तुमचं अशक्यप्राय स्वप्न कोणतं आहे? - Welcome to Swayam Talks
×

तुमचं अशक्यप्राय स्वप्न कोणतं आहे?

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 15 December, 2023

तुमचं अशक्यप्राय स्वप्न कोणतं आहे?

Get Better Each Week #26

तुम्ही हल्लीच स्वतःला आरशात पाहिलंत. कानामागचे काही केस पांढरे झालेत. ते पाहून तुमचा चेहरा त्या केसांहुन जास्त पांढरा पडला. तुम्ही धावत जाऊन ट्रेन पकडलीत. पुढचं स्टेशन आलं तरी तुम्हाला लागलेला दम थांबला नव्हता. तुम्ही एका उंच स्टुलावर कसेबसे चढलात. तुम्हाला आता पूर्वीसारखी खाली टुणकन उडी मारता येणार नाहीये. मोठ्यांदा गायला गेलात आणि लक्षात आलं की आता गळ्यातून पूर्वीसारखी जागा जात नाहीये. मोबाइलवरचं, पुस्तकातलं थोडंसं अंधुक दिसतंय. आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना आपण म्हातारं झाल्याचं घोषित करतीये. आपण म्हातारे होतोय, म्हातारे झालोय हे फिलिंग तुम्हाला कुरतडत असेल तर नेटफ्लिक्सने खास तुमच्यासाठी एक सिनेमा आणलाय - Nyad - नयाड !

Mid life crisis, वार्धक्य या शब्दांच्या अक्षरशः चिंधड्या उडवणारा आणि तुम्हाला पुन्हा एकदा पंचवीस वर्षांनी तरुण करणारा हा सिनेमा तुम्ही पाहायला हवा. 

६४ वर्षांच्या डायना नयाडने क्युबा ते फ्लोरिडा हे १०३ मैलांचे (१६५ किमी) अंतर ५३ तासांत कसे पूर्ण केले त्याची ही गोष्ट आहे ! तेही मागच्या तीन वर्षांत, तेच अंतर पोहत असताना चार वेळा पराभव पत्करून ! 

१९४९ साली अमेरिकेत जन्मलेल्या डायना नयाड या स्त्रीने स्विमिंगमध्ये गाजवलेल्या एका भीमपराक्रमाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अधिक रंजक असतं या वाक्याची प्रचिती येईल असा हा दोन तासांचा सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. डायना ही तरुणपणी एक उत्तम स्वीमर होती. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत तिने ‘long distance swimming’ करून त्यात काही रेकॉर्ड्स प्रस्थापित केले होते. त्यांनतर मात्र तिने ब्रेक घेतला. तो चक्क वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत ! मधली बत्तीस वर्षे एका सर्वसामान्य महिलेसारखी सरळ रेषेसारखी गेली. अचानक साठाव्या वर्षी तिला आपण काहीच करत नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यात मेरी ऑलिव्हरची The Summer Day ही कविता तिच्या वाचनात आली. त्यातली शेवटची ओळ Tell me, what is it you plan to do with your one wild and precious life? तिच्या मनात रुतून बसली. तिला स्वतःचा भूतकाळ आठवला. तिने स्वतःच्या जुन्या फिल्म्स पाहिल्या. स्वतःच्या मुलाखती ऐकल्या. आपलं खरं पॅशन हे स्विमिंग आहे हे तिला जाणवलं. तिच्या नावातला नयाड (Nyad) हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थच पाण्यात विहार करणारी जलपरी असा आहे. बोनी ही डायनाची समवयस्क मैत्रीण आणि स्वीमिंग कोच. आपण पुन्हा एकदा स्विमिंग सुरु करणार असल्याचं डायनाने बोनीला सांगितलं. इतकंच नाही, तर आपण क्युबा ते फ्लोरिडा हे १०३ मैलांचे (१६५ किमी) अंतर सलग ६० तास पोहून पूर्ण करणार हेही सांगितलं. बोनीने डायनाला वेड्यात काढलं. तुला अठ्ठाविसाव्या वर्षी जमलं नव्हतं तर साठाव्या वर्षी कसं जमेल, म्हणत बोनीने डायनाच्या स्वप्नाला सुरुंग लावला. पण डायना हट्टाने पेटली होती. एकदा ठरवलं तर आपण काहीही साध्य करू शकतो यावर तिचा विश्वास होता. तिने सरावाला सुरुवात केली. आधी एक तास, चार तास, आठ तास सलग पोहून पाहिलं. बोनीबरोबर एक टीम तयार केली. १० जुलै २०१० साली वयाच्या साठाव्या वर्षी ती सलग १६५ किमी पोहोण्यासाठी तिने समुद्रात उडी घेतली. इथे काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. सलग पोहणं म्हणजे इतका वेळ पाण्यातच राहणं. मदतीसाठी बाजूला एक बोट असते. त्यात टीम असते. विश्रांती, खाणं-पिणं हे सगळं पाण्यात राहूनच. पोहणाऱ्या व्यक्तीला टीममधील कोणीही स्पर्शदेखील करायचा नाही, हा एक महत्त्वाचा नियम. अन्न-पाणी बोटीतूनच भरवायचं. इतका वेळ पोहत राहणं, त्यासाठी आवश्यक स्टॅमिना, इतका वेळ पाण्यात राहून येणारा Sea Sickness, समुद्रात येणाऱ्या वादळांची शक्यता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शार्क-जेलीफिश यांचा संभाव्य धोका अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत पोहायचं म्हणजे नुसती कल्पनाच केलेली बरी! हाडं गोठवणारी थंडी, समुद्राच्या लाटांचे फटकारे आणि जेलीफिशचे हल्ले अशा विविध कारणांनी डायनाला ही मोहीम चार वेळा मध्येच स्थगित करावी लागली. मात्र पाचव्या वेळी (ज्यावेळी ती ६४ वर्षांची झाली होती) डायनाने ही मोहीम ५३ तासांत यशस्वीपणे पूर्ण केली. हा सगळा थरार त्या दोन तासांच्या सिनेमात खच्चून भरलाय. 

