स्वयं'चा 'डिजिटल' प्रवास ! - Welcome to Swayam Talks
×

स्वयं’चा ‘डिजिटल’ प्रवास !

नविन काळे

स्वयं' च्या युट्युब चॅनलने नुकताच एक लाख सभासदांचा आकडा पार केला. त्या निमित्ताने स्वयं च्या डिजिटल प्रवासाबद्दल सांगतोय, नविन काळे
 

Published : 25 May, 2020

स्वयं’चा ‘डिजिटल’ प्रवास !

'स्वयं' च्या युट्युब चॅनलने नुकताच एक लाख सभासदांचा आकडा पार केला. त्या निमित्ताने स्वयं च्या डिजिटल प्रवासाबद्दल सांगतोय, नविन काळे.

'स्वयं'ने नुकताच एक मैलाचा दगड पार केला. स्वयंच्या युट्युब चॅनेलचे एक लाखाहून अधिक subscribers झाले. सोप्या भाषेत सांगायचं तर एक लाखाहून अधिक लोकांनी स्वतःहून स्वेच्छेने या चॅनेलचे सभासद म्हणून नोंदणी केली व 'आम्हाला यापुढे स्वयंचे व्हिडीओज् पाहायला आवडतील' असे मूकपणे सांगितले. पुढचा प्रवास अधिक उत्साहाने व्हावा म्हणून हे असे मैलाचे दगड आपलं मनोबल वाढवतात, फक्त इतकंच याचं कौतुक नाहीये. तर 'स्वयं' सारख्या पूर्ण वैचारिक content वर एक लाखाहून अधिक लोकांनी विश्वास दाखवला ही गोष्ट या घडीला महत्वाची आहे. आजूबाजूला उपलब्ध असलेल्या मनोरंजनाच्या विविध पर्यायांमध्ये एक लाख लोकांना आपल्या मर्यादित वेळेच्या चौकटीत 'स्वयं'ला देखील स्थान द्यावेसे वाटले याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार !

2014 मध्ये स्वयं ची स्थापना केली तेव्हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड कसा करायचा इथपासून सुरुवात होती. सोशल मीडिया नावाच्या एका नव्या माध्यमाचा उदय होत होता. हे सगळंच जग नवीन होतं. सगळे करतायत तर आपणही करून पाहू असा एकंदरीत आमचा approach होता. पण जसजसे कार्यक्रम करत गेलो तसतसं लक्षात यायला लागलं की आपण content च्या बाबतीत सोन्याच्या ढिगावर बसलोय. आपल्याकडे एकाहून एक सरस माणसांचे जीवनपट आहेत, डॉ उदय निरगुडकर यांच्यासारख्या अद्भुत व्यक्तिमत्वाने या सर्वांना बोलतं केलंय…हे 'सोनं' सभागृहातील चार भिंतीच्या पलीकडे पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायचा.

मग प्रश्न होता, सोशल मिडियाचं हे तंत्र आपण शिकायचं कसं ? की एखाद्या मीडिया एजन्सीला हे काम देऊन मोकळं व्हायचं ? आम्ही काही एजन्सीज् ना भेटलो. पण त्यांची मासिक फी आम्हाला परवडणारी नव्हती. मग एकच मार्ग होता, हे तंत्र आपणच एकलव्यासारखं शिकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण तयार केलेल्या ब्रॅण्डबद्दल दुसऱ्यांना सांगायचं असेल तर आपल्याहून अधिक योग्य व्यक्ती कोण असू शकेल ?

