कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेत, घरात महापूर आलेल्या एका व्यक्तीला आधारासाठी एखाद्या जवळच्या मित्रापासून ते जवळच्या व्यसनाच्या दुकानापर्यंत कुणाचीही आणि कशाचीही सोबत वाटू शकली असती, मात्र त्याला आठवण आली ती एका शिक्षकाची, इथे ‘कविते’चा श्वास आहे! ही आठवण केवळ भूतकाळात त्या शिक्षकाने परीक्षेत दिलेल्या चांगल्या गुणांमुळे येणं हे शक्य नाही! मुळात शाळा केव्हाच मागे सुटलेल्या एका व्यक्तीला आपल्या शिक्षकाचं दार ठोठावसं वाटणं आणि वाटल्यानंतर त्याला ते वाजवता येणं, ही किती निर्मळ, सुंदर गोष्ट आहे. घरात घुसखोरी केलेल्या गोदावरीच्या पुराच्या पाण्याला ‘माहेरवाशिण मुलीसारखी चार भिंतींत नाचली’ असं म्हणू शकणारं सकारात्मक मन घडवरा हा हाच शिक्षक-मित्र आहे; त्यासोबतच ‘पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला’ म्हणताना त्याच्यात दिसणारी स्वाभिमानाची चमक ही त्या शिक्षकाप्रति जिव्हाळा-आपुलकी दर्शवते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. ‘पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा!’ या एका कवितेच्या ओळीत, त्या शिक्षकाने या पूर्वीच्या विद्यार्थ्याच्या (ज्याचा चेहराही त्याला फारसा लक्षात नाही) आयुष्यात नक्कीच काही विलक्षण योगदान दिलं असणार हे आकळून येतं. त्यानं नक्कीच गणित शिकवताना त्या अंक, आलेख, आकृत्यांपालिकडे जाऊन जीवनाचं अगणित त्याला शिकवलं असणार यात शंका नाही. त्यामुळे ‘कणा’ ही जितकी एका विद्यार्थी-पिढीची कविता होते, तितकीच ती एका शिक्षक-पिढीची देखील कविता होते हे आपण समजून घ्यायला हवं.
जन्माला आल्या जीवाचा एक दिशा पकडून प्रवास सुरू झाल्यानंतर कुणालाही रेंगाळावसं वाटेल असं जे मध्ये फलाट येतं ते ‘तरुण्या’चं! आयुष्यातला हा एक असा कालावधी असतो ज्याची धुंदी नंतरही काही केल्या उतरत नाही. उड्डाणाच्या संधी आणि मोहात बांधू पहाणारे मृगजळ हे याच वयात एकत्र असे समोर येते, अशावेळी त्या उर्जेनं भरलेल्या आणि भारलेल्या हातात कुणी विश्वासाचा हात दिला तर त्या तारुण्याचा प्रवास जरा सुरळीत होतो.
भारत हा तरुणाईचा देश आहे. ही नवी शक्ती देशाला उद्याचा सूर्य दाखवणार आहे, परंतु या तरुणाईला दिशा देणाऱ्या, आधार देणाऱ्या, धीर देणाऱ्या गुरूंची संख्या आज या देशात किती? हा कळीचा मुद्दा आहे. भारतात गुरूशिष्याचं नातं हे परंपरा म्हणून मानलं जातं, जपलं जातं. ‘गुरू’चं पद हे अढळ असं, तिथपर्यंत पोहोचायला व्यक्तीनं साधनाच करायला हवी. त्यामुळे आत्ताच्या धकाधकीच्या काळात ती एखाद्याला करणं कितपत शक्य आहे, हा जरी प्रश्न असला, तरी त्या पदाची आवश्यकता आज कमी होत नाही. किंबहुना तंत्रज्ञानाच्या युगात ती शतपटीनं वाढली आहे!
