सामान्यांतील असामान्यत्व – Welcome to Swayam Digital
×

सामान्यांतील असामान्यत्व

सोनाली गोखले

आपले रोजचे आयुष्य जगत असलेली सामान्य माणसं कधीतरी, दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा तद्वत असामान्य कृती करुन जातात. एक लघुपटाने प्रभावित होऊन, त्या क्षणातील त्या एका ठिणगीचा शोध घेतेय, सोनाली गोखले.
 

Published : 5 July, 2021

सामान्यांतील असामान्यत्व

आजच्या वर्तमानपत्रात आतल्या पानावर एक बातमी वाचली. कर्जत-लोणावळा रेल्वेमार्गावर बेशुद्ध पडलेल्या एका महिलेला, पोलिसांनी कापड आणि बांबूंच्या साहाय्याने झोळी बनवून चार किलोमीटर पायी चालत शासकीय रुग्णालयात दाखल करवून जीवदान दिले. येते कुठून इतकी ताकद, इतकं धैर्य? खरंतर ही बातमी पहिल्या पानावर यायला हवी. सध्या तर अशी कितीतरी उदाहरणे, असे अनेक प्रसंग समोर येतात आणि मन हेलावून जातात.

या बातमीच्या निमित्ताने खूप पूर्वी पाहिलेला ‘आदमी और औरत’ या नावाचा एक लघुपट आठवला. पूर्वी जेव्हा अनेक चॅनेल्स, OTT अशा गोष्टींचा अतिरेक नव्हता आणि जेव्हा फक्त दूरदर्शन होतं, तेव्हा अनेक दर्जेदार कार्यक्रम किंवा चित्रपट / लघुपट दाखवले जात असत. त्या वेळी पाहिलेला आणि भावलेला अमोल पालेकर अभिनित एक लघुपट इतकी वर्षे, खोल स्मृतीत दडून बसलेला होता. इतक्या वर्षांनी कसा कोणास ठाऊक, यूट्यूब वरच्या Suggestions मध्ये दिसल्यावर वेळ न घालवता तो लगेच पाहून टाकला.

सुमारे १९७०-८० च्या दशकात भारतातील कुठल्याही दुर्गम खेड्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट. गावातील एक बदनाम आणि रंगेल माणूस, धन्याने शिकारीला ‘हाकारा’ म्हणून त्याला बोलावलेय, यासाठी दुसऱ्या गावाला निघालेला आहे. तुफान पावसात भिजण्यापेक्षा, थोडावेळ तो एका झाडाखाली थांबलाय. इतर चारपाच मजूर आधीपासूनच त्या झाडाखाली उभे आहेत. त्याचवेळी झाडाच्या एका कोपऱ्यात अंग चोरून, भेदरून बसलेली एक तरुणी त्याच्या नजरेस पडते. पाऊस थांबतो खरा, पण कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे सगळे पायी चालू पडतात. बन्सी त्या स्त्रीशी काही संधान साधता येईल म्हणून तिच्यावर लक्ष ठेवून बेताबेताने चालतोय. पण लवकरच त्याला जाणवतं की ही स्त्री आसन्नप्रसवा गर्भवती आहे आणि ती डॉक्टरकडे चाललीय. ती वेठबिगार असल्यामुळे कदाचित तिचा नवरा तिच्यासोबत नाही.

