य ओरडणारा टीव्ही चालतो, मुलांचा कल्लोळ हवाहवासा वाटतो इतकंच नाही तर नेहमीचा फोडणीचा भातही टेस्टी लागतो. तुमचाही एखादा कोनाडा असेलच. त्याला अधूनमधून भेट द्यायला विसरू नका. शास्त्र असतं ते!

- सोनाली गोखले

स्वयंच्या पाहुण्या लेखिका या विविध माध्यमांतून वैचारिक आणि प्रासंगिक लिखाण करतात

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...