ज्ञानेश्वर बोडके या शेतकऱ्याच्या स्वयं टॉक ने काल दहा लाख व्ह्यूजचा (1 मिलियन) टप्पा पार केला. या विक्रमी टॉकच्या निर्माण प्रक्रियेविषयी सांगतोय - स्वयं टीम मधील नविन काळे.
२०१६ साली लोकसत्तेत संपदा वागळे यांचा एक लेख वाचनात आला. ज्ञानेश्वर बोडके या पुण्यातील एका शेतकऱ्यावर लिहिलेला. तो वाचताक्षणीच का कुणास ठाऊक वाटून गेलं, की हा माणूस आपला स्वयंचा वक्ता होऊ शकतो. बोडके यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना स्वयं टीमसोबत भेटायला गेलो.
पुण्याच्या हिंजवडी भागातील 'हार्डकोअर' आयटी पार्कच्या अगदी मधोमध ज्ञानेश्वर बोडके यांचं शेत आहे. कमीत कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवून तुम्ही समृद्ध कसे होऊ शकता हेच मॉडेल होतं त्यांचं. अशा चारशे छोट्या शेतकऱ्यांना एकत्र करून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करण्याचा त्यांनी चमत्कार करून दाखवला होता.
मध्यम उंची, सावळा वर्ण, डोळ्यात एक चमक, अस्सल गावरान भाषा पण त्यात कमालीची सुसंगती, अनुभवाने कमावलेला एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर, गावरान उच्चार मिश्रित शेतीतील इंग्लिश टर्म्स, आणि कमालीचा साधेपणा…असं एक व्यक्तिमत्व सलग दोन तास आमच्याशी 'शेती' या विषयावर बोलत होतं ! त्यांचं नाव ज्ञानेश्वर असल्यामुळे सगळे त्यांना 'माऊली' संबोधतात.
माऊलींचं ऐकताना दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे आपल्याला शेतीमधलं काही कळत नाही याचा एक साक्षात्कार. आणि दुसरं म्हणजे माऊलींनी मांडलेली थियरी ऐकून शेतीबद्दल निर्माण होणारं जबरदस्त आकर्षण ! आणि म्हणूनच माऊलींनी स्वयं मध्ये बोलणं अत्यंत आवश्यक होतं !
पुढचं आव्हान होतं, ते त्यांचं ते दोन तासाचे मनोगत वीस मिनिटांत आणायचं ! दर आठवड्याला शेकडो शेतकऱ्यांसमोर दोन तीन तास बोलणाऱ्या माणसाला वीस मिनिटात बोलायला सांगणं, म्हणजे भीमसेन जोशींना तीस सेकंदाची जिंगल गायला सांगण्यासारखं होतं ! वीस मिनिटे म्हणताच माऊलींच्या चेहऱ्यावर साहजिकपणे आश्चर्य मिश्रित नाराजी दिसली. (जी स्वयं च्या प्रत्येक वक्त्याच्या पहिल्या भेटीत असते ! वक्त्याच्या चेहऱ्यावरील या expression ची आम्हाला सवय असल्यामुळे पुढे ते कसं हाताळायचं हे आम्हाला बरोब्बर कळतं.) वेळ लावून पहिली रिहर्सल करूया असं सुचवलं. पहिल्या रिहर्सलमध्ये वीस मिनिटांपैकी अठरा मिनिटांत माऊलींनी फक्त एक प्रसंग सांगितला होता ! चूक किंवा बरोबर चा मुद्दा नाही, पण आपण भारतीय लोक बोलताना खूप पाल्हाळ लावत बोलतो. मी तिथे गेलो, मग त्यांनी चहा घेणार का विचारलं, मग मी त्यांना म्हटलं आत्ताच झाला, नंतर घेऊ. मग मी त्यांना….आणि पाच मिनिटांनी मुख्य मुद्दा ! माऊलींच्या बाबतीत हेच घडत होतं.
