गनिमांच्या देखता फौजा
रणशुरांच्या फुरफुरती भुजा
ऐसा पाहिजे की राजा
कैपक्षी परमार्थी
असा राजा शोधण्याचा योग दर पाच वर्षांनी भारतात येतो, ज्याचे पडघम यावर्षी वाजू लागते आहेत. २०२४ हे वर्ष जगाच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे वर्ष आहे, कारण भारतच नव्हे तर इतर सत्तर देशात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अगदी इंग्लंड, अमेरिकेपासून रशिया, युक्रेनपर्यंत देश यावर्षी स्वतःचं पुढील काही वर्षांकरिता भवितव्य लिहिणार आहेत. आज भारत लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे, जगाची एक पंचमांश जनता ही केवळ भरतात आहे. त्यामुळे आपल्या देशातील २०२४ सालची निवडणुक जगातल्या दर पाचव्या व्यक्तीवर प्रभाव करेल आणि म्हणूनच तिच्याकडे संपूर्ण जगाचं अतिशय बारकाईने लक्ष आहे. अशा देशात ही निवडणूक उत्सवाचे, उत्साहाचे एक कारण घेऊन आली आहे.
संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते मिळवण्यासाठी झटलेले सर्व विचार प्रवाह इंग्रज निघून गेल्यानंतरही देशात सक्रिय होते, पुढे ते फोफावले आणि त्याला आणखीन फाटे फुटले. शत्रू जोपर्यंत बाहेरचा आहे तोपर्यंत त्याच्याशी दोन हात करता येतात, मात्र आपल्या घराच्या सिमे अलीकडचे संघर्ष हे निराळ्या पद्धतीनं लढले जातात, त्यात समाजहिताचा भाग अधिक असतो. आजपर्यंत देशात अनेक प्रभवांच्या लाटा आल्या आणि निघून गेल्या, मात्र भारतासारखा वैविध्यपूर्ण देश या लाटांना कधीच आहारी गेला नाही, त्यानं प्रत्येकवेळी राजकारणाची दिशा बघितली, उमेदवाराला चाचपलं, ज्यानं काम केलं त्याला डोक्यावर घेतलं आणि नाही त्याला अक्षरशः धुळीत मिळवलं. अनेकदा इथल्या जनतेला गृहीत धरलं गेलं, फसवलं गेलं, मात्र हे जनमत इतकं ठाम आहे की त्यानं वेळ येताच ‘इथला खरा राजा कोण?’ हे प्रत्येकवेळी दाखवून दिलं. आपण भाग्यवान आहोत, की लोकशाही सारखी पद्धती आपण अवलंबली. कारण हीच एकमेव पद्धती अशी आहे जी खऱ्या स्वातंत्र्याला फुलू देते. असे अनेक देश या पृथ्वीवर आज आहेत, ज्यांना तिथल्या व्यवस्थेनं आभासी स्वातंत्र्याच्या बुडबुडबुड्यात बंदिस्त ठेवलं आहे; एकविसाव्या शतकात ते एकप्रकारे गुलामाचं जिणं जगत आहेत. सरकार कुठलंही असो भारतात आपण ‘इथे लोकशाही नाही!’ हेसुध्दा जाहीरपणे म्हणू शकतो, हेच लोकशाही असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे या ‘असलेल्या’ लोकशाहीचा सण म्हणजे निवडणुका, ज्या यावर्षी येऊन ठेपल्या आहेत!
