शेवटी आपलाही नंबर आलाच ! - Welcome to Swayam Talks
×

शेवटी आपलाही नंबर आलाच !

डॉ. संदीप काटे

जगप्रसिद्ध सातारा हिल मॅरॅथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे क्रमशः सांगतायत 'वक्ता’ म्हणून त्यांच्या 'स्वयं’मधील प्रवासाबद्दल ! आजच्या भागात अनुभवा डॉ संदीप यांची हाफ 'मॅरेथॉन'!!!
 

Published : 4 May, 2020

शेवटी आपलाही नंबर आलाच !

जगप्रसिद्ध सातारा हिल मॅरॅथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे क्रमशः सांगतायत 'वक्ता' म्हणून त्यांच्या 'स्वयं'मधील प्रवासाबद्दल ! आजच्या भागात अनुभवा डॉ संदीप यांची हाफ 'मॅरेथॉन'!!!

तारीख होती ३ सप्टेंबर २०१८.
पुण्यात डॉ. सचिन काबरांच्या 'रेटायना क्लिनिक'च्या बाहेर डोळ्यात ड्रॉप घालून, बसल्या बसल्या विचार करत होतो. ऑपरेशन करूनही डावा डोळा वाचेल की कायमचा बाद होईल हा प्रश्न होता. आणि उजव्या डोळ्याबाबतही शाश्वती नव्हतीच.

मी पेशाने डॉक्टर, म्हणजे सर्जन असल्यामुळे - “तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, रक्त भरावं लागेल“- इथपासून ते एखाद्या अभाग्याला “तुम्हाला कॅन्सर झाला आहे“, इथपर्यंत गंभीर गोष्टी पेशंट लोकांना सांगणं हे माझ्या रोजच्या कामाचा भागच आहे.

पण आज मात्र डाव उलटला होता. अगदी जीवन मरणाचा प्रश्न नसला तरी 'दृष्टी'चा प्रश्न होताच !

मुळात 'डोळे'हा माझा पहिल्यापासूनचा 'वीक पॉईंट'! लहानपणापासून मोठ्या नंबरचा चष्मा असल्यामुळे शाळेत असताना 'चसमिस, बॅटरी, ढापण्या, चाळीशी'असे टोमणे खूप ऐकले होते. चष्म्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड मनात कायमच घर करून राहिला होता. काहीतरी चमत्कार व्हावा आणि माझा चष्मा निघून जावा अशी देवाला मनातून प्रार्थना करायचो. शेवटी २००७ साली वयाच्या बत्तीसाव्या वर्षी लहानपणीचं ते 'स्वप्न'खरं झालं होतं. लॅसिक सर्जरी करून सातारच्या डॉ. सर्वटे सरांनी माझा चष्मा घालवला होता. एक नवा आत्मविश्वास आला होता.

मग २०१२ साली वयाच्या सदतीसाव्या वर्षी सातारा हिल मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली. हजारो लोकांना धावायला, पळायला लावण्यास निमित्त झालो.आयुष्याने अगदी “फॉरेस्ट गंप“या इंग्रजी सिनेमा सारखी कलाटणी घेतली होती जणू ( पाहिला नसेल तर आजच पहा )

आणि आता वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी पुन्हा एकदा चक्र पूर्ण फिरलं होतं…

२ सप्टेंबर २०१८ रोजी, म्हणजे आठव्या सातारा हिल मॅरेथॉनच्याच दिवशी, डाव्या डोळ्यातला मागचा पडदा ( रेटायना ) सुटल्यामुळे दिसायचं अचानक बंद झालं होतं.. दृष्टी कायमची जाण्याचा धोका निर्माण झाला होता. 'फॉरेस्ट गंप'च्या परीकथेचा 'सॅड एंडिंग'होऊ घातला होता जणू.

