कथा एका उध्वस्त कट्ट्याची - Welcome to Swayam Talks
×

कथा एका उध्वस्त कट्ट्याची

प्राची कर्णिक

आपल्या आभासी जीवनाचे एक अविभाज्य अंग असलेले सध्याचे व्हाट्सअप ग्रुप्स म्हणजे आनंदनिर्मितीचे एक साधन आहे. पण तारतम्य न बाळगता त्याचा होणारा वापर हा प्रसंगी त्रासदायक ठरु शकतो, सांगतेय प्राची कर्णिक.
 

Published : 10 May, 2021

कथा एका उध्वस्त कट्ट्याची

झाडावर लोंबकळत असलेले प्रेत नेहमीप्रमाणे राजा विक्रमादित्याने उचलले, पाठीवर घातले आणि तो पुन्हा स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेताच्या आत बसलेला वेताळ शांतपणे चालणाऱ्या राजाशी बोलू लागला. वेताळ म्हणाला, “राजा आज तुला मी एक गोष्ट सांगतो. ऐकत असताना तू एक शब्दही बोललास तर मी पुन्हा झाडावर निघून जाईन.” वेताळ बोलू लागला, “एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक अत्यंत कीर्तीमान असे विद्यासंकुल होते. त्या विद्यासंकुलाची महती शतकोत्तर होती. त्या विद्या संकुलात शिकलेले अनेक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी त्यांच्या जीवनाच्या पुढील वाटचालीत अत्यंत यशवंत आणि धनवंत झाले होते. असेच काही विद्यार्थी भावी काळात एकमेकांच्या संपर्कात आले. खूप काळानंतर भेटल्यामुळे जुन्या आठवणींच्या मधुर वर्षावात ते सर्व न्हाऊन निघाले. त्यांनी विचार केला की हे सुख आपण आपल्या इतर सहकाऱ्यांनाही दिले पाहिजे आणि यातूनच एक कल्पना जन्माला आली, ती म्हणजे एक सुरेख कट्टा बांधायची. प्रयत्नपूर्वक त्यांनी त्यांच्या सगळ्या जुन्या सहकार्‍यांची माहिती काढली, त्यांच्याशी संपर्क साधला आणि कट्टा बांधण्याच्या कार्याला सहकार्य करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. म्हणता म्हणता कामाची माहिती एकाकडून दोघांना, दोघांकडून चौघांना अशी सर्वत्र पसरत गेली आणि स्वेच्छेने जमा झालेल्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांनी मिळून एक स्मरणीय कट्टा बनवला. मोठ्या हौसेने त्याला आपल्या विद्यासंकुलाचे नावही दिले. रोज दिवसातून एकदा तरी प्रत्येक जण कट्ट्याला भेट द्यायला लागला. ते सगळे एकमेकांच्या गोष्टी समजून घेऊ लागले. मधला काळ जणू गळून पडला होता, पुसला गेला होता. एकमेकांच्या कुटुंबीयांची विचारपूस, जुन्या आठवणी, वाढदिवस, आपल्या मुलांचे यश असं सगळंच या कट्ट्यावर ते एकमेकांना सांगू लागले. तसेच दुसऱ्या कट्ट्यावर ऐकलेले, पाहिलेले काही सुंदर विचार, चांगले लेख, उत्तम वृत्तांकन हेही या कट्ट्यावर एकमेकांच्या कानावर ते घालू लागले. म्हणता म्हणता बराच काळ व्यतीत झाला. कट्ट्यावर सर्वत्र आनंदीआनंद होता.

कालांतराने वातावरण बदलायला सुरवात झाली. हळूहळू काही सहकारी अशा काही गोष्टी या कट्ट्यावर सांगू लागले की ज्यांच्यामुळे अन्य सहकारी दुखावले जाऊ लागले. या कट्ट्याचा मूळ उद्देश हा जुन्या सहकाऱ्यांच्या एकत्र भेटण्याचा, चार घटका आनंदाने घालवण्याचा होता. पण हळूहळू कट्ट्याचे वातावरण गढूळ होऊ लागले. राजकारण आणि धर्मकारण यांची बजबजपुरी माजली आणि मतमतांतराचा अतिरेक कट्ट्यावर होऊ लागला. जणू हे सहकारी नव्हे तर एकमेकांचे कट्टर शत्रूच होते. शब्दाने शब्द वाढू लागला तेव्हा मात्र कट्टा सांभाळणारा सहकारी सर्वांसमोर काही पर्याय सुचवायला लागला. पण काही दिवस ठीक केल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होई. शेवटी काहीच पर्याय न उरल्याने परस्परसामंजस्य कमी होत गेले. ज्या उद्देशाने कट्ट्याची निर्मिती झाली होती तो उद्देश सफल न झाल्याने तिथे येणाऱ्यांची संख्या रोडावत गेली. कधीतरी एकदोन लोक डोकावून जात पण एकंदर निस्तब्धता पसरली होती. जणूकाही तो कट्टा उध्वस्त केला गेला होता.

