Get Better Each Week #4 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #4

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 7 July, 2023

Get Better Each Week #4

Person of the Week - डॉ राजेंद्र भारूड

मागचे काही दिवस Whatsappवर डॉ राजेंद्र भारूड यांची एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. डॉ राजेंद्र भारूड हे भिल्ल समाजातील पहिले IAS ऑफिसर! घरी कोणीही शिकलेलं नव्हतं. परिस्थिती इतकी वाईट की त्यांची आई दारू गाळायचं काम करायची. संध्याकाळी गावातली माणसं दारू प्यायला घरी यायची. अशा परिस्थितीत राजेंद्र भारूड शिकले. MBBS डॉक्टर झाले. पुढे IAS ऑफिसर झाले. आज सरकार दरबारी एक अत्यंत प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. 

ती पोस्ट वाचून अनेकांनी मला त्यांचे नाव ‘स्वयं’साठी सुचवले. 

सांगायला अतिशय आनंद होतोय की २०१७ सालच्या एका ‘स्वयं’मध्ये डॉ राजेंद्र भारूड बोलून गेले आहेत. इतकंच नाही, तर त्यांचा व्हिडीओ पाहून अनेक निराश तरुण प्रेरित झाले असेही नंतर कळले. त्या व्हिडीओची लिंक या लेखाच्या शेवटी शेअर करतोय. तुम्ही तो व्हिडीओ पाहिला नसेल तर जरूर पाहा आणि शेअर करा. 

या आठवड्यात डॉ भारूड यांची ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर साहजिकच डॉ भारूड यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. विशेष करून, ते 'स्वयं' मध्ये बोलण्यास कसे तयार झाले ही गोष्ट आज तुम्हाला सांगायला आवडेल.  

ही गोष्ट आहे २०१७ ची. ‘मनोबल’चा संस्थापक आणि संपूर्ण महाराष्ट्रात ‘मास्तर’ म्हणून ओळख असलेला आमचा मित्र यजुर्वेंद्र महाजन याने माझी आणि डॉ भारूड यांची ओळख करून दिली. त्यावेळी डॉ भारूड सोलापूर जिल्ह्याचे CEO म्हणून काम करत होते. आमचे पहिले बोलणे फोनवरून झाले. ‘स्वयं’मध्ये तुमची गोष्ट सांगाल का? अशी विनंती केल्यावर डॉ भारूड चटकन तयार नाही झाले. स्वतःबद्दल बोलण्यास त्यांना संकोच वाटत होता. ‘मी स्वतःबद्दल का बोललं पाहिजे याचं सबळ कारण मला सापडत नाहीये.’ डॉ भारूड म्हणाले. मला कुठल्याही परिस्थितीत त्यांना ‘स्वयं’मध्ये आमंत्रित करायचं होतं. डॉ भारूड यांनी त्यांची गोष्ट सांगायलाच हवी होती. ती गोष्ट ऐकून लाखो मुलांना प्रेरणा मिळणार होती. क्षणाचाही विलंब न करता मी म्हटलं, ‘सर मी सोलापूरला येऊ का? मला तुम्हाला भेटायचंय.’ डॉ भारुडांनी होकार दिला. 

