ज्या देशाची अर्धी लोकसंख्या 'तरुण' आहे, अशा भारताकडे आज समस्त स्मार्टफोन्स, विविध ऑप्लिकेशन्स आणि गेमिंग कंपन्यांचं लक्ष आहे. IPL सुरु असताना दोन ओव्हर्सच्या मध्ये ज्या जाहिराती दिसतात त्यावर नजर टाका म्हणजे मी काय म्हणतोय हे सहज कळेल. ९९% जाहिराती मोबाईल आणि त्यावर वापरता येणारी उत्पादने यांच्याशी निगडित आहेत. तरुण पिढीसाठी काय 'cool' आहे, याचं डिझाईन अत्यंत हुशारीने केलं जातंय. आता मेट्रो शहरांचा तरुण ग्राहक विसरा - कारण तो एवीतेवी येणारच आहे. कंपन्यांना खुणावतोय तो छोट्या शहरांतील Aspiring तरुण वर्ग! ज्याला मेट्रोमधल्या तरुणाशी स्पर्धा करायचीय. तो वापरतो तेच ब्रॅण्ड्स वापरायचेत ! मग पुढची गणितं खूप सोपी आहेत. विराट कोहलीने नुकतेच 'MX- टकाटक' बरोबर करार केलाय, हे तुम्ही वाचले असेलच. कराराची रक्कम जाहीर झाली नसली तरी ती काही शे-कोटीत असेल हे कोणीही सांगेल. 'टिकटॉक'ला भारतातून हाकलल्यावर जणू 'ऑक्सिजन'चा तुटवडा भासू लागला आणि त्याला स्वदेशी पर्याय (!) म्हणून 'टकाटक' ची निर्मिती झाली. यावर आता या देशातील आबालवृद्ध स्वतःमधील नाना कळांचे दर्शन घडवतील. या करारानुसार विराटच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अंतर्गत गोष्टींचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. हे खास 'टकाटक' साठी निर्माण केलं जाणार असल्याने त्यात चित्रित केलेलं सगळं व्यवस्थित ठरवलेलं - Smart Scripted असणार यात दुमत असू नये. त्यामुळे 'खऱ्या' विराट कोहलीचं दर्शन होईल का? हा प्रश्न आहेच. इतर माध्यमांमधून १००% विराट कोहली कळेल, असे म्हणणेदेखील भाबडेपणाचे ठरेल. पण सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. सोशल मीडिया हे अत्यंत चंचल आणि अल्पजीवी माध्यम आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, इथले Content Creators आपण स्वतःच आहोत. जगाने आपलं कुठलं चित्र पाहावं हे मी ठरवणार आहे. सोशल मीडियामुळे सध्या रूढ होत चाललेल्या या नव्या मनोरंजनाच्या दर्जाबद्दल अनेक मतांतरे असू शकतील. पण सर्वात कळीचा मुद्दा आहे तो एका आभासी जगाच्या निर्मितीचा. आभासी व्यक्तिमत्त्वांचा. आभासी नात्यांचा. त्यातून निर्माण होणाऱ्या आभासी Perceptions चा! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आपण सर्वांनी - विशेषतः तरुण पिढीने - खऱ्या वास्तवापासून, Reality पासून दूर दूर जाण्याचा! एखाद्या कोव्हिड योध्याला घरबसल्या 'लाईक देणं' आणि हॉस्पिटलमधल्या त्या भयंकर कोव्हिड वॉर्डमध्ये स्वतः जाऊन येणं यातला फरक 'न' कळण्याचा. फक्त सोशल मीडियामध्ये दिवसरात्र मश्गुल असलेल्या तरुणांशी कधीतरी सहज गप्पा मारा, म्हणजे मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल.
विराटने कोणाबरोबर करार करायचे आणि कोणाबरोबर नाहीत, हा संपूर्णपणे त्याचा वैयक्तिक निर्णय असला तरी एक ICON म्हणून त्याच्याकडून काही जबाबदाऱ्यांचं 'भान' असण्याची अपेक्षा व्यर्थ नसावी. वरकरणी निरर्थक, सपक आणि सवंग वाटणाऱ्या या सोशल मीडिया व्हिडिओजची कोट्यवधी रुपयांची एक भली मोठी इंडस्ट्री आहे. विराटला द्यावी लागणारी रक्कम ही कंपनी आपल्या देशाच्या तरुणाईकडून त्यांच्या नकळत वसूल करणार हे साधं गणित आहे. ती वसुली असणार आहे पैशांची, त्याहून मूल्यवान अशा तरुणांच्या वेळेची, ऊर्जेची आणि Creativity ची. एखादे प्रॉडक्ट वापरताना त्या देशातील नागरिक - विशेषतः तरुण पिढी - काय किंमत मोजणार आहे, त्याचा विचार विराटसारख्या यूथ आयकॉन्सनी नाही करायचा तर कोणी करायचा? २००१ साली प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी एका कोला कंपनीसाठी जाहिरात करण्यास नकार दिला होता. 'जे प्रॉडक्ट मी स्वतः वापरत नाही त्याची जाहिरात मी करणार नाही' असे सूचक विधान करून गोपीचंद यांनी त्यांच्या चाहत्यांच्या मनात एक आगळे स्थान निर्माण केले होते. (नंतर कोला कंपनीसाठी जाहिरात करण्यास अमिताभ बच्चन आणि खुद्द विराटने देखील नकार दिला होता.) गोपीचंद यांना अधिक खोदून विचारलं तेव्हा ते एकच वाक्य म्हणाले होते, 'तुम्ही फार तर याला Ethics म्हणून शकता, हवं तर !'