आमच्यात आशय (महाजन)ने ही जबाबदारी स्वतःहून उचलली. या डिजिटल माध्यमाचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. सर्व डिजिटल माध्यमांच्या analytics चा अभ्यास करून त्यांचे trends समजून घेणे, त्यांची बलस्थाने समजून घेणे आणि त्याप्रमाणे व्यूहरचना आखणे व सोशल मीडियाला आपल्या बिझनेस मॉडेलचा एक भाग बनवणे हे काम आशयने स्वीकारलं. या अभ्यासात आशय सक्रिय झाल्यानंतर 'स्वयं' डिजिटल प्लेटफॉर्म्सवर अधिक प्रभावी झालं. काम करून करून आम्हालाच त्यातल्या अनेक खाचाखोचा समजू लागल्या. YouTube, Facebook, Twitter, Instagram या प्रत्येक माध्यमाचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. या प्रत्येक माध्यमाच्या users च्या गरजा वेगळ्या आहेत. तिथली भाषा वेगळी आहे. तिथल्या तांत्रिक बाबी वेगळ्या आहेत. (उदा. इन्स्टाग्रामवर अमुक एका डायमेंशनचाच फोटो चालतो, ट्विटरवर शब्दसंख्या अमुकच लागते, वगैरे) प्रत्येक ठिकाणी काय 'क्लिक' होतं याचे नियम नसले तरी अंदाज आहेत.
काम करून करून या गोष्टी हळूहळू अवगत होऊ लागतात. त्यामुळे या विविध माध्यमांवर आपणच वेगवेगळे प्रयोग करत राहणं हाच योग्य मार्ग वाटतो.

सोशल मीडिया तुमच्यासमोर दररोज मोहाचे क्षण उभे करतो. लाखो पोस्ट्सच्या गर्दीत आपण काय 'स्पेशल' केलं की लोकं तुमच्याकडे पाहतील ? अरे, अमुक तमुक ला इतके व्ह्यूज आणि आपल्याला इतकेच व्ह्यूज ? शेवटी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून काही गोष्टी ठरवल्या ज्या आम्ही आजतागायत पाळत आहोत.

सर्वात पहिलं म्हणजे आपण आपल्या content वर शंभर टक्के विश्वास ठेवायचा. तो अधिकाधिक आकर्षक, ग्रीपिंग होण्यासाठी प्रयत्न करायचे. Content चा दर्जा सर्वार्थाने सर्वोत्तम भाषा,पण अतिभावनिक / अतिरंजित भाषा टाळायची. इतरांच्या पोस्ट्स बरोबर तुलना टाळायची पण त्यांच्यातील चांगल्या गोष्टी टिपायच्या. आपला प्रेक्षक मराठी आहे. तेव्हा आपल्या पोस्ट्सची भाषा मराठी ठेवायची. गरज असेल तेव्हाच इंग्लिश / हिंदीचा वापर करायचा. सातत्य टिकवायचं, आपल्या प्रेक्षकांशी संपर्कात राहायचं. पण कुठलीच पोस्ट for the sake of posting करायची नाही. चुकेल, फसेल वगैरेची चिंता न करता नवनवीन प्रयोग करत राहायचे. महत्वाचं म्हणजे आत्ता आपण तुलनेने लहान आकाराचे असलो तरी प्रत्येक गोष्टीत विचार करताना international standards चाच करायचा.

सोशल मीडिया सांभाळणे ही एक स्वतंत्र activity आहे. हे सगळं करण्यासाठी आम्हाला आमच्याच टीममध्ये एका जबाबदार व्यक्तीची गरज होती.

श्रेया शेट्टी दोन वर्षांपूर्वी तिच्या कॉलेजतर्फे आमच्या अमृतयात्रा ट्रीपला आली होती. तिला अमृतयात्रा / स्वयं ची संकल्पना आवडली म्हणून ग्रॅज्युएट होताच ती थेट intern म्हणून रुजू झाली. पगार किती असेल, किती वेळ काम असेल, सुट्ट्या किती असतील यापैकी एकही प्रश्न न विचारता तिने थेट कामाला सुरुवात केली. वैयक्तिक पातळीवर सोशल मीडिया हाताळणे आणि एका ब्रँडचा सोशल मीडिया हाताळणे यात खूप फरक आहे. कसलाही पूर्वानुभव नसताना आम्ही श्रेयावर स्वयं चा सोशल मीडिया सांभाळायची जबाबदारी टाकली. तिला चुका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. चुका करत करत पण निराश न होता श्रेया एका वर्षात खूप काही शिकली.
सोशल मीडियाच्या अनेक गोष्टी ती आता स्वतंत्रपणे हाताळते.