आमच्या टीमने त्यांना त्या वीस मिनिटांच्या जादूचं रहस्य नीट समजावून सांगितलं. आपल्याला कमीत कमी वेळात लोकांना जास्तीत जास्त द्यायचंय. त्यासाठी नको त्या भागाला काट मारत थेट मुद्द्यावर यायची कला शिकवली.
माऊलींचा मोठेपणा हा, की त्यांनी मोठ्या मनाने आमचं ऐकलं. स्वयंच्या फॉरमॅट चा मान राखला. पंतप्रधान मोदींसमोर शेतीबद्दलचे विचार मांडून आलेला माणूस आमच्या टीमसमोर विद्यार्थी बनून बसत असे. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही फक्त एकच केलं - ज्ञानेश्वर बोडके या व्यक्तीचा तो अस्सल रॉ फ्लेव्हर कुठे हरवून जाणार नाही याची काळजी घेतली.
Rest is history. २०१७ च्या स्वयं मुंबई कार्यक्रमात वीस मिनिटांत माऊलींनी त्यांच्या 'षटकार-चौकारांनी' सावरकर स्मारक अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यांचे ते भाषण आणि डॉ उदय निरगुडकरांनी घेतलेली मुलाखत युट्युबवर येताच तर कहर झाला. माऊलींचा फोन पुढचे अनके दिवस चोवीस तास वाजत राहिला. सुमारे पंधरा हजार लोकांनी माऊलींच्या शेताला भेट दिली. लोकांच्या भेटींचा हा 'प्रेमळ त्रास' इतका वाढला की अखेर त्यांना शेती प्रकल्प दाखवण्यासाठी नाईलाजाने शुल्क आकारावे लागले. मागच्या वर्षी आम्ही माऊलीकडे एक व्यक्ती बुलढाण्याहून आली होती. आम्ही सहज चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, मी आता माऊलींसोबत काम करतोय. युट्युबवर 'स्वयं' नावाच्या एका कार्यक्रमात आम्ही माऊलींना ऐकलं आणि थेट इकडे आलो ! आम्ही भरून पावलो.
काल माऊलींच्या व्हिडीओने आमच्या युट्युब चॅनलवर 'एक मिलियन व्ह्यूज'चा विक्रमी आकडा पार केला. म्हणजे ढोबळ अर्थाने त्यांचा व्हिडिओ दहा लाख लोकांनी पाहिला. यापुढेही लाखो लोकांपर्यंत तो पोहोचणार आहे. आजही माऊलींचा व्हिडीओ युट्युबवर most trending व्हिडीओज मध्ये असतो. यामागे, स्वयं मधील आपले मनोगत नेमके आणि प्रभावी होण्यामागे माऊलींनी घेतलेली मेहनत महत्वाची आहे. 'तरुण पिढीने जर शेतीकडे वळायला हवं असेल, तर शेतकऱ्याचा तो गरीब बिचारा चेहरा टाकून देऊन आपल्याला शेती ग्लॅमरस करायला लागेल' हा attitude लोकांना जाम आवडला ! त्याचसोबत स्वयं टीमवर माऊलींनी टाकलेला विश्वास आणि या विश्वासाला पात्र ठरलेली स्वयं टीम हेही घटक तेवढेच महत्वाचे आहेत.
२०१४ सालच्या स्वयं च्या पहिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीचे मनोगत व्यक्त करताना मी म्हटलं होतं की 'स्वयं चे व्यासपीठ अशा कुठल्याशा शेतकऱ्यासाठी आहे ज्याला त्याच्या शेतीविषयक प्रयोगाबद्दल त्याच्या मातृभाषेत मांडता येणं शक्य होईल..'
ज्ञानेश्वर बोडके नावाच्या एका अस्सल मराठमोळ्या शेतकऱ्याच्या विक्रमी 'स्वयं टॉक'ने आज ते उद्दिष्ट सप्रमाण सिद्ध करून दाखवलंय.
- नविन काळे
लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.