“आता आंधळ्या नवऱ्याला सांभाळावं लागेल तुला“- असं गमतीने सुचित्राला म्हणत होतो. वरवर आव आणत असलो तरी आतून खरंतर जाम टरकलेली होती.

एवढ्यात माझा मोबाईल वाजला. सुचित्राने फोन घेतला आणि म्हणाली - पुण्यातून कुणी समीर आठल्ये आहेत, त्यांना बोलायचं आहे. आमची फॅमिली फ्रेंड असलेल्या अमृताचा समीर हा मित्र.
'स्वयं टॉक्स'बद्दल ऐकलंय का असं समीरने मला विचारलं. मी ज्ञानेश्वर बोडक्यांचा 'स्वयं'चा एपिसोड नुकताच पाहिला होता. खरं तर आपली सुद्धा मॅरेथॉनची कहाणी अशा व्यासपीठावर सांगायला मिळाली तर किती मस्त होईल, असं तेव्हाच वाटून गेलं होतं.
समीर म्हणाला सातारा हिल मॅरेथॉनच्या तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचंय.
हा जणू चमत्कारंच घडत होता !
मी डोळे बंद करूनच त्याच्याशी बोलत होतो.
त्याला थोडक्यात परिस्थितीची कल्पना दिली. डोळ्यांचं ऑपरेशन, नंतरचा रिकव्हरीचा काळ, साधारण महिना दोन महिने लागण्याची शक्यता त्याला सांगितली. चालेल, बोलू नंतर - असं ठरलं.

सुदैवाने डोळ्यांचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. डावा डोळा अगदी नवा करकरीत झाला नाही पण कामापुरता तरी वाचला. आणि उजव्या डोळ्यात लेझर उपचार करून त्याची सुद्धा 'डागडुजी'केल्यामुळे निदान तूर्तास तरी संकट टळलं होतं.

पण आता व्यायामावर खूप बंधनं होती, बहुदा कायमचीच. भविष्यात धावण्याबद्दलही काही खात्री नव्हती. अशात डोळ्यावर काळा चष्मा घालून आता दीड महिना नुसता घरात बसून काढायचा होता. म्हणजे काल परवा पर्यंत 'दुसऱ्या'कोणाच्या तरी आयुष्यात कसे अवघड प्रसंग आले, त्यावर त्यांनी कशी जिद्दीने मात केली वगैरे जे किस्से-कहाण्या सिनेमात, बातम्यांत, पुस्तकात, फेसबुकवर - पहायचो वाचायचो,ऐकायचो - अचानकपणे तशाच एखाद्या स्टोरीतला मेन कॅरेक्टर झाल्यासारखं वाटायला लागलं होतं.

साधारण पंधरा वीस दिवसांनी पुन्हा समीरचा फोन आला - भेटायला येऊ का विचारलं.
इतके दिवस 'लॉकडाऊन आणि होम क्वारंटीन'मध्ये असल्यामुळे कुणी भेटायला येणार म्हटल्यावर मी जाम खुश झालो !
थोड्या दिवसांनी नविन, स्नेहल, समीर, मंगेश आणि आशय अशी 'स्वयं'ची टीम सातारला माझ्या घरी आली. भरपूर, दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या. पहिल्याच भेटीत जणू आपले जुने लहानपणीचे कुणीतरी सवंगडी भेटल्यासारखं वाटलं. ही सगळी चांगली माणसं होती. चांगल्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी धडपडणारी माणसं होती, हे अगदी सहज लक्षात आलं. त्यांच्या या सुंदर प्रवासाचा सहप्रवासी होण्याची, या दर्जेदार आणि लोकप्रिय अशा उपक्रमाचा एक भाग होण्याची संधी मिळते आहे याचा मनापासून आनंद झाला.

कार्यक्रम जानेवारीत मुंबईला होणार होता. तोपर्यंत जवळपास दोन महिने होते तयारीला.

