पुस्तकांच्या गावा जावे - Welcome to Swayam Talks
×

पुस्तकांच्या गावा जावे

पराग खोत

स्वत:च्या आणि समाजाच्या उत्कर्षाकरिता ज्ञानकौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी वाचन हा एक अपरिहार्य पर्याय आहे हे निश्चित. पुस्तकं वाचणे किंवा ऐकणे किती आवश्यक आहे याबद्दल सांगतोय पराग खोत
 

Published : 8 February, 2021

पुस्तकांच्या गावा जावे

एखाद्या पुस्तकांच्या दुकानात शिरलो आणि काही न घेताच बाहेर पडलो असं सहसा होत नाही. जे पुस्तक घ्यायला आपण गेलो होतो ते जरी मिळालं नाही तरी दुसरं काहीतरी छानसं तिथे असतंच. आकर्षकपणे मांडलेली, नव्याजुन्या लेखकांची विविध विषयांवरची पुस्तके मनाला भुरळ घालीत असतात. तिथे रेंगाळून ती चाळावीत हा मोह आवरता न येण्यासारखा असतो. नव्याकोऱ्या छापील पुस्तकांना एक विशिष्ट वास असतो. चाहते त्या वासानेही भारावतात. अलगदपणे तिथले एखादे पुस्तक हातात घेऊन, अलवार त्याची पाने उलटत तिथेच एखाद्या बैठकीवर बसून ग्रंथानंदी तल्लीन होणारा तो खरा पुस्तकप्रेमी. बरं हा अस्सल पुस्तकवेडा फक्त मोठमोठ्या दुकानातच रमतो असंही नाही. मुंबईपुण्यात रस्त्यावर हारीने मांडून विक्रीस ठेवलेल्या पुस्तकांवरही त्याचा तितकाच जीव असतो. किंबहुना तिथे दुर्मीळता अधिक असते. जंगजंग पछाडूनही न गवसलेला एखादा दुर्लभ ठेवा तिथे मिळण्याची शक्यता अधिक. रस्त्यावर मिळालेली अशी अनेक दुर्मीळ पुस्तके माझ्या संग्रही आहेत. नव्याकोऱ्या पुस्तकांसोबतच ती जुनी आणि काहीशी जीर्ण झालेली पुस्तके विराजमान झाली आहेत. त्यांचे साहित्यिक मूल्य मोठे आहे.

वाचनेंद्रिये शाबूत असूनही जी मंडळी पुस्तकवाचन करीत नाहीत ती खरंच अभागी होत. मेकाॅलेने म्हणून ठेवलंय की वाचनविन्मुख राजा होण्यापेक्षा पुस्तकांनी भरलेल्या पोटमाळ्यावरील मठीत चणेकुरमुरे खाऊन जगणं मी अधिक पसंत करीन (I would rather be a poor man in a garret with plenty of books, than a king who did not read) पुस्तकवाचन हा नेहमीच एक आल्हाददायक अनुभव असतो. चांगली पुस्तके वाचीत असताना कळत नकळत आपली बहुश्रुततेची आणि ज्ञानाची पातळी उंचावत जाते. अनुभवाला विलक्षण धार येते. मोठेसुद्धा वाचत नाही हे म्हणण्याच्या काळात पुण्याची सई कुलकर्णी वयाच्या बाराव्या वर्षीच अफाट वाचन करते. तिने संपूर्ण शेक्सपियर वाचून काढला आहे, नव्हे तिला तो मुखोद्गत आहे. आता तर ती शेक्सपियरच्या शैलीत लिहू लागली आहे. विषयवैविध्याचे वरदान लाभलेल्या पुस्तकांनीच हे मानवी जीवन समृद्ध करुन ठेवले आहे.

कधीतरी चाळा म्हणून माझ्या दिवसभराच्या प्रवासात कोणी पुस्तकाचे वाचन करीत असलेला समविचारी दिसतोय का ते पहात असतो. माझिया जातीचा मिळो आम्हा कोणी ही आस असते. सध्या पुस्तके वाचण्यासोबत ऐकण्याचीही सोय आहे. Podcast किंवा इतर माध्यमांतून जगातले सर्वोत्तम साहित्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तरीसुद्धा लोकांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे का असा प्रश्न पडतो. संगणकामुळे आपण लिहीणे कधीच कमी केले आहे. मात्र परिस्थिती एवढी वाईट नाही असेही वाटते. कधीतरी मी पुस्तक वाचत असताना एखादा सहप्रवासी आवर्जून त्या पुस्तकाची चौकशी करतो आणि मन सुखावते. स्टेशनवर असलेल्या पुस्तकाच्या छोट्याशा स्टाॅलवर गर्दी दिसते आणि हुरुप वाढतो. कधी कोणाच्या घरी गेलो असता पुस्तके नीटस मांडून ठेवलेली दिसतात आणि प्रसन्न वाटते. ग्रंथालयात एखाद्या पुस्तकासाठी क्लेम लागलेले आहेत हे समजतं आणि आशेचा किरण दिसतो. प्रत्येक कुटुंबाने दरमहा किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचावे आणि संग्रही ठेवावे. भेटवस्तू देतानाही पुस्तकांचा पर्याय विचाराधीन असावा म्हणजे ही वाचनसंस्कृती टिकून रहाण्यास मदत होईल. पुस्तकप्रेम हे फक्त शहरी वाचकांपुरतेच मर्यादित नसून ग्रामीण भागातला वाचकही आपापल्या परीने पुस्तके मिळवून वाचण्याचा प्रयत्न करीत असतो. Storytel आणि अशा इतरही Apps चा सभासदवर्ग वाढतोय.

पुस्तकांचे आदानप्रदान, त्यावरील चर्चा आणि व्याख्याने, त्यांची खरेदी - विक्री आणि एकंदरीतच पुस्तकांच्या गावा जावे ही भावना मनामनात रुजायला हवी. सुसज्ज ग्रंथालये ही देवालये व्हावीत आणि ग्रंथ हेच गुरु हा जयघोष असावा. पुस्तकांचे गाव असलेल्या भिलारच्या प्रतिकृती देशभरात उभ्या रहाव्यात. त्यासाठी त्यांना राजाश्रय आणि लोकाश्रय लाभावा. आपण चांगली पुस्तके एकमेकांना वाचायला आणि ऐकायला द्यायला हवीत. अमृत देशमुख या Booklet Guy कडून किंवा Blinkist सारख्या App मधून जगभरातील पुस्तकांविषयी माहिती करुन घ्यायला हवी. मात्र हे सर्व व्हायचे असेल तर मुळात पुस्तकांविषयीची आस्था जपायला हवी. रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे, दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे ही उक्ती अंगिकारण्याची गरज आहे. भाषेची श्रीमंती टिकवून ठेवायची असेल तर हे आवश्यक आहे. समृद्ध साहित्य पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता आणि अशाच कसदार साहित्याच्या निर्माणाकरिता चळवळ उभी करणे जरुरीचे आहे. त्यासाठी निरंतर वाचन आणि लेखन व्हायला हवे. आपण सर्वांनी त्यासाठीचा आपला खारीचा वाटा उचलायला हवा.

पराग खोत

लेखक हे स्वयं टाॅक्सच्या Content team चे सदस्य आहेत

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...