'स्वयं पुणे' तिथे काय उणे ! - Welcome to Swayam Talks
×

‘स्वयं पुणे’ तिथे काय उणे !

समीर आठल्ये

स्वयं पुणे' चा प्रतिनिधी समीर आठल्ये सांगतोय स्वयं आणि त्याच्या नात्याबद्दल - त्याच्या खास तिरकस पुणेरी शैलीत' !!
 

Published : 27 April, 2020

‘स्वयं पुणे’ तिथे काय उणे !

'स्वयं पुणे' चा प्रतिनिधी समीर आठल्ये सांगतोय स्वयं आणि त्याच्या नात्याबद्दल - त्याच्या खास तिरकस पुणेरी शैलीत' !!

काही काही दिवस भारी उजाडतात.
म्हणजे प्रत्येकवेळी आपल्याला सकाळीच ते लक्षात येतं, असं नाही.. !

एकदा ('रूरल रिलेशन्सचे)' प्रदीप लोखंडे सरांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्या वेबसाईटचं काम करत होतो.
प्रदीप सरांच्या ऑफिसमध्ये मी आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांना भेटलोय.
आज प्रदीप सरांसमोर तीन लोक बसले होते. मी पोहोचायच्या आधी पासून त्यांची काही कामाची चर्चा चालू होती.
ते तीन लोक होते स्नेहल काळे, नविन काळे आणि आशय महाजन. प्रदीप सरांनी ओळख करून दिल्यानंतर मला समजलं की ते 'स्वयं टाॅक्स' नावाचा कार्यक्रम करतात. मला ती कल्पना ऐकल्या ऐकल्या आवडली.
तिथुन बाहेर पडलो आणि मी डायरेक्ट त्यांच्याबरोबर 'स्वयं'च्या दोन मीटिंग अटेंड केल्या.
कल्पना आवडली म्हणुन आणि मी तसाही रिकामा असतो म्हणुन ! त्यातली दुसरी मीटिंग होती पुष्कर औरंगाबादकर बरोबर. पुष्करने लिहिलेल्या आधीच्या लेखात ज्या 'टोळीचा' उल्लेख केला आहे त्यात मी पण होतो. त्यामुळे त्याबद्दल जास्त काही लिहायची गरज नाही.

प्रदीप सरांच्या ऑफिस मधुन निघुन मीटिंगला पोहचेपर्यंत गाडीत खूप गप्पा झाल्या आणि त्यात मला समजलं की त्यांना पुण्यात 'स्वयं' करायचं आहे. मी तर मनात ठरवून टाकलं होतं की, हा कार्यक्रम पुण्यात मीच करणार ! पहिलं कारण म्हणजे, माणसं बरी वाटत होती आणि दुसरं म्हणजे कार्यक्रमाची तिकीटे गळ्यात मारल्याची 'गिल्ट' पण वाटणार नव्हती ! (कार्यक्रम हाऊसफुल्ल असतो, गळ्यात नाही मारावी लागत तिकिटे !)

काही दिवस कसे भारी उजाडतात याबद्दल मी जो सुरवातीला उल्लेख केला आहे, तो या तिघांसाठी केलाय ! कारण त्यांना कल्पनाही नसेल की त्यांना मी आज भेटेन !

असो ! 'जुलै'मध्ये शक्यतो दुसर्‍या शनिवारी 'पुणे स्वयं' करायचं असं ठरलं. त्याप्रमाणे बाल शिक्षण शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये पुण्यातलं पहिलं स्वयं पार पडलं. पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला होता. आमचे मित्र अनिल ताथवडेकर, प्रशांत चोरडिया आणि राहुल असनीकर यांच्या मदतीने तीस एक होतकरू मुलांनाही कार्यक्रम बघता आला. पाहिल्या वर्षीच इतकी मजा आली आणि इतक्या लोकांना भारावून गेलेलं बघुन पुढच्या वर्षीच स्वयं कधी होतय असं झालं होतं, मंगेश आणि मला.