विक्रमादित्य म्हणाला, “वेताळा!! कट्ट्याची निर्मिती ही स्मरणरंजनाच्या उद्देशाने जरी झाली असली तरी त्या उद्देशांची स्पष्ट कल्पना त्या कट्ट्याची निर्मिती करणार्‍यांनी कट्ट्यावर भेटणाऱ्यांना दिली नसल्याने, दुसऱ्या कट्ट्यावरील जे योग्य वाटले, भावले, ते याही कट्ट्यावर सांगायला त्यांना सुरुवात केली. कट्टयाचा उद्देश स्पष्ट नसल्याने, जरी पटले नसले तरी, सर्वच सहकारी विरोधही करु शकत नव्हते कारण एकच … अवास्तव व्यक्तिस्वातंत्र्य !!

विद्या संकुलात शिकणारे त्यावेळेचे ते कोवळ्या वयाचे विद्यार्थी, ज्यांचा अनुभव, आकलनशक्ती आणि मतांबद्दलचा आग्रह अपरिपक्व असतो. अशा वेळची ही मैत्री वेगळ्या वातावरणात, वेगळ्या उद्देशाने फुललेली असते. असे सहकारी जेव्हा बऱ्याच काळाने एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बराचसा बदल झालेला असतो. प्रत्येकाला आलेले अनुभव, त्या अनुभवातून प्रत्येकाने काढलेले अर्थ आणि घडलेले बिघडलेले आपले व्यक्तिमत्व हे सर्वस्वी वेगळे असू शकते. अशा व्यक्तिमत्त्वाला विद्यासंकुलातील त्याकाळच्या कोवळ्या व्यक्तींच्या आठवणींशी बांधून ठेवणे हे अनैसर्गिक आहे.

आटपाट नगरातील व्यक्तींचा एक महत्त्वाचा दोष येथे अधोरेखित होतो तो म्हणजे त्यांना राजकारण, धर्मकारण हे स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आल्याने, त्या नातेसंबंधांत ते एखाद्या धारदार कात्रीप्रमाणे वापरले गेले. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, कुठल्या गोष्टी कुठे, कधी आणि किती प्रमाणात सांगायच्या याचे तारतम्य कट्ट्यातील सर्व व्यक्तींनी बाळगणे आवश्यक होते. अत्यंत उच्चशिक्षित, विद्याविभूषित व्यक्ती आपल्या आयुष्याच्या प्राथमिक उद्देशाबद्दल द्विधा मनस्थितीत असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच दुसऱ्याच्या विचारांशी जे सहानुभूती दाखवत नाहीत, ज्यांची सहकार्याची भावना नष्ट झाली आहेत, जे सांगूनही न समजल्यासारखे करतात आणि आचरणातूनही त्याचा प्रत्यय देत नाहीत अशा सहकाऱ्यांनी बांधलेल्या कट्ट्याचे असे ओसाड पडणे आणि पर्यायाने उद्ध्वस्त होणेच योग्य आहे. आणि हो !! हा एक मोठाच धडा आहे बाकीच्या कट्टाधारकांसाठीसुद्धा.

राजाचे हे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, “राजा तू हुशार आहेस आणि तू दिलेले उत्तर बरोबरच आहे. पण तू बोललास आणि म्हणूनच मी चाललो.” असे म्हणत वेताळ विक्रमादित्याच्या पाठीवरून निघून पुन्हा झाडावर लटकू लागला..

- प्राची कर्णिक

स्वयंच्या पाहुण्या लेखिका या प्रासंगिक वैचारिक लेखन करत असतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...