डॉक्युमेंटरी म्हटलं की अनेकदा लोक ती पाहण्याचा प्रयत्नही करत नाहीत. कारण डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट, त्यात मनोरंजन नाही असा एक सर्वसाधारण समज असतो. कदाचित एकेकाळी बनणार्या डॉक्युमेंटरीजमुळेसुद्धा हा समज तयार झाला असेल . पण आता मात्र हे चित्रं पूर्ण बदललं आहे. कुठल्याही कलेचं प्रयोजन हे त्या त्या कलाकाराने व्यक्त होण्याचं हे माध्यम असतं. आणि म्हणूनच डॉक्युमेंटरी या फॉर्मचा वापर जेंव्हा ‘व्यक्त’ होण्यासाठी सुरुवात झाली तेंव्हापासून तिचे स्वरूप, त्यातला आशय पोचवण्याची परिभाषा यातही बदल झाला. डीस्ने हॉटस्टार यावर असणारी ‘ मडू ‘ ही डॉक्युमेंटरी याला अजिबात अपवाद नाही .
नायजेरियातल्या एका अत्यंत गरीब कुटुंबातला अँथनी मडू हा चौदा पंधरा वर्षांचा कोवळा कृष्णवर्णीय मुलगा. बॅले या नृत्यप्रकाराने झपाटून गेलाय. त्याच्या गावात त्याला प्रोत्साहन तर नाहीच उलट अवहेलनाच सोसावी लागली आहे . अशातच त्याने रेकॉर्ड केलेले स्वतःच्या नृत्याचे रील एवढे वायरल होते की लंडन मधील एक प्रतिष्ठित अशी बॅले इंस्टीट्यूट त्याला स्कॉलरशिप देऊन प्रशिक्षणासाठी आमंत्रित करते. तो तिथे शिकायला जातो. एक तास चाळीस मिनिटांच्या या डॉक्युमेंटरी ची ‘ गोष्ट ‘ म्हणाल तर एवढीच आहे !
मनात प्रश्न येतो की मग एवढा वेळ दिग्दर्शकद्वय मॅथ्यु ओजेन्स आणि जोएल कची बेन्सन आपल्यासमोर काय मांडतात ? अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरीजचा विचार केला तर मग त्याची गरीबी , संघर्ष , परिस्थितीशी झगडा आणि यातून ताऊन सुलाखून बाहेर येत त्यानं मिळवलेलं घवघवीत यश! नाही. असलं काहीही हे दिग्दर्शक सांगत बसत नाहीत.
इथे उलगडत जाते ती नात्यांची सुरेख वीण ! अँथनी , त्याची आई , वडील , धाकटा भाऊ , एक बहीण , त्याला शिकवणारे प्रशिक्षक , त्याचे मित्र आणि मैत्रीण या सगळ्यांचा एक सुंदर गोफ आपल्यासमोर गुंफला जातो. साधा आपल्या गावाच्या बाहेरही कुठे ट्रीपला जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती असणारा अँथनी बॅले शिकण्यासाठी हजारो मैल दूर जातो. हा केवळ त्याचा प्रवास नाही तर तो आणि त्याचं कुटुंब यांचा हा भावनिक प्रवास आहे. म्हणूनच रूढार्थाने इथे साचेबंद असा शेवट या डॉक्युमेंटरीला नाही . कारण हा प्रवास अजूनही चालूच आहे. बॅले मधला प्रमुख नर्तक होण्याचं जे अँथनी मडूचं स्वप्नं आहे ते जेंव्हा पूर्ण होईल तेंव्हा निदान त्या टप्प्यापर्यंतचा त्याचा प्रवास पूर्ण होईल असं आपल्याला प्रेक्षक म्हणून नक्की वाटतं.
गायकाने अगदी नजाकतीनं एखादा राग घेऊन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवत मैफिल सजवावी तसाच जिवंत अनुभव इथे आपल्याला येतो. यामधल्या चित्रंचौकटी या आपल्याही नकळत प्रतिकात्मक होत जातात . त्यातलं संगीत हे तर त्याच्या अंगचाच एक अविभाज्य भाग आहे . ते जर वजा केलं तर सगळं काही सपक होऊन जाईल. तशीच या संपूर्ण फिल्मच्या एडिटिंग ला ही एक अंगभूत अशी लय आहे . ती लय कुठेच तुटत नाही . त्यामुळे प्रेक्षकाला हिसके बसत नाहीत .