कार्यक्रमाचा कंटेंट तर चांगला होताच पण मला आवडलेली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने स्वयं टीम काम करते ! कुणीही कुणावरही चिडत नाही. प्रत्येकजण आपापले काम प्रामाणिकपणे करत असतो. (याठिकाणी मी श्री यजुर्वेंद्र महाजन आणि माझा स्वतःचा विशेष उल्लेख करू इच्छितो. बाकीच्या टीमने विशेषतः शिल्पा व भाग्यश्रीने यातून योग्य तो बोध घ्यावा ! गम्मत केली ! त्या नीट करतात काम.. उगाच त्यांना त्रास देण्यासाठी…!!) स्वयंचे एक मस्त टेंप्लेट आहे ज्यामध्ये प्रत्येकवेळी येणार्‍या नवीन गोष्टी सुद्धा अतिशय बेमालूमपणे ऍड होतात. त्यामुळे कार्यक्रम स्ट्रेसफुल होत नाही. त्याचे क्रेडिट अर्थातच नविन आणि आशय यांना जातं.

स्वयं २०१८ माझ्या विशेष लक्षात राहिलं. एक जबरदस्त अनुभव आला. कार्यक्रमाच्या आधी पाच दिवस नविनने पुणे स्वयं साठी लिहिलेला what's app मेसेज व्हायरल झाला. त्या मेसेज मध्ये नविन आणि माझा मोबाईल नंबर होता. काहीही कल्पना नसताना मंगळवार सकाळ पासून इतके फोन यायला सुरुवात झाली की दुपापर्यंत कार्यक्रम 'हाऊसफुल्ल' झाला. तरी फोन काही थांबेनात. नविन आणि मला मिळुन 4 दिवसात १००० पेक्षा जास्त फोन आले. 'तिकीटं संपली आहेत' सांगितले की लोक नाराज होत होते तर काहीजण चक्क चिडत होते. काही जण आम्ही उभं राहुन, खाली बसुन बघतो अशा विनंत्या करत होते.

'स्वयं टाॅक्स' पुण्यात आता चांगलच माहिती झालंय लोकांना. लोक आता स्वतःहुन फोन करून विचारतात की पुढचा कार्यक्रम कधी आहे. मला 'स्वयं' माहीत झाल्यापासून खात्री होती की पुण्यात हा प्रकार हिट होणार आहे ! 'स्वयं'ची कंटेंट क्वालिटी आणि स्वच्छ हेतू पाहून मागच्या वर्षीपासून 'पुणे स्वयं' साठी प्रशांत चोरडिया सरांसारखा एक संवेदनशील कायमस्वरूपी पाठीराखा मिळाला याचा विशेष आनंद वाटतो. बरेच लोक आता वर्षात दोन वेळा तरी स्वयं आयोजित करा म्हणुन मागे लागतायत. एकदम मस्त वाटतं !

या लेखाचा शेवट मी फार कोणाला माहीत नसलेल्या एका व्यक्तिगत आठवणीने करणार आहे. २०१७ सालच्या स्वयं मध्ये सुजाता रायकर यांचा थॅलिसिमिया विषयीचा टॉक होता. तो टॉक ऐकून माझ्या शाळकरी भाच्याने त्याचा वाढदिवस साजरा न करता ते पैसे सुजाता ताईंना थॅलिसीमीयाग्रस्त मुलांसाठी देऊ असं त्याच्या आईला सांगितलं ! ती रक्कम कदाचित फार नसेल, पण ही घटना 'स्वयं'साठी खुप महत्त्वाची आहे असं वाटतं !

'स्वयं सेवक' म्हणून काम करायला मजा येण्याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम शिस्तीत आणि न रागावता, न रुसता चालतात. स्वयंची संधी मिळण्याच्या काळात मी माझ्या रुटीन कामाला बर्‍यापैकी कंटाळलो होतो. 'स्वयं'मुळे अनेक चांगले लोक संपर्कात आले, त्यात बोलणार्‍या स्पीकर्समुळे खुपच प्रेरणा मिळाली. सर्वात मुख्य म्हणजे, 'स्वयं टीम'च्या रूपात जबरदस्त मित्र-मैत्रिणी मिळाले !

थँक्यू स्वयं !
खरंच फार मजा येते.

- समीर आठल्ये

लेखक हे स्वयं टॉक्स Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...