मी याच क्षणाची वाट पाहात होतो. फक्त भारुडांना भेटायला मुंबईहून सोलापूरला जायचं आणि भेटून त्याच दिवशी परत यायचं असं ठरलं. मी आणि माझी पत्नी दिलेल्या दिवशी आणि वेळी डॉ भारूड यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचलो. डॉ भारूड आणि त्यांच्या पत्नीने आमचा छान पाहुणचार केला. मी भारुडांना ‘स्वयं’बद्दल माहिती दिली. भारुडांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाले, मला आत्ता एक काम आलंय त्यामुळे जावं लागेल. तुमची परवानगी असेल तर आज संध्याकाळी आपण पुन्हा भेटूया का? मला याबद्दल आणखी बोलायला आवडेल. तुम्ही आज दोघे जेवायलाच या.’ आमची तशीही रात्रीची गाडी होती. (अर्थात दुपारची गाडी असती तरी मी रद्द केलीच असती.) आम्ही पुन्हा संध्याकाळी त्यांच्या घरी पोहोचलो. इथल्या तिथल्या गप्पा मारत जेवण झालं. त्यानंतर डॉ भारुडांनी त्यांच्या घराचा सगळा परिसर दाखवला. त्यांची आई त्यांच्याजवळच राहते. तिला गावासारखं वाटावं म्हणून त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटासा गाईचा गोठासुद्धा होता. मग आम्ही मुख्य मुद्द्यावर आलो. घराच्या अंगणात डॉ भारूड आणि मी फेऱ्या मारत बोलू लागलो. माझी पार्श्वभूमी, मी हे का करतोय, या सगळ्या प्रयत्नाचं ‘मॉडेल’ काय असे अनेक प्रश्न डॉ भारुडांनी मला विचारले. ‘मी स्वयं मध्ये का बोलायला हवं असं तुम्हाला वाटतं?’ डॉ भारूड यांच्या या प्रश्नाची मी वाटच पाहात होतो. यावर मी बहुतेक खूप बोललो. पण त्याचं gist असं होतं की आजचे रोल मॉडेल्स कुठे आहेत असं विचारलं जात असताना तुमची गोष्ट तरुणांसमोर येणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पुस्तकात तुमची गोष्ट जरी आली असली तरी ती टॉकच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहाचेल.’ त्या छोट्याशा अंगणात आम्ही शेकडो फेऱ्या मारल्यावर डॉ भारुडांनी काहीशा संकोचाने होकार दिला. मी भरून पावलो. माझ्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची तर होतीच पण खूप काही शिकवणारी होती. मोठी माणसं एखाद्या गोष्टीवर कसा वेगवेगळ्या बाजूने विचार करतात हे मी शिकलो. त्या गप्पांमध्ये डॉ भारूड यांनी सांगितलेली एक गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. ‘नविनजी, मी लहानपणापासून वेगळाच होतो. त्या गरिबीत, आदिवासी पाड्यावरच्या त्या झोपडीबाहेर बसून मी आकाश पाहात बसे. वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी मला प्रश्न पडे, हे सूर्य - चंद्र - तारे का आहेत? देवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती का केली असेल? यात मी कुठे आहे? मला जन्माला घालण्यामागे काय प्रयोजन असेल?’     

२०१७ सालच्या ‘औरंगाबाद स्वयं’मध्ये (आताचं छ. संभाजीनगर) डॉ राजेंद्र भारूड यांचा ‘स्वयं टॉक’ आणि त्यांनतर डॉ उदय निरगुडकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. एका निःशब्द शांततेत डॉ भारूड यांचे मनोगत ऐकताना संपूर्ण सभागृह हेलावून गेले होते. दारू गाळताना त्यांची आई लोकांना सांगत असे, माझा राजू एक दिवस कलेक्टर होऊन दाखवेल. घरात आलेल्या दारुड्या लोकांना शेंगदाणे फुटाणे देणारा ‘राजू’ आज एक प्रतिष्ठित IAS अधिकारी म्हणून बोलत होता. ऐकताना प्रेक्षकांच्या डोळयांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या दिवशी डॉ भारूड अतिशय साध्या कपड्यांमध्ये आणि स्लीपर घालून वर्गात आले. त्यांचा अवतार पाहून बाकावर बसलेली शहरी मुलं त्यांच्यापासून चार फूट लांब सरकली होती. हा प्रसंग सांगताना क्षणभर भावुक झाल्यामुळे डॉ भारुडांचा तो ‘पॉज’ माझ्या आजही लक्षात आहे. 

'स्वयं' मध्ये डॉ राजेंद्र भारूड !