‘भारतीयांकडून त्यांचा इतिहास हिरावून घ्या, म्हणजे ते सहज तुमचे गुलाम होतील!’ ही नीती इंग्रजांनी आपापसात ठरवली, अवलंबली आणि आपण ती सहज विषासारखी भिनू दिली. वर्तमानाच्या आणि भविष्याच्या कचाट्यात सापडल्या जनतेला इतिहासाशी फारसं देणंघेणं उरलं नाही, मात्र हीच धोक्याची सूचना आहे, इंग्रज अजूनही देशात, देशवासियांच्या मनात आहे याची! त्याला समूळ उपटून टाकायचा असेल, तर हाच इतिहास आपण जाणून घ्यायला हवा. आज राजकारणात एखादा निर्णय होतो, एखादा वाद उसळतो, त्याची मुळं पार खोल त्या भूतकाळात जाऊन पोहचली असतात याचा अंदाज बऱ्याचदा आपल्याला येत नाही. ‘मला फरक पडत नाही!’ म्हणून राजकारण आज टाळून चालणार नाही, कारण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ते आपल्या वैयक्तिक प्रगतीचे तसेच अधोगतीचे उद्या कारण ठरू शकते आणि म्हणूनच इतिहासाला डावलून चालणार नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर थेट आता ‘मोदींची हवा आहे‘ या दोनच गोष्टी ज्यांना परिचित आहेत, त्यांनी देशाच्या इतिहासाचा आढावा कधीतरी घ्यायला हवा. कुठल्याही नेत्याचा देव किंवा दानव करण्यापूर्वी त्याचा, त्याच्या पक्षाचा इतिहास समजून घ्यायला हवा. आणीबाणी आली म्हणजे नक्की काय झालं? आजची भाजपा नक्की घडली कशी? काँग्रेसचे धोरण नक्की इतकी वर्ष काय होते? कुठल्या नेत्यांच्या निर्णयांमुळे देशात कुठे-कुठे काय-काय घडले? याची उत्तर आपण शोधायला हवीत, तेव्हाच आपण यावर्षी आवर्जून जाऊन जो मतदानाचा अधिकार बजावणार आहोत, त्याला खरा अर्थ येऊन बोटावर लागणाऱ्या शाईत जबाबदारीचा जाणीव-रंग मिसळेल.
आज ही निवडणूक आली महिन्यावर, आता केव्हा हा इतिहास समजून घेणार? केव्हा तो वाचणार? केव्हा स्वतःची मतं बनवणार? याचंच उत्तर आज ‘स्वयं‘कडे आहे! कारण भरातीयांना हाच भारतीय निवडणुकीचा, राजकारणाचा आणि राज्यकर्त्यांचा इतिहास कळावा म्हणून ते घेऊन येतायत ‘UNbiased with UN’ ही अत्यंत महत्वाची मालिका त्यांच्या ॲप्लिकेशनवर, जी तुम्हाला देईल भारतीय निवडणुकांचा विस्तृत आढावा एकूण १४ माहितीपूर्ण भागांतून! आणि ही माहिती देणार आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. उदय निरगुडकर, त्यामुळे ती रुचकर आणि बेधडक पद्धतीनं मांडली जाणार यात काहीच शंका नाही. येत्या १९ एप्रिलला या मालिकेचे सर्व भाग श्रोत्यांना ‘स्वयं’च्या ॲपवर बघता येतील, त्याचप्रमाणे कालांतराने ते युट्यूबवरही दाखवले जातील. तेव्हा ‘आपण एक सजग नागरिक आहोत’ हे जर स्वतःला पटवून द्यायचं असेल, तर मतदानापूर्वी ही मालिका बघणं आणि भारतीय निवडणुकांचा इतिहास समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे.
तेव्हा आपण आज मतदान करण्यापूर्वी एक चेकलिस्ट का बनवू नये? आपले उमेदवार कोण आहेत? कुठल्या पक्षाचे ते आहेत? त्यांचे कार्य काय? या प्रश्र्नांसोबच आपल्याला भारतीय निवडणुकांचा इतिहास माहितीये का? आणि आता अत्यंत्त महत्वाचं, स्वयं निर्मित ‘Unbiased with UN’ ही मालिका त्यांच्या ॲपवर पहिली का?
हे प्रश्न चेकलिस्ट मध्ये समाविष्ट करून जबाबदारीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकूया!