काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं? - Welcome to Swayam Talks
×

काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं?

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 3 November, 2023

काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं?

Get Better Each Week #21

यापूर्वी कधीही न सांगितलेली एक गोष्ट आज मी शेअर करणार आहे. 

सध्या मी जे करतोय त्याच्याशी त्या गोष्टीचा संबंध आहे म्हणून. अदर वाईज मी ती शेअर करण्याचं काही कारण नाही. 

२०१८ ते २०२२ हा चार वर्षांचा काळ मी निराशेच्या दरीत गेलो होतो. एका अशा काळोख्या गुहेत, जिथून बाहेर पडायचा रस्ता सापडत नव्हता. तिथला मी आणि त्या काळाकडे लांबून बघू शकणारा मी, या प्रवासाची ही गोष्ट. एकाही शब्दाची अतिशोयक्ती न करता जसं घडलं तसं सांगतो.  

२०१८ स्वयं मुंबई कार्यक्रम सुरु होता. संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर मी स्टेजवर जाऊन समारोप करणं अपेक्षित होतं. तसा मी बोलण्यासाठी गेलोही. बोलण्यासाठी मी पहिला शब्द उच्चारला आणि कोणीतरी मागून माझा गळा गच्च दाबून धरलाय असा भास झाला. तोंडून शब्दच फुटेना. बरं, त्याच कार्यक्रमात मी स्टेजवरून सकाळी देखील बोललो होतो. ‘स्टेजवरून बोलण्याची भीती’ हा भागही नव्हता. मला पब्लिक स्पिकिंगची सवय होती. ऑक्सिजनशिवाय बोलावं, त्याप्रमाणे मी मोठ्या मुश्किलीने एक एक शब्दाचा उच्चार करत बोलण्याचा प्रयत्न करत होतो. काही शब्द उमटत होते, काही नव्हते. कार्यक्रम संपल्यावर माझ्या लक्षात आलं, मला साधं लोकांशी ‘वन-टू-वन’ बोलतानाही त्रास होतोय. मला नीट बोलता येत नाहीये. बोलायला गेलो तर गळा दाबल्याचा तोच भयानक फील. कार्यक्रमाच्या स्ट्रेसमुळे वगैरे झालं असेल, अशी मनाची समजूत काढून मी त्या रात्री कसाबसा झोपून गेलो. पण पुढे दिवसागणिक हा त्रास वाढत गेला. शब्दांचा उच्चार करताना श्वास अपुरा पडतोय हे लक्षात आल्यावर आता यावर सिरीयस पावलं उचलायला हवीत असं वाटलं. 

सुमारे दोन वर्षं निरनिराळे डॉक्टर्स, स्पेशलिस्ट्स, टेस्ट्स करून झालं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. नक्की झालंय काय याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे त्यातून बरं होण्याचा मार्ग सापडत नव्हता. माझे सर्व ‘पब्लिक स्पिकिंग’चे कार्यक्रम मी थांबवले होते. येणाऱ्या सर्व आमंत्रणांना मी वेगळीच कारणं देऊन नकार कळवत होतो. निराशेच्या गुहेत जाण्याचा प्रवास सुरु झाला होता.   

अनेक ठिकाणी चर्चांमध्ये, गप्पांमध्ये, मिटींग्समध्ये माझ्या मनात पॉपकॉर्नप्रमाणे शब्द फुटायचे. पण ते बाहेर नाही पडायचे. एकेकाळी कार्यक्रमात वगैरे गाणारा, वेगवेगळ्या शहरांत जाऊन स्टेजवरून तासंतास बोलणारा आणि मुळात बोलण्याची आवड असलेला मी अचानक गप्प होऊन गेलो ! स्टेजवर. बाहेर. घरात. निराशेची काजळी वाढतच होती. 

एक दिवस डॉ उदय निरगुडकर यांच्या डॉक्टर पत्नीने नामांकित व्हॉइस सर्जन डॉ नुपूर नेरुरकर यांना भेटण्याचा सल्ला दिला. माझ्या सगळ्या टेस्ट्स झाल्यावर त्यांनी मला शांतपणे बसवलं. 

