Get Better Each Week #16 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #16

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 28 September, 2023

Get Better Each Week #16

तुमचा फोन तुमच्या हातात असतो की खिशात? 

Imagine a situation. तुम्ही रिक्षामध्ये बसलायत. तुमचं ठिकाण येतं. रिक्षावाल्याला पैसे देऊन तुम्ही खाली उतरता. रिक्षा निघून जाते. आपला फोन कुठाय म्हणून तुम्ही खिशात हात घालता आणि…. Oh My God !! फोन खिशात नसतो ! Oh Sh*t ! फोन कुठे गेला? आता आजूबाजूचे सगळे आवाज बंद होतात. एक बधिरता येते. तुमच्या पोटात खड्डा पडतो. एका सेकंदात तुम्हाला घाम फुटतो. छाती धडधडू लागते. आपल्याच मुर्खपणामुळे झालेली आपली सगळी ‘तबाही’ एका सेकंदात आपल्या डोळ्यासमोरून तरळून जाते. तो रिक्षावाला माझा फोन घेऊन परत येईल का? नाही आला तर मी काय करू? त्याला कुठे शोधू? आपण उगीच काही रिक्षांच्या मागे धावायचा एक फालतू प्रयत्न देखील करतो. खिसा असो वा नसो, आपल्या अंगावरच्या प्रत्येक भागाला हात लावून तपासत राहतो. हे सगळं होण्यात एक मिनिट गेलेलं असतं. मग आपल्याला आठवतं की आपल्याकडे एक बॅग आहे. त्याच ‘पॅनिक’ अवस्थेत आपण थरथरत्या हातांनी बॅगेत हात घालतो. पहिल्या खणात नाही… चेनच्या छोट्या खणात नाही. मोठ्या मुख्य खणात नाही…‘शेवटचा चान्स’ असं मनात म्हणत आपण मागच्या खणात हात घालतो आणि…. फोन तिथे असतो ! त्यावेळी काय वाटतं ?

हे माझ्या बाबतीत घडलंय. हे तुमच्याही बाबतीत घडलं असेल तर Welcome to the Club ! 

फोन आता आपला अवयव झालाय. फोन आता सहावं इंद्रिय झालंय. ‘एकमेकांशी फोनवर बोलणे’ या कृतीच्या पलीकडे जाऊन आता तो आपल्या आयुष्यात खोलवर घुसलाय. आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, आपले स्वभाव, आपली तत्त्वं, आपल्या धारणा, आपल्या भावना, आपली नाती… या सगळ्यावर आता आपला ‘फोन’ राज्य करतोय. My Phone is my master. I am its slave….हा विचार तुमच्या मनात कधी आलाय? फोनपासून लांब जाऊन इतका विचार येण्याइतपत वेळ मिळालाय कधी ? विचारांच्या याच टप्प्यावर सायमन सिनेक या माझ्या आवडत्या विचारवंताचा एक छोटासा व्हिडीओ  पाहिला. (फोनवरच पाहिला!) छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा आपल्या कृतींमधून आपण माणसं आणि फोन यामध्ये आपल्या फोनला कसं महत्त्व देतो हे तो खूप मार्मिकपणे सांगत होता. त्याने एक उदाहरण दिलंय. तुम्ही आणि तुमचा मित्र / मैत्रीण एका कॅफेमध्ये बसून गप्पा मारताय. तुमच्या दोघांच्या मध्ये टेबल आहे. त्यावर तुमच्या दोघांच्या कॉफीचे मग आहेत. तुम्ही दोघांनी तुमचे फोन्स टेबलवर ठेवलेत. What does it mean ? त्याचा अर्थ असा आहे, की तू आत्ता माझ्याशी बोलतोयस हे ठीक आहे. पण मला फोन आला तर तोही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मग नक्की महत्त्वाचं काय आहे? सायमन म्हणतो, काही लोकं तर समोरच्यावर उपकार केल्याप्रमाणे आपला फोन उलटा ठेवतात ! त्या व्हिडीओचा समारोप करताना सायमन म्हणाला, जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाशी बोलताय तेव्हा (गरज नसेल तेव्हा) तुम्हा दोघांच्या मध्ये आणखी काही नको. तुमचा फोन सुद्धा नको ! शक्यतो हात मोकळे ठेवा. गरज नसेल तेव्हा फोन खिशात ठेवा !’ That was a powerful message. हे ऐकल्यावर कृतीमध्ये एका रात्रीत बदल घडणार नाही. पण विचारात मात्र बदल घडला. विचार केला, जगून तरी बघूया तसं. 