एखादी पोस्ट सोशल मीडियावर येण्यामागे एक खूप मोठी प्रोसेस असते. त्यामुळे यातील सर्व गोष्टी chance वर न सोडता, त्याला एक शिस्त हवी हे आशयच्या लक्षात आलं. आशयने या सगळ्याची एक SOP करायचा निर्णय घेतला. आपल्या पोस्ट्सचं कॅलेंडर काय असेल ? त्यासाठी कोणाकडून काय काम होणे अपेक्षित आहे ? त्याच्या डेडलाईन्स काय आहेत ?

कुठली पोस्ट तयार करायची याचे संशोधन, त्याप्रमाणे एडिटिंग (हेही आता आम्हीच करायला शिकलो आहोत), मग त्याचे transcript आणि translation, पोस्टचा मजकूर लिहिणे, क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीने त्याची तपासणी करणे व ते किती वाजता पोस्ट करायचे, पोस्ट करताना आपल्याकडे काय काय गोष्टी तयार हव्यात, पोस्ट करताना कुठली काळजी घ्यायची, या सगळ्याची आता एक पद्धतशीर लेखी SoP आहे. या सगळ्यामुळे कामात क्वालिटी कंट्रोल आला, एक शिस्त आली.

लॉकडाऊन सुरू व्हायच्या दोन दिवस आधी आमचे पुढील तीन महिन्यांचे 'सोशल मीडिया कॅलेंडर' तयार होते. या कॅलेंडरची रचनाच अशी केली आहे, की आमची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर प्रकाशित व्हायच्या सुमारे पंधरा तास आधी पूर्णपणे तयार असते ! आशय, श्रेया, प्रसन्न, दीपाली आणि मी अशी आमची संपूर्ण टीम मग ती एक सोशल मीडिया पोस्ट नावाची 'कलाकृती' दिवस-रात्र एक करून पूर्णत्वाला नेतो !

डिजिटल माध्यमाची ताकद आपण विचारही करू शकत इतकी प्रचंड आणि कल्पनातीत आहे. एका पोस्टमुळे स्वयं मध्ये व्यक्त झालेल्या भन्नाट कल्पना एका क्षणात सर्व भौगोलिक मर्यादा ओलांडून अक्षरशः लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. 'तुमचा एक व्हिडीओ पाहिला आणि आयुष्य बदललं'असं सांगणारी आमच्याकडे शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यम योग्य पद्धतीने हाताळायची एक जबाबदारी देखील येते.

फेसबुकमध्ये काम करणारा आमचा मित्र राहुल मावळंकर आणि 'स्मृतिगंध' चा सर्वेसर्वा असलेला आमचा मित्र अमित टिल्लू आम्हाला आता या नव्या माध्यमाच्या खाचाखोचा शिकवतायत. आम्हाला अजून यात खूप काही शिकायचंय. विशेषतः कोरोना नंतरच्या जगात डिजिटल माध्यमातील काही नवीन संधी खुणावताहेत. त्यासाठी आमची टीम सज्ज होते आहे.

Quality is never an accident हे कळल्यावर मग प्रत्येक काम एका शिस्तीत पण सर्वोत्तम करण्याचा ध्यास लागतो. Likes, comments, subscribers, views, followers हे मग आपोआप घडत राहतं. पण हे सगळं मिळावं म्हणून काम करू लागलो तर मात्र गोंधळ होतो.
गाईड सिनेमात एक सुंदर वाक्य आहे.
'जब मतलबसे प्यार होता है, तो उस प्यार में मतलब नही होता..' कामाचंही थोडं फार तसंच आहे.

'स्वयं'चं काम करताना आम्ही हेच शिकतोय.

- नविन काळे

लेखक हे ‘स्वयं’ चे संस्थापक सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...