माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत. वय वर्षे ७५. त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. मी ऑफिसला जाताना सकाळी सकाळी समोर आले. डोळ्यावर जाड काळा गॉगल. मी म्हटलं, ‘काय आजोबा! मोतीबिंदू ऑपरेशन?’ तर हसत म्हणाले, ‘करून घेतलं रे. म्हणजे पुढे म्हातारपणी प्रॉब्लेम नको!’ माझी खात्री आहे, हे म्हणताना त्यांनी त्या काळ्या चष्म्याच्या आतल्या आत डोळा मारला असणार ! मला या असल्या ‘ऋतू हिरवा’ म्हाताऱ्यांचा जाम हेवा वाटतो. आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येक क्षण भरभरून जगणारी अशी आनंदी म्हातारी माणसं मला पिकून आलेल्या हापूस आंब्यासारखी वाटतात. अशाच काही ‘हापूस आंब्यांच्या’ आनंदी दीर्घायुषी माणसांची ‘secrets’ जाणून घेणारी एक अफलातून वेबसिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. त्या सिरीजचं नाव आहे Live to 100: Secrets of the Blue Zones !
या सिरीजमध्ये डॅन ब्यूटनर (Dan Buettner) हा अमेरिकन लेखक व पत्रकार जगातल्या अशा पाच भागांमध्ये फिरलाय,जिथे त्याला भरपूर प्रमाणात दीर्घायुषी आनंदी माणसं भेटली. ही नव्वदीच्या पुढची माणसं या वयात नाचतात, गातात, जंगलात कामं करतात, घोड्यावर-बिड्यावर बसून गावभर एकेकटे फिरतात, रोज मस्त वाईन-बिन पितात… या सर्व लोकांमध्ये काही कॉमन धागा सापडतोय का, याचा डॅनने घेतलेला शोध म्हणजे ही चार भागांची सिरीज आहे. अशा भागांना डॅन ‘ब्लू झोन्स’ (Blue Zones) म्हणतो.
कुठे कुठे आहेत हे ब्लू झोन्स?
हे आहेत - ओकिनावा (जपान), सार्डिनिया (इटली), निकोया (कोस्टा रिका), इकारिया (ग्रीस) आणि लोमा लिंडा (अमेरिका). या प्रत्येक भागाला डॅनने दिलेली भेट, तिथल्या लोकांची जीवनपद्धती, तिथल्या लोकांबरोबर त्याने मारलेल्या गप्पा, त्या प्रश्नांना या लोकांनी दिलेली लोभसवाणी इरसाल उत्तरं हे सगळं त्या सिरीजमध्ये मुळातून पाहण्यासारखं आहे.
पण तरीही, या सीरिजच्या माध्यमातून आनंदी दीर्घायुषी जगण्याच्या सिक्रेट्सचा एक लसावि निघतो. त्यावर आपण फक्त एक नजर टाकूया !
१. यांना आपल्या जगण्याचे प्रयोजन (Purpose) सापडले आहे
कोस्टा रिका मध्ये त्याला Plan de vida म्हणतात. ही स्पॅनिश term आहे. याचा अर्थ तुमच्या जगण्याचा ‘प्लान’ काय आहे? जगण्याचा उद्देश काय आहे? रोज सकाळी उत्साहात उठण्याचं तुमचं कारण काय आहे? Blue Zones मधील दीर्घायुषी लोकांना त्यांचा Plan de vida सापडलाय ! जपानमधल्या ओकिनावा या Blue Zone मध्ये याच अर्थाचा दुसरा शब्द आहे, जो तुम्ही कदाचित ऐकला असण्याची शक्यता आहे. तिथे म्हणतात - इकिगाय ! म्हणजे अशी गोष्ट, जी तुम्हाला करायला आवडते, जी तुम्हाला करता येते, ज्याची जगाला गरज आहे आणि जे करून तुमचा चरितार्थ चालतो. या सर्व लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिला की आपण अक्षरशः थक्क होतो ! यांना रोजच्या जगण्यातली आव्हाने नाहीयेत का? प्रॉब्लेम्स नाहीयेत का ? स्ट्रेस नाहीये का? नक्कीच आहे. फक्त तो स्ट्रेस ते स्वतःवर घेत नाहीत हा एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. रोज सकाळी उठून काय करायचं हे त्यांना आदल्या रात्री माहिती असतं. ते सकाळी उठून खूप काही ग्रेट करतात का? नाही, अगदी रोजच्या आयुष्यातली छोटी छोटी कामं करतात. शेती करतात, लाकडं तोडतात, स्वयंपाक करतात, झाडं लावतात… पण जे करतात ते मन लावून करतात. या लोकांना त्यांची रोजची कामं अशी प्रेमाने करताना पाहून मला एक झेन सुविचार आठवला -
मी शेती करायचो, गुरं चरायला न्यायचो, विहिरीतून पाणी काढायचो.
