जिंदगी की लौ उंची कर चलो... - Welcome to Swayam Talks
×

जिंदगी की लौ उंची कर चलो…

डॉ. मृदुला बेळे

’स्वयं टॉक्स’ हा भन्नाट कल्पनांचा अभूतपूर्व महोत्सव गेली ८ वर्षे सुरु आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘स्वयं टॉक्स’ मुंबई २०२१ मधील एक वक्त्या असलेल्या प्रसिद्ध पेटंट तज्ज्ञ आणि लेखिका डाॅ. मृदुला बेळे या कार्यक्रमाबद्दलचे त्यांचे अनुभव मांडताहेत
 

Published : 8 March, 2021

जिंदगी की लौ उंची कर चलो…

साल २०२०. मार्च महिन्याच्या सुरुवातीला लोकसत्तेतला माझा लेख वाचून मला नविन काळेंचा ईमेल आला, तुम्हाला स्वयं टॉक्समधे बोलायला आवडेल का? स्वयंचे अनेक उत्तम टॉक्स मी या आधी यूट्यूबवर पाहिलेले होतेच. त्यामुळे मी लगेचच होकारही कळवला. त्यानंतर आठवड्याभरातच काही कामानिमित्त मी मुंबईत असताना स्वयंची Content Team मला भेटली आणि आमची चांगली चर्चा झाली ... आणि त्यानंतर झाला तो लॉकडाउन! मग पुन्हा ऑक्टोबरमधे स्वयं टीमशी चर्चा सुरू झाल्या. गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत हे समजल्यावर १७ जानेवारीला मुंबईत बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे इथे स्वयं टॉक्स होणार हे ठरलं आणि जोरदार तयारी  सुरू झाली. इतर ठिकाणी भाषण करण्यापेक्षा स्वयंमधे बोलणं वेगळं असणार आहे, हे लगेचच लक्षात आलं आणि त्याचं कारण होतं वेळ. वीस मिनिटं टॉक आणि नंतर वीस ते तीस मिनिटं डॉ. उदय निरगुडकरांनी घेतलेली मुलाखत असा हा ठरलेला Format आहे. माझ्यासारख्या प्राध्यापिकेला, एकदा बोलायला सुरुवात केली की एक तासभर तरी Non-stop बोलायची सवय. त्यामुळे हा भाग मला जड जाणार होता. पण स्वयंच्या टीमने माझ्याबरोबर चिक्कार मेहनत घेतली... आणि आम्ही एकदाचा Content वेळेत बसवला. नंतर दोन तीनदा Zoom वर रंगीत तालमीही झाल्या. या तालमींच्या वेळी पुष्कर औरंगाबादकरने Voice Modulation बद्दल दिलेल्या सूचना फार मोलाच्या होत्या... त्या मी नेहमी लक्षात ठेवेन.

१७ जानेवारीला स्वयं टॉक व्हायचा होता, तरी सगळ्यांनी १६ तारखेलाच मुंबईला पोहोचायचं होतं. रंगमंदिर, तिथलं व्यासपीठ, लाईट्स, माईक यांची सवय व्हावी म्हणून सगळ्यांनी कार्यक्रम स्थळीच भेटायचं होतं. बोलणाऱ्यांनी रंगमंचाला आणि रंगमंचानं वक्त्याला आपलंसं करावं म्हणून केलेली ही योजना अत्यंत कौतुकास्पद होती. आदल्या दिवशीपासूनच तिथलं वातावरण एका अनोख्या उर्जेनं भारलेलं होतं. स्वयं टीमच्या अगत्याचं तर कौतुक करावं तितकं थोडं आहे. प्रत्येकाला काय हवं-नको ते सगळे जातीनं बघत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच रंगमंदिरात पोहोचलो. तिथली जय्यत तयारी आणि 'इतरांनी घडावं म्हणून स्वतः बिघडायची' तयारी असलेली स्वयंची उत्साहानं सळसळणारी टीम पाहिली आणि मी चाटच पडले. केवढी तयारी आणि किती कमालीचं सविस्तर प्लॅनिंग केलं होतं या मंडळींनी? यावेळचं स्वयं टॉक केवळ निमंत्रितांसाठी आणि निवडक श्रोत्यांसाठी होतं.. आणि नंतर ते इतरांना स्वयंच्या नव्यानं Launch होणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार होतं. त्यामुळे या वेळचा Show कदाचित नेहमीपेक्षा काकणभर जास्तच 'Tech Heavy' असणार होता. अनेक कॅमेरे, लाईट्स, उत्तम ध्वनिव्यवस्था आणि मानसी देवधर हिने प्रचंड मेहनत घेऊन वक्त्यांवर बनवलेल्या देखण्या AV...  यातलं सगळ्यात उत्तम काय होतं हे सांगणं अवघड होतं. 