शिल्पा, भाग्यश्री, सांबाप्रसाद - अशी स्वयंची ट्रेनिंग टीम संपर्कात होतीच.
मग काय, डोळ्यांवर काळा चष्मा, कानाला इअरफोन आणि तोंडासमोर मोबाईल धरून रेकॉर्डिंग करून बोलण्याचा सराव करायचा असा कार्यक्रम सुरू झाला. बरंच काही सांगायचं होतं. पण कमीत कमी वेळात (20 मिनिटांत) मांडताना ते नेमकं, थेट आणि प्रभावीपणे मांडायचं पण ते भाषणासारखं पाठ नाही करायचं अशी स्वयं टीमची अट होती. माझ्या भाषणांच्या ड्राफ्टवर स्वयं टीम कडून वेळोवेळी फीडबॅक येत होता….काय छान वाटेल, काय टाळता येईल यासाठी सूचना मिळत होत्या. एकूणच काय तर मी एकटा नव्हतो - सगळी पूर्वतयारी ही एक प्रकारची 'टीम एफर्ट'होती. साधारण वीसएक मिनिटात सर्व काही मांडण्याची तयारी झाली.

आणि शेवटी २०१९ साली जानेवारीत 'तो' दिवस उजाडला.
मॅरेथॉन संयोजनाच्या निमित्ताने लोकांसमोर बोलायची तशी बऱ्यापैकी सवय झाली होती, पण 'स्वयं'च्या व्यासपीठावर येऊन बोलण्यात एक विशिष्ट असं जबाबदारीचं दडपण आल्यासारखं झालं होतं. आदल्या रात्री हॉटेलात फारशी झोपही लागली नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच दादरच्या सावरकर सभागृहात जाऊन पोहचलो.

पोहोचल्यावर समजलं की सहा वक्त्यांपैकी माझा नंबर पहिलाच होता. आयुष्यात कधीच बॅटिंगमध्ये पहिला नंबर आला नाही, पण इथं एवढ्या महत्वाच्या मॅचमधे मी ओपनिंग बॅट्समन होतो.

उदय निरगुडकर सरांनी कार्यक्रमाच्या आधीच भेटल्यावर 'रिलॅक्स - टेक इट ईझी'असं सांगितल्यावर दडपण थोडं कमी झालं. बॅकस्टेजवर स्वयं टीमची सगळी मंडळी आपापल्या कामात, तयारीत व्यस्त असतानाही अगदी हसतमुखाने, सहजतेने वावरत होती, समोर आल्यावर मस्त स्माईल देऊन जणू 'डोन्ट वरी यार- छान होईल सगळं'असा संदेश देत होती. यजुर्वेन्द्र महाजन यांनी त्यांची खास 'जादूची झप्पी'दिली.

माझं बोलणं सुरू झाल्यावर समोरून प्रेक्षकांची सकारात्मक देहबोली, अधून मधून येणाऱ्या टाळ्या ( शिट्ट्याही ) आणि विंगेतून स्वयं टीमचे 'मस्त बोलतोयस्'असे इशारे, यामुळे अगदी सहजतेने आणि आत्मविश्वासाने बोललो.
माझा टॉक संपल्यावर उदय सरांनी मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर येऊन त्यांनी माझ्या खांद्यावर थाप टाकत जेव्हा 'शाब्बास - मस्त बोललास'असं सांगितलं तेव्हा खूप भारी वाटलं !

त्याच क्षणी जाणवलं की आतापर्यंतच्या आयुष्याचे जसे 'मॅरेथॉनपुर्वी'आणि 'मॅरेथॉननंतर'असे दोन टप्पे होते, तसं आता 'स्वयं'पुर्वी आणि 'स्वयं'नंतर अशा एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार होती … (क्रमशः)

-डॉ. संदीप काटे

लेखक हे सातारा हिल मॅरॅथॉनचे संस्थापक असून स्वयं टॉक्स मध्ये वक्ता म्हणून सहभागी झाले आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...