मग मला देव भेटला.
आता मी शेती करतो. गुरं चरायला नेतो. विहिरीतून पाणी काढतो.
२. ही माणसे अंगमेहनत करतात. ऍक्टिव्ह असणं हा त्यांच्या जगण्याचा भाग आहे.
डॅनच्या मते, लाखो वर्षांपासून उत्क्रांती होत माणूस या प्राण्याची रचना ‘अंगमेहनत आणि तुटवडा’ (Hardwork and scarcity) या दोन गोष्टींचा सामना करण्यासाठी झालीय. पण आता नेमकं उलटं झालंय. आपण आता अशा जगात राहतोय जिथे सगळ्या गोष्टी कष्ट न करता मिळतायत आणि त्या मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. यामुळेच की काय, ज्यासाठी वेगळा व्यायाम करावा लागत नसे अशी सर्व कामं आपण मशीनवर सोपवलीयेत. परिणामतः, आपल्याला निरनिराळ्या व्याधी आणि आजार जडलेत. ब्ल्यू झोन मध्ये राहणारी माणसं रोज हाताने काम करतात. भरपूर चालतात. श्रम करतात. खाली बसून कामं करतात. शेतीची कामं करतात. यामुळे त्यांची कंबर, पाय, गुडघे (lower body parts) एकदम तंदुरुस्त राहतात. त्यांची कामं, फेरफटका, गुरांना चरायला घेऊन जाणं हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. यामुळे कुठल्याही जिमला वगैरे न जाता ते एकदम ‘फिट’ राहतात ! १०,००० पावलं रोजच्या सहज जगण्यात होऊन जातात, त्यासाठी स्मार्टवॉचची गरज लागत नाही.
३. त्यांचं Diet आणि खाण्यापिण्याच्या सवयी
त्यांच्या लहानपणापासून खात आलेले परंपरागत अन्नपदार्थ ते खातात. जंक किंवा प्रोसेस्ड खात नाहीत. तिथली भौगोलिक परिस्थिती, हवामान, पाणी आणि तिथे मिळणारे अन्न, त्यातील जीवनसत्वे, या साऱ्या गणितांचा पूर्वजांनी आधीच विचार करून ठेवलाय. हे अन्न ते, अर्थातच, स्वतः बनवून खातात. ते अन्न तयार करण्यात, दुसऱ्यांना मायेने खाऊ घालण्यात, एकत्र बसून खाण्यात त्यांना खरा आनंद मिळतो. ते अन्न केवळ ‘उदारम् भरणं’ पुरते मर्यादित न राहता छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाचा भाग होते. ओकिनावा (जपान) मध्ये माणसे खाली बसून जेवतात. ‘हारा हाची बु’ या नावाची त्यांच्याकडे एक मस्त संकल्पना आहे. या शब्दांचा अर्थ आहे, ८०% पोट भरलं की थांबा ! हे सांगण्याचीही गरज नाही की ते भाज्या, फळे, कंद, धान्य, पालेभाज्या, मासे, हे निसर्गदेय अन्न जास्तीत जास्त खातात. साखर कमी खातात. (काही जणांना ऐकून खूप आनंद होईल की) ही सर्व माणसं रोज थोडीशी वाईन पितात ! निकोयाच्या एपिसोडमध्ये शंभरीकडे झुकलेल्या आजोबांचा नातू मात्र चिप्सची पिशवी हातात घेऊन चवीने चिप्स खात असतो. ‘हल्लीच्या मुलांना पूर्वीचं खाणं बोअरिंग वाटतं’ असं तिथलीही आई स्पॅनिशमध्ये सांगते. निकोयामध्ये देखील आता हळूहळू फास्ट फूड कंपन्यांचं आक्रमण झालंय असं डॅन खेदाने म्हणतो.
