बांबूचे घर - Welcome to Swayam Talks
×

बांबूचे घर

नविन काळे

मेळघाटातील आदिवासी समाज जीवनास नवसंजीवनी देणाऱ्या 'संपूर्ण बांबू' प्रकल्पाचे संस्थापक श्री. सुनील देशपांडे यांचे आज नागपुरात कोरोनामुळे दुःखद निधन झाले. सुनीलजींच्या अशा अचानक जाण्याने सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत बुद्धिमान, द्रष्टा व निरलस कार्यकर्ता आपण गमावला आहे. सुनीलजींचे कार्य आणि त्यांच्यासोबतच्या अनेक स्मृती आम्हाला पुढील कार्याची प्रेरणा देत राहतील. देशपांडे कुटुंबीय व संपूर्ण बांबू प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुनीलजींचे कार्य नेमके कळावे यासाठी नविन काळे यांनी २०१६ साली सुनीलजींच्या कार्याविषयी लिहिलेला एक लेख आज या निमित्ताने 'स्वयं डायरी'मध्ये पुनःप्रकाशित करत आहोत. सुनीलजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
 

Published : 20 May, 2021

बांबूचे घर

मेळघाट. महाराष्ट्रात असूनही मध्यप्रदेशास अधिक जवळचा. भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील.

त्यातल्या त्यात आपल्या अमरावतीहून जवळ. ‘मेळघाट’ म्हटलं की आपल्याला आठवतं कुपोषण आणि बालमृत्यू ! पण मेळघाटचं सौंदर्य आणि सामर्थ्य आपल्याला माहित नसतं. व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांत तीन चार वेळा मेळघाटला भेट द्यायचा योग आला. पहिल्याच भेटीत तिथल्या एका अनोख्या घराशी परिचय झाला. मग जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा जात राहिलो.

त्याच घराविषयी आज सांगणारे.

म्हणायला दारावर ‘सुनील देशपांडे-निरुपमा देशपांडे’ इतकीच अक्षरं. चारचौघांसारखंच घर. पण घराच्या आतला अवकाश आजूबाजूच्या शंभर गावांनी व्यापून गेलेला ! सुनील आणि निरुपमा देशपांडे. ‘संपूर्ण बांबू केंद्रा’चे जनक. जन्माने पक्के शहरी. आज मात्र संपूर्ण मेळघाटाला आपलं घर केलेले. आजवर सुमारे सहा हजार आदिवासींना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारे हे दांपत्य. त्यांचीच ही कहाणी.

सुनील देशपांडे नागपूरचे. शिक्षणाने MSW (Masters in Social Work). निरुपमा पक्क्या मुंबईकर. त्याही शिक्षणाने MSW. ताईंची मुंबईत आरामदायी सरकारी नोकरी. दोघेही आपापल्या ‘सुखी आयुष्याला’ कंटाळलेले. कर्मधर्मसंयोगाने दोघांची भेट झाली. स्वभाव पटले. लग्न झालं. दोघांनी ठरवलं, सरधोपट आयुष्य जगायचं नाही. यापुढे अर्थपूर्ण आयुष्य जगायचं. मेळघाटात जाऊन तिथल्या लोकांसाठी काम करायचं ठरवलं. हातात एक बॅग घेऊन दोघेही मेळघाटात येऊन दाखल झाले. साल होतं १९९५.

अनेक घाटांचा जिथे मेळ होतो ते ‘मेळघाट’ ! अद्भुत निसर्गाचं वरदान लाभलेलं मेळघाट. अतिशय दुर्गम. शहरी सोयीं-सुविधांपासून कोसो दूर. देशपांडे दांपत्य मेळघाटात पोहोचलं खरं. पण राहायला घर कुठे होतं? मोठा प्रश्नच होता. एका आदिवासी घरासमोर उभे राहिले. चंद्रमोळी घर. जेमतेम दोन माणसं राहू शकतील इतकंच घर. घरात कोरकू समाजाच्या एक आदिवासी बाई होत्या.

‘आम्ही तुमच्या घरात राहू का ?’ दोघांनी विचारलं.