‘व्होकल कॉर्ड्स’च्या आकृत्या दाखवून मला काय झालंय हे नीट समजावून सांगितलं. आपल्या व्होकल कॉर्ड्स उघड बंद होत असतात. त्यामधून जी हवा जाते त्यामुळे आवाजाची निर्मिती होते. या ‘व्होकल कॉर्ड्स’नी कधी बंद व्हायचं, कधी उघडायचं याची आज्ञा मेंदू देत असतो. मेंदूच्या या सिग्नल देण्यामधे जेव्हा काही कारणाने गडबड होते, तेव्हा माणसाच्या घशाच्या स्नायूमध्ये एक पेटका किंवा Spasm येतो. यामुळे कोणीतरी गळा आवळल्याप्रमाणे माणसाची बोलती बंद होते ! 

‘You are suffering from a condition called Abductor Spasmodic Dysphonia aka ABSD !’ डॉक्टरांनी माझ्याकडे बघत सांगितलं. हा आजार नाही. ही एक कंडिशन आहे. याला औषध नाही. हे पूर्ण बरं होऊ शकत नाही. पण व्हॉइस कल्चर करून नियंत्रणात येऊ शकतं.  

Cut to 2023. 

मी आता पूर्वीसारखा बोलू लागलोय. स्टेजवर. बाहेर. एका वेगळ्या आत्मविश्वासाने स्वतःशी मनात !  

माझा आवाज पूर्ण बरा झालाय का?   

नक्कीच नाही. अजूनही काही वेळेला खूप बोलल्यावर आवाज बसतो. थकतो. पण आवाज फुटेल का, हा स्ट्रेस आता नसतो.

Slowly and gradually I am coming back to normal. 

हे कसं घडलं? 

१. Acceptance

आपल्याला असं काही होऊ शकतं हे पचवायलाच खूप वेळ लागतो. मला ABSD चा acceptance येत नव्हता, ही खरी अडचण होती. तो जसजसा येत गेला तसतसा माझा ABSD बरोबरचा लढा थांबला. आता माझी माझ्याच आजाराशी मैत्री झाली. आपला आवाज पूर्वी यापेक्षा चांगला होता, हे बॅगेज खांद्यावरून उतरलं तेव्हा गोष्टी जास्त सोप्या झाल्या.  

२. लोकांना विश्वासात घ्या. 

लोकं आपल्याला हसतील, ridicule करतील असं आपल्याला उगीच वाटत असतं. अनेकदा माणसं आपल्याला वाटतात त्याहून अधिक चांगली असतात. ‘मला बोलण्याचा त्रास आहे त्यामुळे वेळप्रसंगी माझा आवाज मधेच जाऊ शकतो’, असं सांगून मी काही ठिकाणी समोरच्या प्रेक्षकांना विश्वासात घेऊ लागलो. माझ्या आवाजापेक्षा, मी नक्की काय सांगू पाहतोय  हे लोकं ऐकत होते, असा माझा अनुभव आहे. लोकांचे सहकार्य मिळाल्यावर मला थोडा धीर आला. 

३. जवळची माणसं - आपली खरी सपोर्ट सिस्टीम.    

माझे कुटुंबीय, माझे मित्र, ऑफिसमधील सहकारी अनेक ठिकाणी माझा ‘आवाज’ झाले. मला बोलता येत नव्हतं तेव्हा त्यांनी मला गप्प राहू दिलं. बसलेला आवाज, न फुटणारे शब्द सहन केले. प्रसंगी खाली वाकून, नीट कान देऊन अधिक लक्षपूर्वक ऐकलं. न कंटाळता ऐकलं. त्यांच्याशिवाय यातून बाहेर पडणं अशक्य होतं.     

४. उत्तम मार्गदर्शक / Mentor 

कधीकधी डॉक्टर्सपेक्षा आपल्याला समजून घेणाऱ्या एखाद्या गुरुची वा या क्षेत्रातील कुशल मार्गदर्शकाची गरज असते. मला पुण्याचे श्यामराव जोशी भेटले. ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून श्यामरावांनी शब्द म्हणजे काय, उच्चारांचं महत्त्व, आवाजाचं महत्त्व, आवाजातले चढउतार, शब्दांकडे बघायचं कसं - अशा अनेक गोष्टींवर अभ्यास करून घेतला. ABSD ची कंडिशन लक्षात घेऊन त्यांनी मला काही व्हॉइसचे व्यायाम दिले. ‘आपण’ यातून निश्चित बाहेर येऊ शकतो, असा अमूल्य धीर दिला. 