खऱ्या आयुष्यातील डायना नयाड

संपूर्ण सिनेमाच अप्रतिम आहे. पण शेवटची वीस मिनिटे विशेष लक्षात राहतात. डायनाचा पाचवा attempt आहे. रात्रीच्या एका क्षणी डायनाला समुद्राच्या तळाशी चक्क ताजमहाल दिसतो. ती हे बोटीवरील सर्व टीम मेम्बर्सना सांगते. इतका वेळ पाण्यात राहून डायनाच्या डोक्यावर परिणाम झालाय हे सर्वांना कळतं. हसल्यासारखं करून सगळेजण तिच्या बोलण्याला दुजोरा देतात. त्याच रात्री एका क्षणी बोनीला लांबवर फ्लोरीडाचा किनारा दिसू लागतो. ती भावुक होते. मागच्या तीन वर्षांत हे पहिल्यांदाच घडतंय. ती डायनाला बोटीजवळ बोलावते. तिला लांबवर दिसणारा किनारा दाखवते. ‘आपण आता खूप जवळ आलोय, आता हिम्मत हरू नकोस. तुला फक्त (?) बारा तासच पोहायचे आहे’ असं तिला डायनाला सांगते. क्षीण झालेल्या डायनामध्ये पुन्हा एकदा चेतना संचारते. बोनी सांगते, फक्त माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी… एक एक स्ट्रोक मारत पुढे जात राहा ! डायना क्षीण हातांनी रात्रीच्या त्या अंधारात एकेक स्ट्रोक मारत पुढे पुढे जाऊ लागते ! फक्त बारा तास? नुसता विचार करूनच आपल्याला दमायला होतं. डायनाने लवकरात लवकर त्या किनाऱ्यावर पाऊल ठेवावं म्हणून आपणच मनोमन प्रार्थना करू लागतो. शेवटी तो क्षण येतो. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सगळी जनता डायनाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. अखेर त्रेपन्न तासांनी डायनाचे पाय पाण्याखालच्या जमिनीला लागतात. लहान बाळासारखे एकेक पाऊल टाकत ती किनाऱ्याकडे येऊ लागते. तिचे दोन्ही तळवे पाण्याच्या बाहेर येत नाहीत तोवर हा विक्रम पूर्ण होणार नसतो. बोनी तिला हळूहळू एकेक पाऊल टाकायला सांगत आहे. डायनाच्या पायातली शक्ती गेली आहे. पण आत्ता नाही तर कधीच नाही, हे मनात आणून ती निकराने एकेक पाऊल पुढे टाकत आपला विक्रम पूर्ण करते. हा सिनेमा संपतो तेव्हा आपल्या डोळ्यांतील अश्रूंनी डायनाला सलामी दिलेली असते. 

नयाडने स्वामिंगमध्ये विक्रम प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहिले. पण आपल्या प्रत्येकाची स्वप्ने वेगवेगळी असू शकतात. असतीलच. म्हणूनच नयाड सिनेमाची गोष्ट आपण आपल्या आयुष्यात एक रूपक (Metaphor) म्हणून वापरली पाहिजे. हा सिनेमा पाहून मला जाणवलं ते असं. 

१. अशक्यप्राय स्वप्न बघा: आपल्या प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात. पण यातलं असं स्वप्न निवडा ज्याच्यावर लोकांनी हसलं पाहिजे, तुम्हाला वेड्यात काढलं पाहिजे. जे शक्यच होणार नाही असं सर्वांना वाटलं पाहिजे. मग त्या स्वप्नाचा पाठपुरावा करा. त्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावा. 

२. स्वप्न पूर्ण करणं आणि तुमच्या वयाचा काहीच संबंध नाही: Age is an issue of mind over matter. If you don’t mind, age doesn’t matter ! असं मार्क ट्वेनचं एक खूप गोड वचन आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं शारीरिक स्वास्थ्य कसं आहे याहीपेक्षा तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर आहात का हे जास्त महत्त्वाचं आहे. 

३. एक टीम निर्माण करा: सर्वच skills एकाच माणसांत असणं अशक्य आहे. त्यामुळे आवश्यक skills असलेली विविध माणसं तुमच्या टीममध्ये असणं आवश्यक आहे. तुमचं स्वप्न हे तुमचं एकट्याचं न राहता संपूर्ण टीमचं कसं होईल यावर काम करा. टीम मेम्बर्स कोणीही असू शकतात. तुमच्या घरचे असतील, मित्रमैत्रिणी असतील, तज्ज्ञ असतील. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भटकू न देण्यासाठी आणि तुम्हाला माणूस म्हणून जमिनीवर ठेवण्यासाठी एका उत्तम टीमला पर्याय नाही. 

४. सातत्य, सातत्य, सातत्य… आपण पाहिलेलं स्वप्न पाहण्यासाठी रोजचा रिझाय आवश्यक आहे. तो perfect झाला पाहिजे हा हट्ट ठेवण्याची गरज नाही. तो ठरवल्याप्रमाणे आणि सातत्याने होणं हे जास्त महत्त्वाचं ! Perfection हा अनेकदा  यशातला अडसर ठरू शकतो.    

५. Never ever give up: हे पटवून देण्यासाठी नयाड सिनेमा पुरेसा बोलका आहे. नयाड सिनेमा पाहून माझी खात्री आहे की आपल्या excuses छोट्या वाटतील. तुमच्या स्वप्नाला चिकटून राहा. संकटे येणारच आहेत. संकटे आलीच नाहीत तर स्वप्नपूर्तीची काय मजा ! 

६. स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडे हट्टी राहा: संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्याबाबत हट्टी राहा. शार्कपासून संरक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पिंजऱ्यांना डायना नकार देते. त्यावेळी तिचं एक खूप छान वाक्य आहे - I don’t want an asterisk next to my life’s greatest achievement ! 

हे सगळं वाचून सिनेमा पाहिल्यावर आरशासमोर उभे राहा. मेरी ऑलिव्हरने विचारलेला प्रश्न स्वतःला विचारा. Tell me, what is it you plan to do with your one wild and precious life? आता तुमचं वय विसरून एक अशक्यप्राय स्वप्न बघा. एका टीमच्या साहाय्याने आवश्यक गोष्टींचा अभ्यास सुरु करा. १ जानेवारीची वाट न पाहता स्वप्नपूर्तीच्या तयारीला लागा.

अनेक शुभंकर शक्यता असलेला एक निळाशार महासागर तुमची वाट पाहतोय !  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...