दुसऱ्या दिवशी रविवार होता. बायकोबरोबर सुपर मार्केटमध्ये गेलो होतो. ठरवलं, कोणाचा फोन आल्याशिवाय किंवा मला फोन करण्याची गरज भासल्यास पुढचे दोन तास फोन बघायचा नाही. पूर्ण वेळ सुपर मार्केट आणि तिथली खरेदी यावर लक्ष केंद्रित करायचं. पूर्णपणे ‘In the moment’ राहायचा प्रयत्न करायचा. फोन जीन्सच्या खिशात ठेवला आणि सुपर मार्केटमध्ये पाय ठेवला. लिस्टप्रमाणे खरेदी सुरु झाली. नेहमीप्रमाणे लिस्टबाहेरचीही खरेदी सुरु होती ! भाज्या-फळांच्या सेक्शनमध्ये गेलो. तिथे ठेवलेली फ्रेश विविध रंगांची फळं, भाज्या पाहून हरखून गेलो. फळं पिशव्यांमध्ये भरायला, त्याचं वजन करून घ्यायला मजा आली. हे सगळं करत असताना आयुष्यात पहिल्यांदा सुपर मार्केटमधला आवाज ऐकला. त्यादिवशी प्रथम लक्षात आलं की सुपरमार्केटमध्ये, म्हटलं तर, कोणी कोणाशी बोलत नसतं. पण तिथे असलेल्या लोकांचे पाय जमिनीवर घासण्याचा एक आवाज येत असतो. भाज्या-फळं-डाळी-साबण-बेकरी या सगळ्याचा मिळून तिथे एक अफलातून वास येत होता. मग मी माझा मोर्चा माझ्या आवडत्या गोष्टीकडे वळवला. माणसांचं निरीक्षण ! लोकं काय काय घेत असतात ! आपण सोडून इतर सगळे लोक वायफळ खरेदी करत असतात. (माणसांची नुसती खरेदी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किती काय सांगून जाते ना ! अर्थात असं लोकांना जज वगैरे करणं फक्त गंमत म्हणून ! कारण आपण कितीही तर्क वितर्क लावले तरी काही गोष्टी या आपल्या आकलनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे असणारच आहेत.) या सगळ्यानंतर सामानाची यादी पुन्हा तपासून पाहणे, तिथे यादीबाहेरचं काहीतरी घ्यायला बायको दुसरीकडे गेलेली असताना बिलिंगच्या त्या कंटाळवाण्या लायनीत उभं राहणं, बिलिंग झाल्यावर सामान वाहून पार्किंगपर्यंत घेऊन जाणं ही सगळी कामं करून मी थोडेसे ब्राऊनी पॉईंट्स मिळवले हा बोनस ! तर थोडक्यात हे सगळं घडलं फोन खिशात ठेवल्यामुळे ! 

गाडीत बसल्यावर फोन पाहिला. एकही कामाचा मेसेज नव्हता. त्या दोन तासात मला कुणी फोन केलेला नव्हता. याचा अर्थ आपल्याला वाटतं तेवढे आपण महत्त्वाचे नसतो तर ! 

माझे आवडते लेखक अंबरीश मिश्र यांनी कधीच मोबाईल वापरलेला नाही. आजही वापरत नाहीत. कुणीतरी त्यांना त्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले होते, माझ्या घरी लँडलाईन आहे. त्यामुळे मी जेव्हा घरी असतो, तेव्हा लोकं मला लँडलाईनवर फोन करू शकतात. आणि जेव्हा इमर्जन्सी असेल आणि मी घरी नसेन, तर समोरचा माणूस माझ्यापर्यंत पोहोचायचा कसाही प्रयत्न करेलच की ! असाच एक ऐकीव किस्सा कुसुमाग्रजांबद्दलचा आहे. त्यांच्याकडे फोन नव्हता त्या काळात त्यांना एक खूप मोठा पुरस्कार मिळाला. ही बातमी घेऊन एक माणूस त्यांच्याकडे आला. 

त्यांचं अभिनंदन करून तो म्हणाला, ‘तात्यासाहेब तुम्हाला आता घरी फोन घ्यायला हवा.’                   

‘का’ ?

‘यापुढे तुम्हाला असे पुरस्कार मिळाले तर थेट तुम्हालाच कळेल’’ 

‘अहो, ते सांगायला तुम्ही आहात की!’ तात्यासाहेब हसत म्हणाले. 

आयुष्यात शंभरातुन एकदा किंवा अपवादाने घडणाऱ्या गोष्टींभोवती आपण केवढं मोठं प्रस्थ निर्माण करून ठेवलंय हे सांगणाऱ्या या दोन्ही गोष्टी, मला वाटतं, खूप बोलक्या आहेत. पण आता फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्यानंतर पुन्हा back to zero जाणं प्रत्येकाला झेपणं कठीण आहे. तरीही त्या फोनचं स्थान आपल्या आयुष्यात किती ठेवावं हे आपण नक्कीच ठरवू शकतो. फोन पाहण्याची, सोशल मीडिया पाहण्याची, मेसेजेस चेक करण्याची, ईमेल्स चेक करण्याची एक वेळ ठरवू शकतो का? कुठलंही काम करताना आपण आणि ते काम, एखादी गोष्ट अनुभवताना आपण आणि तो अनुभव यामध्ये तो फोन येत नाहीये ना हे आपल्याला जाणीवपूर्वक ठरवावं लागेल. एक गमंत सांगतो. मध्यंतरी गुजरातमधला Statue of Unity पाहायला गेलो होतो. त्या अवाढव्य कलाकृतीला प्रत्येकजण त्या फोनच्या पाच बाय दहा इंचाच्या चौकटीत अडकवायचा केविलवाणा प्रयत्न करत होता. कोणीही फोन बाजूला ठेवून विस्फारलेल्या डोळ्यांनी ते शिल्प डोळ्यांत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत नव्हता. एखादं सुंदर दृश्य पाहताना, एखाद्या अप्रतिम पदार्थाचा आस्वाद घेताना खुद्द तो अनुभव घेण्याचं सोडून मी हे सगळं जगाला कधी एकदा सांगतोय, ही उबळ थांबवायची असेल तर आधी जाणीवपूर्वक फोन बाजूला ठेवा आणि त्या अनुभवाला स्वतः भिडून पाहा ! 

The greatest gift which you can give to another is your undivided attention ! माझे ज्येष्ठ मित्र आणि प्रसिद्ध जाहिराततज्ञ उमेश श्रीखंडे यांचं हे आवडतं वाक्य आहे. तसं जगायचं असेल तर, मला वाटतं, तुमचा फोन हातात नको. तो खिशातच असलेला बरा ! 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...