आयुष्याच्या या सुंदर प्रवासात काही गोष्टी जाणीवपूर्वक अर्धवट सोडल्या, तर नंतर त्या पूर्ण करताना लाभणारं समाधान अवर्णनीय असतं. आत्मबलाचा हा थोडा वेगळा अनुभव कसा घ्यावा याबद्दल सांगतेय वैष्णवी कानिटकर
Sometimes it is good to keep some things incomplete ……
बऱ्याचदा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की सगळ्या लोकांचा प्रत्येक काम पूर्ण करण्याकडे कल असतो. म्हणजे आपल्यावर तसे संस्कारच झालेले असतात, 'हाती घ्या ते तडीस न्या' ही आपली सवय असते. पण तुम्ही कधी असा विचार केलाय, की एखादे काम, एखादी गोष्ट, एखादा संवाद किंवा एखादा खेळ जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवल्यास काय होईल? काही वेळा असे केल्याने माणसे एकमेकांशी जोडलेली राहतात, एका अनामिक बंधनात ते गुंतून पडतात. “अरे आपली ही गोष्ट पूर्ण करायची राहिली आहे” किंवा “त्यावेळी त्याच्याशी हे बोलायचं राहूनच गेलं” ही भावना मनाच्या एका कोपऱ्यात घर करून बसलेली असते.
'प्यार तो होना ही था' या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि त्याच्या वडिलांचा बुद्धिबळाचा डाव अर्धवट राहिलेला असतो. जेव्हा अजय देवगन त्याच्या गावाला, त्याच्या घरी जातो तेव्हा ते, तो खेळ आहे तिथून पुन्हा सुरु करतात. एक नवा विचार आणि जिद्द घेऊन तिथून एक नवी सुरुवात करतात. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यानिमित्ताने बऱ्याचदा आपण पुन्हा त्या व्यक्तींना भेटतो. त्या भेटीत एक नवी उमेद सापडते आणि आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणारी एक वेगळी दृष्टीसुद्धा. हीच गोष्ट त्यावेळी पूर्ण झाली असती तर पुन्हा भेटायची इतकी ओढ वाटली असती का?
'पर्ड्यू (Perdue) ' नावाचे एक विद्यापीठ आहे अमेरिकेत. तेथे त्यांनी एका खांबाचे बांधकाम अर्धवट सोडले आहे, त्याचा अर्थ असा होतो, 'शिक्षण हे कधीच पूर्ण न होणारे आहे, ते कायम अपूर्णच राहते आणि ती process कायम चालूच असते, जन्मभर!' तो प्रतीकात्मक खांब पर्ड्यू विद्यापीठाच्या विचारसरणीचा द्योतक आहे.
आपण कितीही काहीही करायचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी आपल्या हातून निसटून जातातच. पण त्या निसटलेल्या गोष्टींकडे आपण निराशेने न बघता जर या दृष्टीकोनातून पाहिले तर आपला कल अशा काही गोष्टी मुद्दामहून राखून ठेवण्याकडे राहील. बऱ्याच गोष्टी असतात ज्या काही वेळा अपूर्ण सोडल्या तर आपल्याला एक प्रकारची हुरहूर लागून राहते आणि मग तीच गोष्ट तुम्हाला सतत एक नवी ऊर्जा देत राहते.
या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जमल्या तर नक्की करून पहा:
-एक ठराविक तारीख ठरवून त्या तारखेला संपूर्ण ग्रुपने एखाद्या ठिकाणी भेटायचे आणि तोवरच्या आपापल्या Achievements शेअर करायच्या
आपण आपल्या आयुष्यात सतत नवनवीन ध्येय साध्य करीत असतो. त्या Success Stories इतरांसोबत शेअर करीत राहिलो तर नवा हुरुप येतो आणि इतरांना प्रेरणा मिळते. आठवणींच्या पुस्तकातील अशी काही पाने जर का न वाचता ठेवली असतील तर जाणीवपूर्वक त्याचे वाचन अवश्य करायला हवे. परिपूर्णतेचा प्रयास आणि त्या दिशेने आपला प्रवास हा अशा एखाद्या आठवणीतून सुरु होऊ शकतो. आपल्या सुह्रद आपल्याला नेहमी भेटतातच असे नाही. पण जर असे एखादे अपूर्ण राहिलेले निमित्त असेल तर नक्की भेटणे होते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि त्यातून नवीन आठवणी जन्माला येतात.
'MANY TIMES WE DON'T EVEN REALIZE, THAT WE ARE MAKING MEMORIES WHICH MIGHT TAKE US TO OUR GOALS …'
- वैष्णवी कानिटकर
लेखिका ही Economist & Personality Reader असून, स्वयंच्या Content Team ची सदस्य आहे.