तुमच्याकडे ‘काय-अप्पा’चे किती समूह आहेत ?
गोंधळलात ? आपलं व्हाट्स अॅप हो !! म्हणजे बघा बरं…. “ मित्रमंडळी “, “ घरचे “, “फॅमिली मॅटर “ नंतर मग “जागृती “ , “ कट्टा “ असे किंवा याच्या जवळ जाणारे जे ग्रुप्स असतात त्यापैकी आपण निदान (आणि किमान ) दहा पंधरा ग्रुप्सवर तरी असतोच असतो . यापैकी प्रत्येकग्रुपवर किमान एक पोस्ट जरी रोज असं म्हटलं तर ते बघणे आले . मग इंस्टा , एफबी , एक्स , स्नॅप चॅट , यू ट्यूब अजून किती किती आणि काय काय ... आपला स्क्रीन टाइम वाढतोय .. “तुझं लक्ष कुठे असतं ? येऊन जाऊन सारखं त्या स्क्रीनवर ... “ असले टोमणे ऐकणं हा नित्याचा भाग होतो. डिजिटल डिटॉक्स करायलाच पाहिजे अशी भावना तयार व्हायला लागते. पण ते काही जमत नाही .
पण मी जर म्हटलं , यातलं काहीही कमी करू नका . सगळं , हो हो अगदी सगळं सगळं तुम्ही पाहा आणि तरीही तुमचा स्क्रीन टाईम हा आपण कमी करू शकू . can you believe it ? अर्थातच नाही ! पण हे खरोखर शक्य आहे !
परिटो लॉं , किंवा परिटो प्रिंसिपल किंवा मग अगदी साधं सांगायचं झालं तर याला एट्टी ट्वेंटी प्रिंसीपल म्हणतात ते तुम्ही ऐकलं आहे का ? काही जणांनी नक्की ऐकलं असेल . पण मग ते इथे कसं काय बुवा लागू पडतं ? लागू पडतं .
आपण बर्याचशा गोष्टी करीत असतो आणि आपल्याला नेहमीच असं वाटत असतं की यात एक समतोल साधला आहे . म्हणजे आपण आपल्या व्हाट्स अॅपचच उदाहरण घेऊ . इतक्या गोष्टी आपण बघत असतो . त्यात “ बघता बघता “ किती वेळ जातो हेच कळत नाही. आपल्याला अगदी फटकूनही राहता येत नाही . मग ? आपण स्वतःलाच सांगत राहतो . मी वेळेची बरोबर वाटणी केलीय . माझ्या एकूण वेळेच्या केवळ निम्माच वेळ मी मोबाईलवर घालवतो .पण ते खरं नसतं . कारण ही वाटणी फिफ्टी फिफ्टी कधीच नसते . कधी ती साठ चाळीस , सत्तर तीस , नव्वद दहा अशी कशीही असते . पण जगभरातला यातला अभ्यास बघितला तर ती बहुतेक वेळेस ऐंशी आणि वीस यांच्या आसपासच असते .
एट्टी ट्वेंटी प्रिंसीपल असं सांगतं की तुम्ही तुमचं ऐंशी टक्के वेळ जो यात खर्च करता त्यातून तुमच्या दृष्टीने खरे कामाचे फक्त वीस टक्के एवढेच असते . याचाच दूसरा आणि सोपा अर्थ असा की तुम्ही यासाठी केवळ तुमचा वीस टक्के वेळ जर दिलात तर तुमचे ऐंशी टक्के वेळ वाचू शकतो .
मुळात एट्टी ट्वेंटी प्रिंसीपलचा पाया हा असमान वाटणी हा आहे . वाटणी , मग ती पैशांची , वेळेची , अशी कशाचीही आहे . गम्मत म्हणून सांगायचं तर आठवून बघा पैशांच्या अफरातफरीच्या ऐंशी टक्के गुन्ह्यात केवळ मोठी नामचीन अशी वीस टक्केच मंडळी गुंतलेली असतात ! जाऊ दे फार लांब नको . क्रिकेटमध्ये आपले वीस टक्के प्लेयर्स एकूण धावांच्या ऐंशीटक्के धावा करतात . ( पाच सात टक्के अलीकडे पलीकडे एवढच ). एखाद्या कंपनीची वीस टक्के प्रोडक्टस ही ऐंशी टक्के उत्पन्न आणीत असतात तर एखाद्या दुकानदाराचे वीस टक्के मोठे कस्टमर्स हे त्याच्या एकूण धंद्याच्या ऐंशी टक्के खरेदी करीत असतात . रिचर्ड कोच या ब्रिटिश मॅनेजमेंट कन्सलटंटने 1996 साली The 80/20 Principle ( The secret to achieving more with less ) हे पुस्तक लिहिलं . तसं पाहायला गेलं तर पुस्तकाचा हेतु हा मॅनेजमेंट शी संबंधित विषय म्हणजे जसे स्ट्रॅटजी ,प्रॉडक्शन , क्वालिटी ,कॉस्ट , टाईम , मार्केटिंग , सेलिंग , इनव्हेंटरी अशा गोष्टींशी निगडीत असला तरी आपली बदललेली जीवनशैली , जगण्यात आलेला अपरिहार्य असा वेग यांचा जर विचार केला तर या पुस्तकाचा उपयोग हा केवळ व्यावसायिक न राहता आज तो आपल्या आयुष्याचाच भाग होऊ शकतो हे नक्की !
आता पुन्हा येऊया आपल्या व्हाट्स अॅप च्या वेळावर . खरोखर विचार करून बघाच एकदा . आपले जे अनंत ग्रुप्स आहेत त्यातले खरोखर जे आपण न चुकता पाहिले च पाहिजे किंवा चेक केले च पाहिजेत असे किती आहेत ?? तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण ते वीस किंवा फार फार तर पंचवीस टक्क्याच्या पुढे नसतील . तेव्हडेच बघा . तुमचा ऐंशी टक्के वेळ वाचतो की नाही ते बघा . आणि मग हेच तत्व एफ बी , इंस्टा सगळ्यांना लावा . एवढच नाही तर अगदी घरातली कामं, ऑफिसची कामं याकडेही या दृष्टीने बघा . मग तुमचं तुम्हीच ठरवू शकता , खरंच आपला किती वेळ वाचतो ते !!