१८९७ चा प्लेग आणि आजचा कोविड - Welcome to Swayam Talks
×

१८९७ चा प्लेग आणि आजचा कोविड

सांबप्रसाद पिंगे

जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी आजच्यासारखी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती. ‘तेव्हा आणि आता’ ह्यातील साम्यस्थळं पाहिली की अचंबित व्हायला होतं. ह्या सगळ्या गोष्टी आणि मानवी प्रवृत्ती कालातीत आहे, हे सोदाहरण विशद करतोय, सांबप्रसाद पिंगे.
 

Published : 24 May, 2021

१८९७ चा प्लेग आणि आजचा कोविड

आज सकाळी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी होती की ‘केंद्र सरकारने सर्व राज्यांना म्युकरमायकोसिस म्हणजे ‘ब्लॅक फंगस’ या रोगाला Epidemic Act, 1897 अंतर्गत अधिसूचित करण्यात आलं आहे.’ ‘करोना-१९’ हा रोगसुद्धा ह्याच कायद्याअंतर्गत येतो. ह्याचा अर्थ हा कायदा गेल्या १२३ वर्ष जवळजवळ आहे तसा आहे. बहुदा त्याची कधी गरजच पडली नाही. अगदी २०१५ सालच्या ‘Swine Flu’ सारखा एखादा अपवाद असेल.

हा प्लेग मुंबईत १८९६ ते १८९७ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरला. त्याचं प्रमुख कारण म्हणजे कोकणातून आणि अन्य राज्यातून मुंबईकडे नोकरीसाठी येणारे लोंढे. गिरगाव आणि परळच्या आजूबाजूचे भाग गजबजू लागले. त्याचबरोबर व्यापारीवर्ग यायला लागला. मुंबईच्या १८९१ च्या जनगणनेत लोकसंख्या ८,२०,०० पर्यंत पोचली होती. त्यातले ७०% लोक चाळीत राहत होते. सप्टेंबर १८९६ साली डॉ.अकॅशियो वेईगास याने मांडवी येथे पहिली प्लेगची केस नोंदवली. ह्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर आठवड्याला १९०० इतके झाले आणि असे वर्षभर चालले होते. दहा वर्षानंतर मुंबईची लोकसंख्या ७,८०,००० इतकी कमी झाली ह्यावरून त्या रोगाच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो. आजच्या मुंबईच्या लोकसंख्येची तुलना केली तर हा आकडा दर आठवड्याला कमीतकमी १ लाख इतका जाईल.

W.H. Haffkine हा एक रशियन ज्यू शास्त्रज्ञ होता. वयाच्या तिसाव्या वर्षी तो पॅरिसला लुई पाश्चरच्या हाताखाली काम करू लागला. तेथेच १८९२ साली त्याने कॉलरावर लस शोधून काढली. त्याकाळात कॉलराने युरोपमध्ये लाखो माणसं मरत होती त्याला ह्याने जीवदान दिले. असा हा धडाडीचा संशोधक, पण ज्यू असल्यामुळे त्याची कायम पीछेहाट होत होती. ह्याला भारतातील प्लेगबद्दल कळले तेव्हा तो इंग्लंडला गेला. तेथून त्याला मुंबईच्या गव्हर्नरने बोलावून घेतलं. इथे आल्यावर त्याने ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये तात्पुरती प्रयोगशाळा उभारली. फक्त तीन महिन्यात अथक परिश्रम करून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माणसावर टोचण्यासाठी लस तयार केली. ती लस घ्यायला कोणी पुढे यायला तयार होईना म्हणून ह्या बहाद्दराने स्वतःवर लस टोचून दाखवली. पुढे १८९९ मध्ये हीच प्रयोगशाळा Haffkine Institute म्हणून नावारुपाला आली.

