आसाम मधील जोरहाट येथे ७५ वर्षीय समाजसेविका लिखिमी बरूआ ह्यांनी फक्त महिलांसाठी पहिली सहकारी बँक स्थापन केली आहे.आसामी महिलांसाठी 'लक्ष्मी माँ' म्हणून त्या परिचित आहेत. शून्यातून लखिमी बरूआ ह्यांचा प्रवास सुरु झाला. जात आणि कुठल्याही पार्श्वभूमीची पर्वा न करता, समाजाच्या सर्व विभागातील महिलांना सहभागी करून घेणे आणि त्यांना मदत करणे ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात साकार केली आहे.
ज्या महिलांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी बँकेचे दरवाजे खुले आहेत. बँकेने अनेक महिलांना त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे वाचवण्यास मदत केली आहे, ज्याचा अन्यथा कुटुंबातील सदस्य आणि मद्यपी पतीकडून गैरवापर होईल. या महिला बँकेत नियमित भेट देत असल्याने, त्या अनेकदा त्यांच्या वैयक्तिक समस्या कर्मचाऱ्यांशी शेअर करतात आणि बँकेत त्याबद्दल ऐकल्या जाते ही बँकेची वेगळी बाजू आहे. “आम्ही लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो हे पाहून बरे वाटते,” असे लखीमी म्हणतात.
आसाममध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी लखिमी बरूआ ह्यांचे नाव आदराने घेतले जाते. लखिमी बरूआ ह्यांनी १९९८ मध्ये 'कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेची' स्थापना केली. त्यांनी महिलांना रोजगार देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. जोरहाट,शिवसागर,गोलघाट ह्या जिल्ह्यातील अनेक महिला सहकारी बँकेच्या सदस्य आहेतच पण उत्पन्न वाचवत ,सुलभ कर्ज घेत त्याचे हफ्ते फेडत आहेत. ह्या बँकेत येणाऱ्या जवळपास ७५% हुन अधिक महिला ह्या निरक्षर आहेत. निरक्षर महिलांना साक्षरतेचे महत्त्वही या सहकारी बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
लखिमी बरुआ ह्यांच्या आईचे त्यांच्या जन्माच्यावेळी निधन झाले. वडिलांनी सांभाळ केला पण पुढे तारुण्यात असतांना वडील सोडून गेले आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांनीच महिलांसाठी आर्थिक सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आठ वर्षे संघर्ष करत आज सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
लखिमी बरुआ ह्यांना जाण होती की, अत्यंत गरीब स्त्रियांना पैशांच्या अभावामुळे किंवा विविध महिला गटांमध्ये गुंतवणूकीत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना कुठल्या समस्या येवू शकतात आणि त्या जाणिवेतून त्यांनी बँक सुरू केली. बहुतेक महिलांना तर बँक कशी चालते ह्याबद्दल ही माहिती नव्हती. पण परिस्थितीत बदल होत गेला. लखिमी बरुआ ह्यांनी १९९० साली भारतीय रिझर्व्ह बँकेला महिलांसाठी सहकारी बँक स्थापन करण्यासाठी अर्ज केला. १९९८ मध्ये मंजुरी मिळाली आणि दोन वर्षांनंतर जोरहाटमध्ये ८.५० लाख आणि १५०० महिला सदस्यांच्या आरंभिक गुंतवणूकीसह पहिली सहकारी बँक स्थापन झाली.
बँकेत केवळ महिलाच काम करतात आणि आता 'कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेच्या चार शाखा आहेत. ५० हुन अधिक नियमित कर्मचारी महिला आणि ५०,००० खातेदार आहेत आणि बऱ्यापैकी खातेदार ह्या महिला आहेत. ३० हुन अधिक महिला कर्मचारी सरकारी योजनांचा लाभ ह्या निरक्षर महिलांना सांगतात आणि महिला शून्य शिल्लक किंवा २० रुपये इतक्या कमी किमतीने आपली खाती उघडुन आत्तापर्यंत त्यांनी १०,००० हून अधिक महिलांना आणि सुमारे १२०० महिला बचत गटाला कर्ज दिले आहे. गेल्या वर्षातील त्यांची उलाढाल जवळपास ५० कोटीहुन अधिक होती आणि ५० लाख नफा होता. अत्यंत गरीब महिलांच्या ठेवी ह्या बँकेमार्फत चालतात. खासदार किंवा आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी संबंधित सरकारी योजना किंवा त्या संबंधित कामे त्यांच्या बँकेमार्फत केल्या जातात. अधिकाधिक महिलांना मदत मिळावी हाच त्यांचा उद्देश आहे.
आसाम मधील ३३ जिल्ह्यात कमीतकमी १ शाखा उघडण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आसाम सारख्या दुर्गम आणि सुंदर भागात सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भर करणाऱ्या लखिमी बरुआ ह्यांचे कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यासाठी पूर्व राष्ट्रपती डॉ.प्रणव मुखर्जी यांच्याकडुन नारी शक्ती पुरस्कार आणि डॉ.रामनाथ कोविद यांच्याकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लखीमी बरुआ यांचे यश भविष्यातही समाजातील सर्व स्तरातील महिलांना प्रेरणा देत राहील.
महिला सक्षमिकरण करणाऱ्या अशाच एका महिलेवविषयी जाणून घ्या या व्हिडिओमधून 👇