कार्यक्रम सुरू झाला... आणि एखाद्या सुरेल मैफिलीसारखा रंगत गेला. आपल्याला गंधसुद्धा नसलेल्या नऊ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी नऊ वेडी माणसं आणि त्यांचं वेड लोकांपर्यंत पोचवायला 'Passion is the New Normal" म्हणत सरसावलेली स्वयंची टीम. 'मी आयुष्यात फार काही केलंय' असं वाटणाऱ्या प्रत्येक माणसानं एकदा स्वयं टॉक्स ऐकावं... आणि शक्य असेल तर संपूर्ण कार्यक्रम 'याचि देही याची डोळा' प्रत्यक्ष अनुभवावा. तिथली सकारात्मकता आणि ऊर्जा इतकी संक्रमणशील असते की प्रत्येक जण त्यात चिंब न्हाऊन निघणारच. "कौन कहता है के आसमानमें छेद नही हो सकता ... एक पत्थर तो तबियतसे उछालो मेरे यार" असं म्हणत आपण स्वीकारलेलं कामाचं व्रत नेटाने पुढं नेणारे वक्ते ऐकले. त्यांचं बोलणं ऐकताना राहून राहून आठवण होत होती ती 'वेडात मराठे वीर दौडले सात" या कवितेची.

प्रत्येकाचा जीवनप्रवास उलगडून झाल्यावर त्यावर कळसाध्याय चढवत होते ते डॉ उदय निरगुडकर – ते त्यांनी घेतलेल्या मुलाखतीने. त्यांनी केलेलं निरूपण, विचारलेले प्रश्न, अत्यंत खुसखुशीत शैलीत केलेल्या टिप्पण्या यांनी वक्त्यांचं काम ते आणखीनच खुलवत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉ निरगुडकर वक्त्याला त्याआधी कधीही भेटलेले देखील नव्हते. पण तरी त्यांनी घेतलेल्या मुलाखती इतक्या निर्दोष... की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. 

माझी स्वतःची बोलायची वेळ झाली तोवर मला इतरांचं ऐकून अत्यंत खुजेपण आलं होतं. पण तरीही रेटून बोलले. श्रोतेही अतिशय चोखंदळ होते.. त्यामुळे इथं बोलणं हा अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता.

स्वयंच्या संयोजनात तर काढायची ठरवली तरीही चूक काढता आली नाही. पुढच्या वेळपासून तीट लावण्यापुरती तरी चूक करा रे.. नाहीतर दृष्ट लागेल. स्वयंमध्ये बोलून मी परत आले ती एक अतिशय समृद्ध करणारं गाठोडं बरोबर घेऊन. इथून पुढे जेव्हा केव्हा निराश वाटेल, हताश वाटेल तेव्हा या गाठोड्यातल्या समृद्ध माणसांच्या समृद्ध कहाण्या माझ्यातली ज्योत तेवती ठेवणार आहेत. मी या परिवाराशी आता कायमची जोडले गेले आहे हे माझं भाग्य. स्वयंचा डिजिटल प्लॅटफॉर्म आता लवकरच Launch  होतोय आणि तिथं ही समृद्ध करणारी शिदोरी तुम्हा सगळ्यांनाही घरबसल्या चाखता येणार आहे. त्यामुळे ही पर्वणी सोडू नका... गंगा अंगणात आल्यावर कुणी डुबकी मारायचं राहतं का? या ज्योतीने आपली ज्योत पेटवून घ्यायला विसरू नका!

- डॉ मृदुला बेळे

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...