४. शिस्तबद्ध दिनक्रम आणि संध्याकाळी थोडं सैल होणं, slow होणं
या सर्व लोकांचा रोजचा दिनक्रम ठरलेला आहे. एक रुटीन आहे. सकाळी किती वाजता उठायचं, कामाच्या वेळा, रात्री झोपायची वेळ यामध्ये एक शिस्त आहे. पहाटे उठायचं. दुपारपर्यंत काही काम करायचं. दुपारी थोडा वेळ विश्रांती. मग परत संध्याकाळी थोडा वेळ काम. संध्याकाळी मात्र काम थांबवायचं ! आपल्या आवडत्या मित्र मंडळींना भेटायचं. एकत्र वाईन घ्यायची. गप्पा मारायच्या. हसायचं. थोडं सैल व्हायचं. Slow व्हायचं. संध्याकाळी झाडं हळूहळू मिटतात, तसं मिटायचं आणि झोपी जायचं. यातला महत्त्वाचा भाग आहे, एकेकटं आयुष्य न जगता आपल्या आवडत्या माणसांच्या घोळक्यात राहणं. आपापली सुखं-दुःखं शेअर करणं. माणसांचा सहवास आपल्याला ताजं टवटवीत ठेवतात असं ते मानतात.
वर दिलेल्या या गोष्टी फक्त एक झलक आहे. जसजशी आपण ही सिरीज पाहात जातो, तसतशा अनेक गोष्टी उलगडत जातात. कोणी म्हणेल, हे फक्त गावात शक्य आहे. पण तसं नाहीये हे डॅन पटवून देतो. सिंगापूरसारखं ‘हार्डकोअर’ शहर छोट्या छोट्या गोष्टींमधून ‘ब्ल्यू झोन’ होण्याचा कसा प्रयत्न करतंय हे त्या सिरीजमध्ये पाहाण्यासारखं आहे. इतकंच नाही, तर डॅनने हे आवाहन स्वीकारून अमेरिकेतील एका शहरामध्ये ब्ल्यू झोन निर्माण करण्याचा - तेथील Patterns शहरात निर्माण - प्रयत्न केला आणि तेथील लोकांचे आयुर्मान ३ वर्षांनी वाढले असं तो म्हणतो.
सगळं वाचून कोणीतरी नक्की म्हणेल,एवढं काय कौतुक करताय त्या ब्ल्यू झोनचं ! आपले कोकणातले / गावातले आजी आजोबा असेच तर जगत होते ! हे नक्कीच खरं असेल. पण आपण त्याच्या तळाशी जाऊन अभ्यास करण्यात कमी पडतो. डॅन ब्यूटनरने जगात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून याचा अभ्यास केला, लोकांना भेटला, माहिती जमा करून त्याचे रूपांतर एका थिअरीत केले आणि ते सर्व या वेब सिरीजमधून अत्यंत आकर्षक स्वरूपात मांडले. म्हणून त्याचे कौतुक आहे आणि ते आपण सर्वांनी मुळातून पाहिले पाहिजे !
या सिरीजमध्ये एक अतिशय हृद्य सीन आहे. सिरीजमध्ये स्टेमॅटिस मोरायटिस नावाच्या एका ग्रीक माणसाची गोष्ट येते. स्टेमॅटिस अमेरिकेत जातो. यशाच्या एका टप्प्यावर त्याला कॅन्सरचे निदान होते. जास्तीत जास्त सहा महिने ! सगळे डॉक्टर्स सांगतात. आयुष्याची शेवटची वर्षे तरी सुखाने घालवू म्हणून तो त्याच्या गावात परत जातो. त्या गावाचे नाव असते ग्रीसमधले इकारिया ! ब्ल्यू झोन ! सहा महिने काय, तो पुढची खूप वर्षे द्राक्षांच्या मळ्यात फिरत मस्त जगतो ! डॅन त्याला भेटायला जातो. इतक्या म्हातारपणीदेखील स्टेमॅटिस एवढा फिट आणि आनंदी असल्याचं पाहून डॅनला आश्चर्य वाटतं. तो स्टेमॅटिसला त्याचं रहस्य विचारतो. तुकतुकीत कांती असलेला तो मस्त हिरवागार म्हातारा स्टेमॅटिस हसत म्हणतो, I just forgot to die !
मृत्यूचाही विसर पाडणारं दीर्घायुष्य तुम्हाला हवं असेल तर तुमचा Plan de vida काय आहे ?