पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल - Welcome to Swayam Talks
×

पिप्लंत्री ग्रामदूत – पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

सर्वेश फडणवीस

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी कमावलेलं धन हे आर्थिक संपत्तीच्या नाही तर नैसर्गिक संपत्तीच्या स्वरुपात आहे आणि वैयक्तिक नाही तर सामाजिक आहे. या श्यामसुंदराने वसुंधरेला नेमका काय नजराणा बहाल केला आहे ते सविस्तर जाणून घेऊ.
 

Published : 3 May, 2024

पिप्लंत्री ग्रामदूत –  पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

Get Better Each Week #45

राजस्थानमधील पिप्लंत्री ह्या गावातील माजी सरपंच श्री श्यामसुंदर पालीवाल यांना २०२१ साली त्यांच्या अलौकिक समाजकार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत करण्यात आले. आदर्श ग्राम संकल्पना त्यांनी ज्या पद्धतीने साकारली, त्याचे कौतुक आज जगभरात होत आहे आणि देशातील आदर्श गाव म्हणून पिप्लंत्री सर्वमान्य झाले आहे. 

श्री श्यामसुंदर पालीवाल ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये येऊन गेले, तेव्हा अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या कामाचा गौरव केला आणि ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा त्यांच्या कामाला शाबासकी दिली आहे. श्यामसुंदर पालीवाल यांचे कार्य खरंतर सहज सोपे वाटावे असे आहे. आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर आपण काय करतो? काही जण आनंदीत होतात आणि त्या आनंदात मिठाई-पेढे वाटतात, काही जण मुलगीच झाली म्हणून निराश होतात, पण राजस्थान मधील पिप्लंत्री गावात मुलगी झाली तर १११ झाडे लावली जातात. ऐकून आश्चर्य वाटेल पण आजही तिथे मुलीच्या जन्माचे स्वागत १११ झाडे लावूनच केले जाते. कालांतराने ती झाडे सगळेजण एकत्रितपणे जगवतात आणि त्यामुळे कौटुंबिक सदस्य आणि मित्रपरिवार एकत्र येत मुलीच्या शिक्षणाची सोयही केली जाते. 

भाजप प्रणीत केंद्र सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रम २०१४ मध्ये सुरू केला. या उपक्रमाचे स्वागत देशात सर्वदूर झाले परंतु, पिप्लंत्री गावात त्याआधी कित्येक वर्षं मुलीचा जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. अनिष्ट रूढी-परंपरा बदलण्यासाठी केवळ धाडस असून उपयोग नाही, तर योग्य विचार, त्याची सामाजिक प्रगतीशी सांगड घालता आली पाहिजे; ज्यायोगे केवळ कौटुंबिक पातळीवर हे बदल मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाने बदल घडेल आणि आता तसे बदलाचे वारे वाहू लागले आहेत. 

कन्या भ्रूणहत्या हा आजही देशासमोर ज्वलंत प्रश्न आहे. राजस्थान प्रदेश नेहमीच आपल्या पुरुषप्रधान संस्कृती, रूढी परंपरा, हुंडाबळी, बालविवाह यांमुळे चर्चेत राहिला आहे. पिप्लंत्री गावामध्येही राजस्थानच्या इतर गावांप्रमाणेच स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण अधिक होतं, कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माबाबत लोक अत्यंत उदासीन होते. श्यामसुंदर पालीवाल ह्यांच्या मुलीचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले आणि आपल्या मुलीच्या निधनाने व्यथित झालेल्या श्यामसुंदर पालीवाल यांनी या गवत परिवर्तनाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नातून आज प्रदेशातील चित्र बदलून सकारात्मक झाले आहे. 

श्यामसुंदर पालीवाल यांनी पिप्लंत्री गावातील लोकांना समजावून, त्यांना प्रसंगी प्रोत्साहन देऊन गावातील घरात मुलगी का हवी ह्याचे महत्त्व पटवून दिले आहे. पिप्लंत्री गावामध्ये एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली की सर्व गावकरी मिळून रु. २१,००० व नवजात मुलीचे पालक रु. १०,००० असे ३१,००० रुपये त्या मुलीच्या नावे मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवतात. या बरोबरच, मुलीचे पालक एक प्रतिज्ञापत्र करतात की ते मुलीला १८ वर्षं पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाहीत, यामुळे केवळ त्या मुलीच्या भवितव्याची आर्थिक तरतूद केली जात नाही तर पालकांवर पण बंधन येते की त्यांनी आपल्या मुलीला सक्षम करून १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मगच तिचे लग्न करायचे आहे. 

या कार्याची सुरुवात श्यामसुंदर पालीवाल हे गावाचे सरपंच झाले त्या २००६ साली सुरू झाली. पिप्लंत्री गावाचा हळूहळू कायापालट होतो आहे. आज पिप्लंत्री गाव हिरवेगार झाले आहे. जवळपास ४ लाखाहुन अधिक झाडे गावात आहेत. वाळवंटातील हा बदल श्यामसुंदर पालीवाल यांनी घडवला आहे. पिप्लंत्री गावात आज वर्षाला जवळपास ५० हून अधिक मुलींचा जन्म होतो आणि प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत १११ झाडे लावून होते. पिप्लंत्री गावात वड, पिंपळ, आंबा, कडुनिंबाची झाडे दूरदूर पर्यंत पसरली आहेत. त्यासोबतच झाडांच्या अवतीभवती कोरफडीची लागवड सुद्धा केली जाते. कोरफडीच्या लागवडीने गावात आर्थिक उद्योग ही उदयाला आला आहे त्यातून गावाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत झाली आहे. 

श्यामसुंदर पालीवाल ह्यांच्या दूरदृष्टी आणि व्यापक विचारांचा सकारात्मक परिणाम पिप्लंत्री गावाच्या रूपाने संपूर्ण जगाला दिसला. खरोखरीच सातत्याने विश्वासाने कार्य करणाऱ्या माजी सरपंच पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांचे जीवन प्रेरणादायी आहे. 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...