एखाद्या पिढीकडे बोट दाखवून तिच्या वागण्या-बोलण्यातल्या, रीतीभातीतल्या चुका काढणं आणि नावं ठेवणं हे सगळ्यात सोपं काम आहे, परंतु मेहनत लागेल ती त्यांचं मित्र होण्यात, त्यांना समजून घेण्यात, संवादाच्या पातळीवर येऊन त्यांचं मन जाणून घेण्यात. समाजातल्या बदलांमुळे, स्वतःतल्या मर्यादांमुळे गुरू होणं जरी एखाद्याला शक्य नसेल, तरी मित्र होण्यासाठी ‘मना’शिवाय अशी वेगळी कुठली तयारी लागते असं वाटत नाही; जी आता आपल्यातल्या सजग जनांनी करायला हवी.
आजची तरुण पिढी स्वाभाविकपणे बदलली आहे आणि हा बदल चांगला-वाईट ठरवणारा काळ अजून यायचा आहे, मात्र तोपर्यंत तिच्यात झालेला बदल स्वीकारणं व त्यानुसार स्वतःत अपेक्षित बदल करणं हे आजच्या काळात अपेक्षित आहे. पिढी कितीही व्यावहारिक झाली तरी माणूस हा मुळात सामाजिक प्राणी आहे, त्याला समाजाची, माणसांची गरज ही भासतच राहणार आहे, त्यामुळे ही पिढीसुद्धा त्याला अपवाद असू शकत नाही. यांत्रिक झालेल्या हृदयाला माणुसकीचा, मित्रत्वाचा स्पर्श होताच तिथेही नवी पालवी फुटेल, इतकी क्षमता आजच्या या तरुण पिढीत आहे एवढं नक्की, फक्त त्याची तयारी आजच्या शिक्षक, पालक असणाऱ्या समाज-पिढीने करायला हवी. तरूणांवर अपेक्षांचं ओझं लादण्यापूर्वी त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा कुठल्या हे जर आपण थोडं थांबून समजून घेतलं, तर भविष्यातील अनेक समस्या वर्तमानातच सुटतील.
सुरेश भट साहेबांचा एक शेर याठिकाणी आठवतो. ते म्हणतात-
‘जरी या वर्तमानाला कळे ना आमची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’
या वर्तमानातील पिढीकडे विजेची उर्जा आहे. जर योग्यवेळी जाणत्या जनांनी तिला योग्य दिशा दिली, तरी यांची घरं आतून उजळतील, नाहीतर हीच घरं आतून जळतील. त्यामुळे त्यांची भाषा, तिचा गाभा समजून घेण्याची आत्यंतिक निकड आहे. आज पश्चिमी राष्ट्रांत फोफावला चंगळवाद हीच भाषा चुकीच्या पद्धतीने डिकोड केल्याची खूण आहे, जर आपल्याला इथे ते होऊ द्यायचं नसेल तर संवाद महत्वाचा, त्याहूनही अधिक समजूत महत्वाची!
सुरुवातीला उल्लेख केल्या त्या वयात, हेलकांडणाऱ्या जहाजाचं शीड घट्ट पकडणारा दिशादर्शक ‘मेंटोर’ योग्यवेळी गवसला तर ते जहाज अपेक्षित स्थळी सुरक्षित पोहोचू शकेल. आज असे मेंटोर आजूबाजूला निर्माण व्हायला हवेत, त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांनी, मग ते कॉर्पोरेट क्षेत्रातील असतील किंवा सरकारी, ते कलाकार असतील किंवा वकील, आपापल्या कोशातून बाहेर पडून आज ती जबाबदारी घ्यायला हवी. आज घराघरातील बुजुर्ग व्यक्ती म्हणजे ज्ञानाचा साक्षात खजिना आहेत, तो आज उघडला जायला हवा. ‘आमचा रामराम घ्यावा’ची वाट बघण्यात उर्वरित जीवन व्यतीत करण्यापेक्षा तरुणाईच्या जीवनात हा कार्याचा ‘राम’ कसा पेरता येईल याचा विचार करत, त्यांनी केलेली कामं, त्यातून आलेला अनुभव, मिळालेले धडे, घेतलेली शिकवण या पिढीपर्यंत त्यांच्या भाषेत, त्यांच्या जवळ जाऊन या पिढीनं पोहोचवायला हवी, जेणेकरून त्यांच्यातील ‘स्वयं’ तरुणांना योग्य वयात गावसेल!