आज आपण १२० वर्षानंतर पण लस घ्यायला घाबरतो तेव्हा हॉफकीनची महत्ता कळते. सरकारला परत खात्री वाटत नसावी म्हणून त्या काळी ह्याची पहिली चाचणी भायखळा जेलमध्ये केली गेली. बिचारे कैदी … पण तेव्हा सर्वजण बचावले. त्या लसीने बरे होण्याची शक्यता फक्त ५०% होती असे नंतर जाहीर केलं गेलं. मुंबईत ज्यांना परवडत होते ते मुंबई सोडून बाहेर पडले. ह्याच काळात जमशेटजी टाटा ह्यांनी लोकांना उत्तरेकडील भागात स्थायिक होण्यासाठी आवाहन केले होते. तेव्हाच आपल्या उपनगरांतील वसाहतींची नांदी झाली असं म्हणता येईल.

लस आली तरीही त्या काळात सरकारने मुख्य भर हा खालील गोष्टींवर दिला होता.
१. सर्व घर धुणे (Sanitization), तेव्हाचं सॅनिटाईझर म्हणजे पाण्यात लिंबे पिळून फवारे मारणे.
२. रोग्यांना विलगीकरणात ठेवणे (Quarantine) तेव्हासुद्धा जागा अपुरी पडत होती.
३. प्रवासावर बंदी (Travel Restrictions)

काही ओळखीचे वाटतं आहे का?

ह्या हॉफकीनला पुढे खूप मानमरातब मिळाले. त्याच्याबद्दल वाचताना एक नवी मजेशीर माहिती मिळाली. १८९८ मध्ये त्याने ‘आगाखान तिसरे’ यांना विनंती केली की तुमच्या ऑटोमन राज्यात आम्हा ज्यू स्थलांतरित लोकांसाठी पॅलेस्टिन राज्यात राहण्यासाठी परवानगी द्या. ही विनंती अर्थातच फेटाळली गेली. आजही तो प्रश्न तसाच चिघळलेला आहे. असो.

मुंबईबरोबर प्लेग पुण्यामध्ये पसरु लागला आणि W.H. Rand ह्याला पुण्यात प्लेगला आवर घालण्यासाठी कमिशनर म्हणून नेमण्यात आलं. त्याने खूप कठोर निर्बंध घालायला सुरवात केली. तेव्हाच्या समाजाला ते नियम आणि त्याची अंमलबजावणी अघोरी आणि धर्मपरंपरांविरोधी वाटू लागली. लोकमान्य टिळकांनी त्याचा जाहीर निषेध नोंदवला आणि त्या असंतोषाचा परिणाम म्हणजे २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूनी गणेशखिंडीत रँडचा खून केला. ह्याच नावाचा एक अप्रतिम सिनेमा १९७९च्या सुमारास आला होता.

आज १२० वर्षानंतर मात्र ह्या घटनेकडे बघताना मला त्यात इंग्रज अधिकाऱ्यांची फार मोठी चूक दिसत नाही. म्हणजे १८९७ मध्ये मुंबईत पण तो कायदा लागू करण्यात आला होता, पण अंमलबजावणी बहुदा कठोरपणे होत नसावी म्हणून आठवड्याला १९०० माणसे मरत होती आणि पुण्यामध्ये तीच अमंलबजावणी कठोरपणे झाल्यामुळे एका अधिकाऱ्याचा खून झाला.

आजही करोनाची दुसरी लाट येण्यामागे कायद्याची कठोर अमंलबजावणी होत नव्हती हेच कारण पुढे येत आहे. पहिल्या लाटेनंतर हॉस्पिटल्ससारख्या सुविधा कमी करण्यात आल्या. लस घ्यायची की नाही? सुरवातीला कोणी घ्यावी ह्यावर वाद झाले.

काही नियम/ कायदे हे कालातीत असतात आणि काळ कितीही बदलला तरी माणसाची मूळ प्रवृत्ती बदलत नाही हेच खरं

- सांबप्रसाद पिंगे

लेखक हे ‘स्वयं’च्या Speaker’s Preparation Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...

तरुणाईतील ‘स्वयं’साठी!

तरुणपण जगण्याचा एक मार्ग म्हणजे या तरुणाईशी जोडलं जाणं. या पिढीतील बदलला सामोरं जाताना, त्यांना जर आपण आज मित्रत्वाचा...