त्या बाईंना ‘मराठी भाषा’ कळणे शक्य नव्हते. पण ‘याचनेची भाषा’ त्यांना कळली असावी.

बाईंनी आपल्या त्या नखभर घरातील ‘अर्धी जागा’ या दोघांना राहायला दिली. देशपांडे हेलावून गेले.

सर्वस्वी अनोळखी लोकांना आपण आपल्या घरात असं राहायला देऊ ? तेही स्वतःला अडचण करून? देशपांडे दांपत्याच्या शहरी मनाला प्रश्न पडला. या एका प्रसंगाने मेळघाट ही काय चीज आहे, हे ध्यानात आणून दिलं. एक नवी दृष्टी दिली. जगण्याबद्दल. इथल्या माणसांबद्दल आणि मेळघाटबद्दल ! देशपांडे दाम्पत्याचा मेळघाटात संसार सुरु झाला तो असा !

MSW करत असताना जे काही शिकलो ते या लोकांना शिकवत फिरायचं असं ठरवलं. पण काम करता करता कळू लागलं की याच लोकांकडून आपणं खूप काही शिकतोय. त्यांच्या’साठी’ काम करतोय असा कुठलाही भाव न ठेवता काम करत राहायचं. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांची भाषा, संस्कृती, चालीरीती शिकायच्या. आत्मसात करायच्या. आपण कोणीतरी वेगळे आहोत – याचं कल्याण व्हावं म्हणून इथे आलोय हा भाव हळूहळू मोडीत निघाला. या संस्कृतीचा, इथल्या परिसराचाच एक भाग बनून राहिलो तर आपल्याला जे काम करायचंय ते अधिक व्यापक आणि मानवी होईल, असा विश्वास या दोघांना वाटला.

त्याच वेळी आर्किटेक्ट विनू काळे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी ‘बांबू’ या विषयावर केलेल्या संशोधनाचा प्रभाव सुनीलभाऊंवर होता. मेळघाटात बांबूची लागवड निसर्गतः विपुल प्रमाणात आहे. आणि आदिवासींच्या हातात सुंदर कला आणि कौशल्य आहे. या दोहोंचा सुंदर मेळ घातला तर ? सुनीलभाऊंना आपल्या कामाची नस सापडली. बांबूच्या विविध प्रजातींवर संशोधन करत असताना सुनीलभाऊ स्तिमित होऊन गेले. ‘बांबू’ ही नारळाप्रमाणेच बहुपयोगी वनस्पती आहे. शोभेच्या वस्तूंपासून ते दैनंदिन वापरातील फर्निचरपर्यंत बांबूचा परिणामकारक वापर होऊ शकतो. इतकंच नाही, तर एक अख्खं राहतं घर बांबूपासून तयार करता येऊ शकतं, हेही त्यांच्या लक्षात आलं. इतर संसाधनापेक्षा बांबू अधिक स्वस्त आणि टिकाऊ. त्यात पर्यावरण स्नेही. कामाची दिशा ठरली. आदिवासींना बांबू विषयातलं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायचं. त्यांना बांबूच्या वस्तू बनवायला शिकवायच्या. आणि यातूनच या आदिवासींना स्वतःच्या पायावर उभं करायला मदत करायची. शास्त्री (ज्ञानी) आणि मिस्त्री (कारागीर) यांचा संयोग घडवून आणायचा. ज्ञानाबरोबरच त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची. गेली वीस वर्षे नेमकं हेच काम ‘संपूर्ण बांबू केंद्रा’च्या माध्यमातून अव्याहतपणे सुरु आहे. देशपांडे दांपत्याचं सर्वात मोठं योगदान काय असेल तर त्यांनी या आदिवासींमधली अंगभूत ताकद ओळखली आणि त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. आजच्या घडीला सुमारे सहा हजार आदिवासी लोक या केंद्रातून बाहेर पडले आहेत आणि बहुतेक लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. सुनील भाऊंच्याच भाषेत सांगायचं तर ‘त्यांच्यात ‘आग’ होतीच. आम्ही फक्त त्या निखाऱ्यावर फुंकर घातली इतकंच.’