५. सपोर्ट ग्रुप्स 

फेसबुकवर Abductor आणि Adductor Spasmodic Dysphonia चे सपोर्ट ग्रुप्स सापडले. त्यावर जगभरातले सहाशे सातशे लोक होते. आयुष्याची चाळीस पन्नास वर्ष ABSD शी झुंजण्यात घालवलेले पुरुष-स्त्रिया मी तिथे पाहात होतो. 

त्या ग्रुपवर मी माझेही अनुभव शेअर करत असतो. त्यावर लोकांच्या धीर देणाऱ्या, cheer up करणाऱ्या प्रतिक्रिया येत राहतात. एकमेकांना संपूर्ण अनोळखी जगभर विखुरलेली माणसं दुःखाच्या एका धाग्याने एकमेकांशी बांधून राहतात.   

६. Self Talk 

निराशेच्या या संपूर्ण काळात आपण स्वतःशी काय बोलतो हे सर्वात महत्त्वाचं असतं. एक दिवस विचार करत असताना लक्षात आलं, माझा आवाज म्हणजे मी नाही. अनेक गोष्टींनी माझं व्यक्तिमत्व बनलंय. आवाज हा त्यातला फक्त एक भाग आहे. डोळे जाऊन, हात-पाय गमावून, एका किडनीवर माणसं अविश्वसनीय गोष्टी साध्य करतात. आवाज सोडून आपल्याकडे बाकी सगळं आहे. तो फिर ग़म किस बात का ! Express होण्यासाठी आवाज नसेल तर आपण लिहिण्यातून express होऊ शकतो ! मन सैल झालं तेव्हा व्होकल कॉर्ड्सही सैल झाल्या. 

७. तुमच्या ध्येयाकडे चालत राहा     

मला नेमून दिलेले आवाजाचे व्यायाम मी करत राहिलो. एकटा असताना शेकडो पाने मोठ्यांदा वाचली. माझे आवाज रेकॉर्ड करून ऐकून पाहिले. आपल्याला आवडत नसलेला आवाज पुन्हा ऐकणे याच्यासारखा त्रास नसे. घरात पेटी घेऊन गात राहिलो. निराशेच्या बोगद्यात गेलात तर खूप वेळ एकाच जागी बसून राहू नका. प्रकाशाची तिरीप अनुभवायची असेल तर कधीतरी उठावं लागेल आणि बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला चालत राहावं लागेल.

हे सगळं शेअर करायचं आणखी एक कारण आहे. आपल्या देशात Dysphonia चा awareness जवळजवळ शून्य आहे. Dysphonia चं निदान न झालेले अनेक जण चुकीचे उपचार, अंगारे धुपारे वगैरे गोष्टींमध्ये अडकले असतील. निराशेच्या अंधारात चाचपडत असलेल्या अशांना या शेअरिंगमुळे आशेचा एक किरण दिसेल असं वाटतं. याविषयावर पुढे येऊन कोणी तरी बोलायला हवं, या उद्देशानेच हा आजचा ब्लॉग !   

आता मी ‘काहीतरी नविन’ ही पॉडकास्ट सिरीज घेऊन आलोय. ‘पाच वर्षांपूर्वी साधं एक वाक्य बोलण्यासाठी झगडणारा मी आणि आता दोन-तीन तासांचे पॉडकास्ट करणारा मी’ या बदलाचं मला स्वतःलाच आश्चर्य वाटतंय. आपण हा पॉडकास्ट ऐकाल. जे आवडलंय त्याचं कौतुक कराल, सुधारणांसाठी सूचना कराल अशी आशा आहे.  

अजून खूप चालायचंय याची नम्र जाणीव आहे. 

पण निराशेच्या दरीतून काही पायऱ्या चढून त्या पर्वताच्या पायथ्याशी आलोय, याचं समाधान जास्त आहे. 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...