या कार्यक्रमाआधी एका मुलाचा फोन आला होता. ‘सर, मी अमुक अमुक बोलतोय. डॉ राजेंद्र भारूड ‘स्वयं’मध्ये बोलणार आहेत असं कळलं. मी खूप लांबून येणार आहे. माझ्याकडे फक्त बसच्या भाड्याचेच पैसे आहेत. कार्यक्रमाच्या तिकिटाचे पैसे माझ्याकडे नाहीत. मी आलो तर चालेल का?’  त्याक्षणी मला काय वाटलं हे शब्दांत मांडणं कठीण आहे. कार्यक्रम संपल्यावर तो मुलगा मला येऊन भेटला. त्याने मला एक निःशब्द शेकहॅण्ड केला. अशावेळी शब्दांची गरज नसते. 

या कार्यक्रमाची आणखी एक हृद्य आठवण. कार्यक्रम संपल्यावर जेवणं झाली. गप्पा झाल्या. सर्व वक्ते आपापल्या हॉटेल रूम्सवर गेले. आमची टीम देखील आमच्या रूम्सवर परतली. रात्री साडेदहा वाजता मला डॉ भारुडांचा फोन आला. ‘नविनजी, या कार्यक्रमाच्या सगळ्या धावपळीत तुमच्या टीमला भेटायचं राहून गेलं. मी उद्या सकाळी लवकर निघत आहे. तुम्ही सगळे जागे असाल तर भेटायला याल का?’  पुढच्या वीस मिनिटांत पंधरा वीस जणांची आमची टीम हॉटेलवर पोहोचली. आम्ही सगळे त्यांच्या रूममध्ये बसणं शक्यच नव्हतं. पण डॉ भारुडांनी आम्हाला त्यांच्या रूमवर बोलावलं. स्वतः खाली बसले. कोणी खाली, कोणी बेडवर, कोणी खुर्चीवर असे आम्ही त्यांच्या आजूबाजूला बसलो. त्यांनतर साधारण तासभर डॉ भारुडांनी आमच्या संपूर्ण टीमबरोबर निवांत गप्पा मारल्या. प्रत्येकाची चौकशी करून तुम्ही एकमेकांना भेटलात कसे, इथे काय काम करता असे नाना प्रश्न विचारून त्यांनी सर्वांना बोलतं केलं. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या या व्यक्तीकडून मिळालेल्या या अकृत्रिम प्रेमाने आम्ही सर्वजण भारावून गेलो. 

आजवर मी डॉ भारुडांना दोन तीन वेळाच प्रत्यक्ष भेटलो असेन. पण या सर्व प्रसंगांमुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झालाय. इतक्या कमी वयात एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ राजेंद्र भारुडांच्या या हृद्य आठवणी माझ्यासाठी अत्तराचे थेंब होऊन राहिल्या आहेत. 

चांगलं घर, सक्षम कुटुंब, सर्व सोयी-सुविधा असूनही नशिबाच्या नावाने बोटे मोडणारी मुलं पाहिली की मला डॉ भारूड आठवतात. कितीही टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीत एक मोठं स्वप्न पाहून इच्छाशक्ती आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर ते पूर्ण करणाऱ्या डॉ राजेंद्र भारूड यांची गोष्ट म्हणूनच प्रत्येकाने ऐकायला हवी. या व्हिडीओची लिंक खाली दिली आहे.

( https://youtu.be/Yg6d-xUge04 )

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

स्वप्नाचे अंतर मिटवणारा: मडू

गायकाने अगदी नजाकतीनं एखादा राग घेऊन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवत मैफिल सजवावी तसाच जिवंत अनुभव इथे आपल्याला येतो....

व्यवसायाचे ‘शार्क’ सूत्र!

प्रत्येकजण आयुष्यात व्यवसाय करू शकेल अशातला भाग नाही, मात्र 'शार्क टॅंक इंडिया' या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून...

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...