सोयी सुविधांच्या बाबतीत हा ‘कोरकू’ आदिवासी समाज शहरी लोकांच्या तुलनेत भले मागे असेल. पण विचारांच्या बाबतीत खूप पुढे आहे. हा समाज कधीही चोरी करत नाही. खोटं बोलत नाही. आणि मुख्य म्हणजे, भीक मागत नाही. त्याचं परंपरागत ज्ञान अफाट आहे. विविध चालीरीतींची जोड देऊन त्यांनी ते जपलं आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर अक्षय्यतृतीया च्या आधी ही माणसं झाडाचा आंबा तोडणं पाप मानतात. विज्ञान सांगतं, अक्षय्यतृतीयेआधी आंब्याची गुठली परिपक्व झालेली नसते. म्हणजेच, आंबा परिपक्व व्हायच्या आधी आंब्याला झाडावरून काढणं म्हणजे एका अर्थी ती ‘भृणहत्या’ ठरते ! आणखी एक गमतीशीर गोष्ट कळली. गावात काही तंटे झाले तर दोन्ही पक्ष पंचायतीसमोर जातात. पंचायतीचा वेळ घेतला म्हणून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी अडीचशे रुपये ‘कोर्ट फी’ म्हणून जमा करायचे. खरी मजा पुढे आहे. कोरकू समाजाच्या प्रगल्भ विचारांचं दर्शन घडतं ते इथे. त्या पाचशे रुपयांचा गुळ आणला जातो. आणि तंटा मिटला या आनंदात संपूर्ण गावाला तो गुळ वाटला जातो ! किती ‘गोड’ ना !

या कोरकू समाजाचेच एक भाग झालेले देशपांडे कुटुंब आपलं शहरी शिक्षण बाजूला ठेवून त्यांच्या सर्व रूढी परंपरा मोठ्या आनंदाने साजरे करताना दिसतात. आपल्या परंपरागत ज्ञानाचं आणि संस्कृतीचं संवर्धन व्हावं यासाठी देशपांडे यांनी आता मेळघाटात ‘ग्रामज्ञानपीठ’ स्थापन केले आहे. त्याचे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सुनीलभाऊ आणि निरुपमाताई यांचे आता केंद्रातच स्वतःचे एक लहानसे घर आहे. पण ते घर आता सर्वांचे आहे. ‘घर मागणारं नसावं, देणारं असावं !’ आमचे सुनीलभाऊ नेहमी म्हणतात. नुसते म्हणत नाहीत, ते आणि त्यांची पत्नी तसे जगतात. इथलीच स्थानिक माणसे संपूर्ण बांबू केंद्राचा कारभार मोठ्या आत्मविश्वासाने चालवतात. चंदा ही इथलीच स्थानिक मुलगी. ती एका मुलीची आई झाल्यावर पदवीधर झाली. आता ‘संपूर्ण बांबू केंद्रा’चे हिशेब ‘टॅली’वर सांभाळते. तिच्याशी एकदा गप्पा मारून पहा. MBA झालेली पोरं पण हरतील, इतका आत्मविश्वास तिच्यात. अजून पुढे शिकायचंय, असं निखळ हसत म्हणते. तिच्या डोळ्यातली चमक आपल्या LEDला पण मागे टाकेल.

एकेकाळी एकर आणि हेक्टरची भाषा करणारे आपण ‘स्क्वेअर फुटात’ कधी बोलू लागलो ते कळलंच नाही. घरं लहान झालीच पण उंबरठ्याबाहेरच्या चपलांची संख्याही हळूहळू झिजत चालली. स्वतःची जात, स्वतःच्या रूढी आणि परंपरा याबाबत आपण इतके पझेसिव्ह होतोय की इतरांबद्दलचा दुस्वास वाढू लागलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर, सुनील आणि डॉ निरुपमा देशपांडे यांच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या ‘बांबूच्या घराची’ कहाणी सांगावीशी वाटली, इतकंच.

फार काही नको, आपल्या घरात एक ‘चंदा’ निर्माण झाली तरी खूप झालं !

- नविन काळे
लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...