अँथनी आणि त्याची आई यांच्यातल्या अमिट ओढीची आणि नात्याची गोष्ट इथे दिसतेच पण त्याचबरोबर आपला मोठा भाऊ दूर गेल्यामुळे एकट्या पडलेल्या धाकट्या भावाचं मनसुद्धा दिग्दर्शकांनी अत्यंत संवेदनशीलतेनं टिपलं आहे. सर्वसाधारणपणे आई आणि मुलगा या नात्याचं जितकं सहज भावनिक चित्रण खर्या किंवा काल्पनिक गोष्टीत आढळतं तितकं वडील आणि मुलगा यांच्यातल्या नात्याचं मात्र अभावाने केलेलं दिसतं. पण मडू मात्र याला काहीशी अपवाद आहे .
आपली मोडकी मोटर सायकल दुरुस्त करीत बसलेले त्याचे वडील आपल्याला सांगताना दिसतात की , “ तो ( अँथनी ) इतका माझ्या मनात आहे की तो जणू कुठे दूर गेलेलाच नाहीये “ या वेळी त्यांच्यापासून काही अंतरावर तिथेच थोडं दूर बॅलेमधल्या काही अतिशय डौलदार स्टेप्सची आपल्याचा नादात प्रॅक्टीस करणारा अँथनी आपल्याला फ्रेम मध्ये दिसतो . वडील तिकडे वळून बघतात. आणि जेंव्हा त्यांच्या रेफेरन्स मधून कॅमेराही त्याचा अँगल बदलतो तेंव्हा तिथे कुणीच नसतं... असते ती फक्त रिकामी चौकट ! केवळ काही सेकंदांचा हा शॉट पण जीवाला चटका लावून जातो...
एखादी गोष्ट पाहताना , दारिद्र्य , हालअपेष्टा, व्यक्ति किंवा मग परिस्थिती अशी जी काही नेहमी आढळणारी खलपात्रे असतात तशी इथे काही नाहीत . जे आहे त्याचा अत्यंत सहज असा स्वीकार आहे. कुठलाच कटुपणा नाही . “आपण कुठून आलो आहोत याचा कधी विसर पडू देऊ नकोस “ हा अँथनीच्या आईने त्याला दिलेला मंत्र कुठेतरी आपल्याही मनात नकळत रुजून जातो . म्हणूनच इंग्लंड मध्ये गेल्यावर ताबडतोब तिथले उच्चार अँथनीने आत्मसात केल्याचं तिला जेवढं अप्रूप आहे तितकीच नायजेरियातली त्यांची भाषा त्याने शिकावी ही तळमळपण तिला आहे .
खर्याखुर्या माणसांची खरीखुरी गोष्ट जेंव्हा आपण प्रत्यक्ष पडद्यावर बघतो तेंव्हा त्याला एक प्रामाणिकपणाचे अधिष्ठान असते. त्यात दिसणारी घरं, घरातल्या गोष्टी , माणसं , त्यांचे चेहरे , चेहेर्यांचा , डोळ्यांचा पोत या गोष्टी अस्सलपणाचा अनुभव देतात . आणि त्याच बरोबर जेंव्हा त्याला जेंव्हा संवेदनशील दिग्दर्शनाची जोड लाभते तेंव्हा तो केवळ माहितीपट न राहता त्याला कलाकृतीचं स्वरूप प्राप्त होतं. ‘मडू’ ही अशीच कलाकृती आहे .
कधी कधी प्रेक्षक म्हणून आपणच आपल्या काही चौकटी ठरवलेल्या असतात . सुरुवात -मध्य -शेवट या चौकटीत ‘मडू’ बसणारी नाही, म्हणूनच की काय एंड स्क्रोल संपल्यावरही ती आपल्या मनात चालूच राहते!