Ethics, प्रामाणिकपणा, परोपकार…. वगैरे शब्द आताच्या काळात Outdated, Impractical वाटण्याची शक्यताच अधिक. हे शब्द उच्चारताच 'चला, Value Education चा वर्ग सुरु झाला' असे काहींचे चेहरे होतात. या जगात राहायचं असेल तर 'मेजॉरिटी' प्रमाणे वागावं का असा विचार मनात यायचा अवकाश, तिकडे वांगणी स्टेशनवर मयूर शेळके स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका लहान मुलाचा जीव वाचवतो आणि त्याला मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम त्या लहान मुलाच्या शिक्षणासाठी देतो.
तामिळनाडूमधली कचरा वेचणारी १९ वर्षांची मरीअम्मल कचऱ्यात मिळालेली ५८००० रुपये असलेली बॅग पोलिसांना नेऊन देते. मुंबईचा शहानवाज शेख स्वतःची गाडी विकून कोव्हीड रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करतो. कोण आहेत ही माणसं ? या प्रत्येक कृतीमागे काय असेल प्रेरणा ? मयूर… शहानवाज… मरीअम्मल… गोपीचंद…ही फक्त माणसं नाहीयेत. ही वृत्ती आहे. समाज उभा राहतो, टिकतो तो अशा माणसांमुळे. 'टकाटक'चा एक व्हिडीओ आला नाही तर काही फरक पडणार नाहीये, पण समाजात मयूर-शहानवाज-मरीअम्मल सारखी माणसं नसतील तर ते आपल्यासाठी धोकादायक आहे. 'गोपीचंद'सारखा दीपस्तंभ नसेल तर अनेक जहाजं भरकटण्याची भीती आहे.
मग सोशल मीडिया वाईट आहे का? नक्कीच नाही. सोशल मीडियाची ताकद प्रचंड आहे, कारण तो सध्या ज्याच्या त्याच्या मुठीत आहे. मयूर-शहानवाज-मरीअम्मल यांसारख्या सकारात्मक स्टोरीज कळतात त्याही सोशल मीडियामुळेच ना? माणसाचं आयुष्य अधिक सुंदर व अर्थपूर्ण करणारा एक 'पेंट ब्रश' आपल्या हातात असताना आपण निदान बरं चित्र काढून, बघणाऱ्याला आनंद देण्याचा 'विचार' तरी करतोय का? हा खरा प्रश्न आहे.
सोशल मीडियाचं जग हे सूरज बडजात्याच्या सिनेमासारखं आहे. चकचकीत आणि गोडगोड. त्या चकाचौंध दुनियेच्या पलीकडे एक अत्यंत विद्रुप-नागडे वास्तव जग आहे. मयूर, शहानवाज, मरीअम्मल हे त्या जगातले आहेत. पुढचं माहीत नाही, पण निदान ही कृती करताना तरी त्यांचे लाखो फॉलोअर्स नव्हते. त्यांच्या प्रोफाइलला 'blue tick' नव्हती. त्यांनी एकच गोष्ट केली - त्यांनी त्यांचा 'आतला आवाज' प्रमाण मानला! असा आवाज, ज्यावर एकही लाईक - कमेंट - शेअर - स्मायली नव्हती!
सध्याच्या काळात सगळी थिएटर्स आणि नाट्यगृह बंद असताना 'खरे हिरोज’ कोण असतात हे आता आपल्याला कळलंय. म्हणूनच आभासी जगातले आणि वास्तवातले हिरोज यांच्यातला फरक आपण वेळीच समजून घ्यावा, हे उत्तम. विराट कोहलीच्या बॅटिंगचा मी स्वतः चाहता आहे. पण कधीतरी त्याचं क्रिकेट थांबेल. त्यावेळी खांद्यावर प्रसिद्धीची, संपत्तीची कुठलीही झूल नसलेला विराट कसा असेल हे पाहण्याची मला उत्सुकता आहे.
पुढचं पुढे पाहू ! आजचं विचाराल तर मयूर, शहानवाज आणि मरीअम्मल हे मला अधिक 'विराट' वाटतात !
- नविन काळे
लेखक हे ‘स्वयं’चे सह-संस्थापक आहेत.