… आणि त्यानंतर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हा ‘आदमी’ त्या ‘औरत’ला रुग्णालयात पोहोचवायचा ठाम निश्चय करतो. वाटेत त्यांना असंख्य अडचणी, अनंत अडथळे येतात. तरीही कोलमडून न पडता, त्या करता तो जे काही कष्ट घेतो त्याला तोड नाही. प्रसंगी ‘औरत’ला चुचकारत, सांभाळत, कधीतरी तिच्यावर ओरडत तो तिची नैय्या पार करतो. एरवी स्त्रीलंपट असलेला कथानायक आमूलाग्र बदलून जातो. ‘औरत’ला आणि तिच्या पोटातील बाळाला सुखरूप दवाखान्यात पोहोचवणे हे एकच ध्येय त्याला पछाडते. अशावेळी त्याला त्या स्त्रीचा स्पर्श, तिचा देह कशाकशाची भुरळ पडत नाही. त्या असहाय्य स्त्रीचा गैरफायदा घ्यायचा विचारही त्याला शिवत नाही. एकदा बन्सीने निश्चय केल्यावर ‘आदमी और औरत’ हे शारीरिक भेदाभेद त्याच्या लेखी उरतच नाहीत मुळी, उरते ती फक्त माणुसकी, सहवेदना आणि संवेदना!

लघुपटाच्या शेवटी एक छोटा ट्विस्ट आहे तेव्हा तर पालेकरांचा अभिनय लाजवाबच! हल्लीच्या काळाच्या मानाने हा लघुपट थोडा संथ आहे. चित्रिकरण तितकेसे आधुनिक नाही, पण ‘आदमी’च्या भूमिकेतले अमोल पालेकर आणि ‘औरत’ झालेली महुआ रॉयचौधरी यांचा अभिनय बाजी मारून जातो. Boy Next Door च्या आपल्या लोकप्रिय झालेल्या चाकोरीतून बाहेर पडून पालेकरांनी जे इतर मोजके काम केले आहे, त्यातले हे एक उत्कृष्ट काम आहे. इथे दिसणारा हिरवागार निसर्ग आणि पाऊस सुरेखच!

‘आदमी और औरत’ नावाचा हा लघुपट एक निमित्तमात्र, पण मला नेहेमीच एक कुतूहल वाटत आलेलं आहे. आपल्या आसपास समाजात अशी कितीतरी उदाहरणं आढळतात की सामान्य माणूस विशिष्ट आणि विपरित परिस्थितीतही तिच्याशी दोन हात करण्यासाठी शड्डू ठोकून उभा राहतो. केवळ स्वतःसाठी किंवा आपल्या प्रियजनांनाच नव्हे तर इतरांना, अगदी अनोळखी माणसांना मदत करायची ही पराकोटीची अंतःप्रेरणा येते कुठून?

तुमच्या माझ्यासारखा एरवी सामान्य असलेला माणूस, असामान्य आंतरिक शक्तीच्या बळावर किती मोठं कार्य करून असामान्य होऊन जातो! बऱ्याचदा या सामान्यातील असामान्यांना अशा कार्यातून काडीइतकाही लाभ होणार नसला तरीही दुसऱ्यासाठी प्रसंगी जिवाची बाजी लावण्याइतके धैर्य त्यांच्यामध्ये कुठून येत असेल? अनेक वेळा देह जाईल अथवा राहील इतका विचार करण्याइतकाही वेळ हाताशी नसतो. अशा प्रसंगी हे कमालीचं प्रसंगावधान कसं राखलं जातं? तो कुठला एक क्षण जेव्हा आकाशातील दिव्यत्वाचा स्पर्श होऊन जातो?

काजळी धरलेल्या मनाच्या अंधारात अशा गोष्टी कशा आपल्याला लख्ख उजळवून टाकतात, नाही?

- सोनाली गोखले

‘स्वयं’च्या पाहुण्या लेखिका या विविध माध्यमांत ललित आणि वैचारिक लेखन करतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

I am the Creator

What is Law of Attraction and how it can be used for your personal growth? tells, Vaishnavi Kanitkar

Tang Ping - आरामही राम हैं!

’Tang Ping’ नावाची एक अनोखी चळवळ चीनमधील तरुणाईने सुरु केलीय. जगावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या चीनच्या हुकूमशाहीला त्याच्याच...

पाणी - जीवन की एक अभिशाप

पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत हरवत चालले आहेत. नकळतपणे आपला प्रवास पाणीविहीन जगाकडे होतोय. नजिकच्या भविष्यात येऊ घातलेल्या...