Built to Last ही जगन्मान्य उक्ती येणाऱ्या काळात आपल्याला बदलावी लागणार आहे का? नक्की काय म्हणतोय नविन काळे हे वाचा.
लॉकडाऊनच्या काळात 'Business World' मध्ये प्रकाश अय्यर यांचा एक सुंदर लेख वाचनात आला होता. मध्य अमेरिकेत चोलुटेका (choluteca) नदीवर असलेल्या एका ब्रिजची ही गोष्ट. हा ब्रिज ज्या ठिकाणी बांधण्यात आला त्या परिसरात नेहमीच भयानक वादळे होत असतात. त्यामुळे त्या वादळांचा सामना करूनही त्या ब्रिजने पुढील अनेक वर्षे भक्कमपणे उभं राहणे अपेक्षित होते. दोन वर्षांनी त्या ब्रिजचे लोकार्पण करण्यात आले. त्या परिसरातील एक सुंदर व अभिमानास्पद वास्तू म्हणून त्या ब्रिजची ख्याती सर्वदूर पोहोचली. दुर्दैवाने त्या परिसराला त्याच वर्षी एका भल्या मोठ्या वादळाचा तडाखा बसला. सुमारे सात हजार लोकांनी आपला जीव गमावला. त्या परिसरातील सर्व पूल वादळामुळे कोलमडून पडले, अपवाद एकाच ब्रिजचा. त्या वादळातही चोलुटेका ब्रिज भक्कमपणे उभा होता ! पण आता एक वेगळीच गोची झाली होती. त्या ब्रिजकडे जाणारे दोन्ही बाजूंचे रस्ते वादळात वाहून गेले होते. इतकंच नाही तर वादळाचा जोर इतका मोठा होता की त्या ब्रिजखालून वाहणाऱ्या चोलुटेका नदीने आपला प्रवाह बदलला होता आणि आता ती ब्रिजच्या खालून नाही तर त्याच्या बाजूने वाहत होती. चोलुटेका ब्रिज मात्र भक्कमपणे होता - कुणालाही न जोडणारा !
'A bridge over nothing. A bridge to nowhere.'
या घटनेचा संदर्भ देत लेखक आपल्यासमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित करतात. अनेक वर्षांचा अभ्यास व अनुभव यांच्या जोरावर उभी राहिलेली आपली 'भक्कम' प्रोफेशन्स, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी कालसुसंगत (relevant) आहेत का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेल तर, आपली अवस्था त्या ब्रिजसारखीच झालीय का ?
या लेखाने मला अंतर्मुख केलं.माझ्या आजूबाजूला मी वादळानंतरचे 'चोलुटेका ब्रिज' पाहतोय.त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या कामात ते अत्यंत कुशल आहेत. पण त्या सगळ्याचा आज काही relevance नाहीये.
काहींना तो बदल झेपला, काहींनी तो मनाविरुद्ध स्वीकारला. लॉकडाऊनमध्ये त्यांनी अशा काहीगोष्टी केल्या किंवा त्यांना कराव्या लागल्या ज्याचा त्यांच्या शिक्षणाशी, मूळ व्यवसायाशी, वर्षानुवर्षे सवयीने करत असलेल्या गोष्टींशी काहीही संबंध नव्हता. उच्चपदस्थ लोकांनी भाज्या विकल्या…खडू फळ्याशी सलगी असलेल्यांनी ऑनलाईन वर्ग घेतले. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यावर ते कदाचित पुन्हा एकदा आपल्या मूळ व्यवसायात / अनुभवात परत जातील. आताच्या परिस्थितीकडे केवळ एक नॉस्टॅल्जिया म्हणून पाहतील.
पण प्रकाश अय्यर यांनी उपस्थित केलेला मुद्दा अधिक मूलभूत आहे. 'कोरोना'कडे केवळ एक तात्कालिक समस्या म्हणून बघायचं नाहीये. आज घडलंय हे उद्याही घडू शकणार आहे. उद्या येणाऱ्या समस्यांसोबत लढायची तयारी आजपासून करावी लागेल आणि या लढाईसाठी 'लवचिकता' (Flexibility) हे सर्वात प्रभावी शस्त्र असणार आहे. आपल्या करियर्सच्या 'ब्रिज'ची दिशा नदीच्या प्रवाहावर अवलंबून असणार आहे. सतत नवीन काही आजमावत राहणं- शिकत राहणं हा नव्या जगाचा मंत्र असणार आहे. डॉक्टर्सना स्वयंपाक शिकावा लागेल, आजीला 'गुगल-पे' शिकावं लागेल, एखाद्या CEO ने रस्त्यावर उभं राहून भाजी विकून पाहावी, माझ्यासारख्या लेखकांनी तांत्रिक उपकरणे दुरुस्त करणे शिकून घ्यावे ! काही निवडक अपवाद वगळता, इंटरनेटमुळे आज हव्या त्या गोष्टी घरबसल्या शिकणे कधी नव्हे इतकं शक्य आहे. आज मी इंजिनियर आहे, पुढची पाच वर्षे मी स्कुबा डायव्हिंग करणार आहे आणि त्यापुढची पाच वर्षे मी फक्त शेफ म्हणून काम करणार आहे… आपल्या करियरच्या बाबतीत अशा 'बेधुंद' विचारांची कुजबुज मनात होत असतानाच 'कोव्हीड'नेच पुन्हा एकदा त्याकडे आपलं लक्ष वेधलंय.
'Survival of the fittest' मधील 'fittest' शब्दाचा अर्थ डार्विनला 'बलवान' नसून 'अधिक लवचिक' असाच अपेक्षित होता. त्याच न्यायाने, आपला 'Core' भक्कम ठेवून काळाप्रमाणे जो बदलत राहील तोच पुढील जगात यशस्वीपणे टिकेल.
Built to Adapt - not Built to Last - is going to be the new normal !
- नविन काळे
लेखक 'स्वयं टॉक्स'चे संस्थापक सदस्य आहेत.