मराठी - एक ग्लोबल मिसळ ! - Welcome to Swayam Talks
×

मराठी – एक ग्लोबल मिसळ !

नविन काळे

आपल्या मराठी भाषेच्या स्वच्छ, पारदर्शी तळ्यात जगभरातील भाषांचे पडलेले प्रतिबिंब हे भाषेचे सौष्ठव वाढविणारे आहे, सांगतोय नविन काळे.
 

Published : 15 February, 2021

मराठी – एक ग्लोबल मिसळ !

मागच्या महिन्यात मला एक पुस्तक भेट म्हणून मिळालं. कहाणी शब्दांची - मराठी भाषेच्या जडणघडणीची हे त्या पुस्तकाचे नाव (मनोविकास प्रकाशन) पुस्तकाचे लेखक आहेत सदानंद कदम. कुतूहल म्हणून पुस्तक चाळायला घेतलं. तुम्हाला सांगतो, पुस्तक बाजूला ठेववेना. आपल्या रोजच्या 'मराठी' शब्दांच्या उत्पत्तीची रंजक सफर वाचताना मी अक्षरशः हरखून गेलो. 

आपण थेट 'मराठी' या शब्दापासून सुरुवात करूया. आठव्या शतकातील उद्योतनसुरीच्या कुवलयमालेत ‘मरहट्ट' असा उल्लेख आहे. मग पुढे लीळाचरित्रात ती झाली 'मऱ्हाटी'. थोडक्यात, 'मराठी' हे देखील कोण्या एका शब्दाचं 'मॉडर्न' रूप ! 

'मावळे' म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात शिवाजी महाराजांचे जीवाला जीव देणारे तान्हाजी, बाजीप्रभू हे एकाहून एक असे मर्द मराठी गडी ! पण मावळे हा शब्द ज्या शब्दावरून रूढ झाला तो शब्द आहे - मामले. हा शब्द आहे तामिळ भाषेतला. या शब्दाचा अर्थ आहे, पावसाळी ढग. या वातावरणाचा भाग झाला मावळ प्रांत आणि तिथले राहणारे झाले मावळे ! 

मराठी माणूस आणि जिलेबी यांचं नातं म्हणजे साखरेच्या पाकात मुरलेल्या जिलबीसारखं एकजीव झालेलं. पण जिलेबी आपल्याकडे आली अरबस्तानातून. चौदाव्या शतकात. पामिरन साम्राज्यातील एका हलवायाने मैद्याच्या गोलाकार बिस्किटांवर मध ओतून एक पदार्थ बनवला आणि त्याला आपल्याच शहराचे नाव बहाल केले - झलाबिया ! आपल्याकडे येऊन त्याची झाली जिलेबी ! 

तामिळ भाषेतल्या मूळ मुरुगन (बालक, पुत्र) या शब्दाचा आपण बोलीभाषेत केला मुरगा.. आणि मग पुढे त्याचा झाला मुलगा ! याच्या साथीला 'मुलगी' आणण्याचं कर्तृत्व मात्र आपल्या मराठीचं ! 

जाता जाता एक भन्नाट bonus content ! मराठी मुलीची ओळख सांगणारे 'इश्श' आणि 'अय्या' ही तामिळची देणगी. दिलखुलास हा शब्द फारसी लोकांची भेट. सगळ्यात कहर पुढे आहे. डांबरट म्हणजे you damn rat आणि डॅमबीस म्हणजे you damn beast चं मराठीकरण ! आता बोला ! 

आता प्रश्न असा पडतो, की 'आपलं' म्हणून गर्व बाळगावा, ती अस्मिता जपत इतरांचा द्वेष करावा असं खरंच काही असतं का? भाषेचा इतिहास अजिबात माहीत नसणारे आपण 'मराठी भाषा जपली पाहिजे' असं म्हणतो, ती मराठी भाषा म्हणजे नक्की कुठली भाषा? आत्ता मी 'अजिबात' हा शब्द किती सहज वापरला. हा शब्द फारसी भाषेतून आपल्याकडे आला. याचं मूळ रूप आहे, अज ई बअद ! म्हणजे - बिल्कुल, मुळीच. 'मला आंघोळीसाठी सोप हवाय' असं गावात कुणाला म्हटलंत तर तो तुमच्याकडे 'कोण साहेब आला' म्हणून वळून बघेल, पण या माणसाला त्याचा 'साबण' लॅटिन 'सॅपोनेम'चं मराठी रुपडं आहे, हे माहीत नसेल ! 

अनेक संस्कृतींचे प्रवाह वाहत वाहत आपल्या प्रदेशातून जातात. जाता जाता त्यांचं आपल्याला देऊन जातात, आपलं काही घेऊन जातात. आपण टेबल, पेन, शर्ट वगैरे जितक्या सहज स्वीकारलं तितक्याच सहजपणे त्यांनी आपले गुरू, पंडित, जंगल वगैरे स्वीकारलेच की ! प्रमाण भाषेचं एक स्वतःचं म्हणून मूल्य आहे आणि ते तसं असायलाच हवं. 

आपण इतर भाषेमधून निरनिराळे शब्द आपलेसे करत असताना आपण त्यांना काही देतोय का? हा ही विचार असू दे. इतर भाषांच्या प्रवाहांनी आपले काठ जरूर भिजू देत, पण आपला काठच वाहून जाणार नाही याचीही काळजी घ्यायचीय. त्या प्रवाहांत आपलीही थोडीशी माती मिसळतीय ना? हे ही पाहावं लागेल. संस्कृतीच्या या अद्भुत आदान प्रदानाचा एक आविष्कार म्हणजेच आपल्या संपूर्ण मानवजातीच्या आजच्या विविध भाषा ! या भाषेची वरची वस्त्रं बदलत राहणं, हीच त्या भाषेच्या प्रवाही असण्याची खूण. म्हणूनच 'इये मऱ्हाटिचिये नगरी'… पासून 'मी आज एक पोस्ट शेअर केली' पर्यंतच्या या भल्या मोठ्या लाटेचा प्रतिकार करण्यात आपली शक्ती लावायची की त्यात गटांगळ्या खात आनंदाने पोहत राहायचं… याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचाय. 

सध्या फक्त एक करा. मी वर ज्या पुस्तकाचा उल्लेख केलाय ते वाचून झाल्यावर तुमच्या मुलांच्या हातात पडणार नाही याची काळजी घ्या. काय होईल सांगतो. Awesome dude वगैरे त्यांचे शब्द नेहमीप्रमाणे तुमच्या कानाला खटकतील. तुम्ही त्यांना 'शाब्बास' वगैरे 'आपले मराठमोळे' शब्द शिकवायला जाल. पण - 'शाब्बास' हा शब्द इराणच्या 'शाह अब्बास' वरून आलाय - हा 'बॅकहँड' जर समोरून आला तर मात्र मला सांगू नका.

- नविन काळे

लेखक हे स्वयं टाॅक्सचे सह-संस्थापक आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...